Abhang 1064
आतां मी देवा पांघरों काई । भिकेचें तेंही उरे चि ना ॥१॥ ॥ ध्रु. ॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥२॥ नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥३॥ तुका ह्मणे जना वेगळें जालें । एकचि नेलें एकल्याचें ॥४॥
आता मी देवा काय पांघरू? भिक्षेतून मिळालेले तेही आता शिल्लक उरत नाही. चोराला हे माहीतच नाही, की हा कायम दुबळा, गरीब माणूस आहे; तो तर घर ओसाड, सुने दिसले की तोडफोड करतो, लुटतोच. माझ्यापाशी तर साधी फुटकी कवडीही नव्हती; फक्त पाच जणांनी मिळून एक घोंगडे दिले होते तेवढेच. तुका म्हणतो, इतर लोकांपेक्षा माझी गत वेगळीच झाली - एका गरीब, एकट्या माणसाचे तेवढे एकच होते तेही नेले गेले.
pocketpage.in