Abhang 358
ध्यानीं योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाठीं तयांचिया ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तान भूक त्यांची राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥२॥ कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥३॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥४॥ तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥५॥
योगीराज गुहेत ध्यानाला बसले की भूक-तहान, थंडी-ऊन हे सगळे त्यांच्यामागे लागलेले असते, कारण देहाची जाणीवच त्यांना उरलेली नसते, ते उदासीन झालेले असतात. त्यांना हरीशिवाय दुसरे सोयरे-सखे कोण असणार? त्यांच्या जिवाला आनंद कशात आहे हे कोणास ठाऊक, त्यांना राजेपणाचा गर्वही कधी शिवत नाही. तुकाराम म्हणतात, नारायण कृपा करतो तेव्हा विषसुद्धा अमृतासारखे होते.
pocketpage.in