Abhang 4
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ १ ॥ ध्रु. ॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ ध्रु. ॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचे ओतले सकळ ही ॥ २ ॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सांवळा बायांनो ॥ ३ ॥ सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं ॥ ४ ॥
किती देखणा, किती नाजूक - जणू कामदेवाचाच पुतळा! त्याच्यापुढे सूर्य-चंद्राचं तेजही फिकं पडतं. कस्तुरीचा टिळा, चंदनाचा लेप, गळ्यात वैजयंतीची माळ रुळते आहे. डोक्यावर मुकुट, कानांत कुंडलं, सुंदर मुख आनंदानं ओथंबलेलं. कमरेला सोनेरी काठाचं वस्त्र, अंगावर रेशमी शेला, रंग जणू पावसाळी ढगासारखा सावळा - सख्यांनो, तुम्हीही सगळ्या माझ्यासोबत याच्या भक्तीत सामील व्हा. तुकाराम म्हणतात, माझ्या जिवाला आता धीरच राहिलेला नाही.
pocketpage.in