भारतातील ऐतिहासिक स्मारकांच्या कथा · घारापुरी (एलिफंटा)
जुआंव द कास्त्रो महालेण्यात
हत्तीचे बेट
डिसेंबर १५३८ मध्ये पोर्तुगीजांचे एक आरमार चौलहून निघाले, आणि त्याच महिन्याच्या बारा तारखेला वसईच्या नदीत नांगरले. ते विजरई दों गार्सिया द नोरोन्या याचे आरमार होते. दीवला मदत पोचवायला ते निघाले होते, आणि त्याच्याबरोबर जुआंव द कास्त्रो होते. गोव्यापासून दीवपर्यंतच्या सगळ्या किनाऱ्याची नोंदवही ते लिहीत होते. मुंबईच्या उपसागरात इतकी बेटे आणि इतक्या खाड्या होत्या, की त्यांतल्या फक्त “सर्वांत उल्लेखनीय गोष्टी” ते नोंदवणार होते. त्यांतलेच एक छोटे बेट. त्यात दोन उभ्या, खडकाळ टेकड्या होत्या. मधली दरी इतकी अरुंद, की जणू करवतीने कापून त्या वेगळ्या केल्या होत्या. बेटावर पीक फारसे येत नसे; ते रानटी झाडीने, मोरांनी आणि होल्यांनी भरलेले होते. एका झाडीत दगडाचा एक मोठा हत्ती उभा होता. रंगाने, आकाराने आणि घाटाने तो अगदी जिवंत हत्तींसारखा होता. त्यावरूनच पोर्तुगीजांनी या बेटाला ‘एलिफंटा’ नाव दिले; हिंदू त्याला घारापुरी म्हणतात. ते मुंबईपासून सुमारे सहा मैलांवर आहे. तो हत्ती आता राहिलेला नाही. सप्टेंबर १८१४ मध्ये त्याचे डोके आणि मान गळून पडली, आणि १८६४ मध्ये त्याचे जे उरले होते, ते मुंबईच्या व्हिक्टोरिया गार्डन्समध्ये नेले गेले. पण दोन टेकड्यांपैकी अधिक थोर होती ती उत्तरेकडची; कारण तिच्या पोटात ते प्रचंड मंदिर होते.
जुआंव द कास्त्रो महालेण्यात
माणसांच्या हातचे नव्हे
त्यांना दिसले, की त्या टेकडीखालचा कठीण, जिवंत खडक माणसांनी खोदला होता, आणि त्यात एक फार मोठे मंदिर घडवले होते. ते इतक्या अद्भुत कौशल्याने घडवलेले होते, की “ते माणसांच्या हातांनी घडले, हे अशक्य वाटते.” प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक मूर्ती, प्रत्येक खांब टेकडीच्या अखंड दगडातूनच कोरलेला होता. प्रत्येक मूर्तीचे प्रमाण आणि सममिती राखणे एखाद्या चित्रकाराला कठीण गेले असते; मग तो अपेलीस का असेना. ते विचारतात, लोखंडाच्या आणि हट्टाच्या जोरावर सर्वांत कठीण खडक खोदायचा, आणि त्याच्या इतक्या आत शिरायचे; माणसांनी याहून मोठा अभिमान कोणता दाखवावा? “अहो, केवढे मोठे आणि बेफाम धाडस! इतकी मोठी कल्पना माणसांच्या मनात शिरणेसुद्धा खचित उचित नव्हते; मग ती कामाला लावणे, आणि शेवटास नेणे, तर दूरच.” संपूर्ण मंदिरात खांबांच्या लांब, सरळ रांगा होत्या. जणू त्यांनीच सपाट छत तोलून धरले होते. ते खांब सगळे मिळून बेचाळीस होते.
