Abhang 344
जें कां रंजलें गांजलें । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥१॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥३॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥ तुका ह्मणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥
जो दुःखी-कष्टी, पीडलेल्या माणसांना आपलं मानतो, त्यालाच खरा साधू ओळखावं; तिथेच देव आहे असं समजावं. लोण्यासारखं आतून-बाहेरून मृदू असतं, तसंच सज्जन माणसाचं मन असतं. ज्याला कुणाचाही आधार नाही, त्याला असा साधू आपल्या हृदयाशी धरतो. स्वतःच्या मुलावर जेवढी माया करावी, तेवढीच माया तो आपल्या दास-दासींवरही करतो. तुकाराम म्हणतात, आणखी किती सांगू? तोच माणूस साक्षात भगवंताची मूर्ती आहे.
pocketpage.in