Abhang 1066
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥२॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥३॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥४॥
माझे घोंगडे नेले, याची तक्रार मी कुणाकडे सांगू? मी गरीब, दुबळा आहे म्हणून कुणी माझे मनावरही घेत नाही. आता पुढे ते मला परत मिळणार नाही, कारण माझ्याजवळ अधिकारही नाही आणि पैसाही नाही. अहो शेटजी, महाजन लोक हो, कुणीतरी ऐका आणि माझ्या घोंगड्याचा शोध घ्या. बाजारपेठ भरलेली असतानाच, हाट भरलेला असतानाच या घोंगड्याविषयी जाहीर वाच्यता करा, असे तुका म्हणतो.
pocketpage.in