Abhang 177
काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥१ ॥ ॥ ध्रु. ॥ काय देवा यांसि व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ १ ॥ सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥ तुका ह्मणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसें मज येती सांभाळित ॥३॥
या संतांचे उपकार मी कसे मानू, ते मला सतत जागं (सावध) ठेवतात. देवा, त्यांचं ऋण कसं फेडावं, त्यांच्या चरणी हा जीव अर्पण केला तरी तो अपुराच वाटतो. सहज बोलण्यातूनच ते हिताचा उपदेश देतात, आणि खूप कष्ट घेऊन शिकवतात. तुकोबा म्हणतात, गाईच्या मनात जसं वासरू सतत असतं, तसंच ते सतत माझी काळजी घेत माझ्याकडे येतात.
pocketpage.in