जुआंव द कास्त्रो महालेण्यात
दारांवरचे महाकाय पहारेकरी
चर्चमध्ये जिथे मुख्य वेदी असते, तिथे या मंदिरात एक चौकोनी गाभारा होता. त्याच्या प्रत्येक बाजूला एक छोटे, ठेंगणे दार होते. प्रत्येक दारावर दोन “अतिशय उग्र महाकाय पुरुष” पहारा देत होते; ते एकवीस वीत उंच होते. आत एक वेदी होती. तिच्यावर “एक मोठा गोळा होता; तो जगाचे प्रतीक असला पाहिजे.” ते जग नव्हते. ही नोंदवही १८४३ मध्ये छापणारे दियोगु क्योपके समजावून सांगतात, हे मंदिर शिवाला अर्पण केलेले आहे, आणि तो दगड म्हणजे लिंग, शिवपूजेचे प्रतीक. दुसऱ्या एका पोर्तुगीज लेखकाच्या शब्दांत, तो मूर्तीच्या जागी ठेवलेला दगडाचा एक दंडगोल आहे. ही चूक झाली, यात त्यांना काही नवल वाटले नाही. मंदिराभोवती बारा दालने होती, प्रत्येकात पुष्कळ कथा कोरलेल्या. एका दालनात तीन मोठी तोंडे आणि चार हात असलेला एक पुरुष होता; एका हातात नाग, दुसऱ्यात गुलाब. दुसऱ्या एका दालनात आठ हातांचा एक महाकाय पुरुष उभा होता. त्याने एका मुलाला एका पायाने धरले होते, डोके खाली. तेव्हासुद्धा, कास्त्रो यांच्या काळीच, तीन तोंडांच्या पुरुषाचा चौथा हात तुटलेला होता; आणि त्या महाकाय पुरुषाच्या आठ हातांपैकी दोन हातही.
जुआंव द कास्त्रो महालेण्यात
त्याचे पहिले इतिहासकार
मोठ्या गाभाऱ्यामागे एक झरा होता, “या प्रदेशात मी पाहिलेल्यांत सर्वांत उत्तम पाण्याचा.” मुख्य दाराच्या डावीकडे दुसरे एक मंदिर होते, टेकडीखाली खूप आत गेलेले. त्यात इतक्या कथा कोरलेल्या होत्या, की त्यांनी त्या सगळ्या लिहून काढायचा प्रयत्नही केला नाही: त्या फारच होत्या. क्योपके यांना आढळले, की युरोपियनांनी हे मंदिर अनेकदा पाहिले होते. ते केव्हा खोदले, कोणत्या लोकांनी, आणि कोणत्या देवांसाठी, यावरून या मंदिराविषयी अनेक वाद उठले होते. तरी या मंदिराचे वर्णन करणारे, क्योपके यांना सापडलेले पहिले लेखक म्हणजे कास्त्रो. त्यांचे वर्णन थोडक्यात होते, पण अचूक. दियोगु दु कौतु यांनी पन्नास वर्षांनी हे मंदिर पाहिले; कौतु यांच्या वर्णनाशी ते प्रत्येक बाबतीत जुळत होते. उत्तरेकडचे प्रवेशद्वार क्योपके यांच्या काळीही तेव्हासारखेच होते; त्यात फारसा फरक पडला नव्हता. म्हणून त्यांनी त्याचे चित्र आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीला दिले. कारण त्या नोंदवहीचे लेखक हे त्या मंदिराचे “पहिले, पण आजवर विस्मृतीत गेलेले, इतिहासकार” होते. ही कथा पुढील ग्रंथांवरून सांगितली आहे: दों जुआंव द कास्त्रो, ‘प्रिमेइरु रोतेइरु दा कोश्ता दा इंदिया’ (लेखन १५३८-३९), संपादक दियोगु क्योपके (१८४३), मुखपृष्ठ, पृष्ठे ५४-५५, ६२-६९, आणि क्योपके यांची टीप १६, पृष्ठे २६२-२६४, आमचे भाषांतर; जेम्स बर्जेस, ‘द रॉक-टेम्पल्स ऑफ एलिफंटा’ (१८७१), पृष्ठ १; आणि ‘गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी’, खंड १४, ‘ठाणे: प्लेसेस ऑफ इंटरेस्ट’ (१८८२), एलिफंटा, पृष्ठे ६० आणि ८४, आणि टीपा. ‘रोतेइरु’ ही सफर डिसेंबर १५३८ च्या नोंदींमध्ये ठेवतो. गॅझेटियर आपल्या इतिहासाच्या भागात कास्त्रो यांची भेट १५३९ ची सांगते, आणि एका तळटीपेत १५३८ ची; तिथेच ते म्हणते, तीन तोंडांच्या मूर्तीचा चौथा हात “१५३८ इतक्या लवकरच” तुटलेला होता.