Abhang 61
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ ॥ध्रु.॥ न करितां परनिंदा परद्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥२॥ वैसलिये ठायीं ह्मणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥३॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥४॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥५॥ तुका ह्मणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी नलगे कांहीं ॥६॥
परक्याच्या बायकोला जर आपली आई मानले, तर त्यात तुमचे काय जाते, सांगा बरं? दुसऱ्याची निंदा न करणे आणि दुसऱ्याच्या धनाचा लोभ न धरणे, यात तुमचे काय खर्च होते, सांगा? जिथे बसला आहात तिथेच बसून जर रामनाम घेतले, तर त्यात कुठला त्रास होतो, सांगा? संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, तर त्यात तुमचे काय जाते, सांगा? खरे बोलले तर त्यासाठी काय विशेष कष्ट पडतात, त्यात काय खर्च होते, सांगा? तुकाराम महाराज म्हणतात, अशा साध्या साध्या गोष्टींनीच देव मिळतो, त्यासाठी वेगळे मोठे तपकष्ट करण्याची अजिबात गरज नाही.