Abhang 1076
राम ह्मणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥ ॥ ध्रु. ॥ राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महादोष तेही जळती ॥२॥ राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैंचा यमदूत ह्मणतां राम ॥३॥ राम ह्मणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार ह्मणतां राम ॥४॥ तुका ह्मणे हें सुखाचें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥५॥
राम म्हणताच माणूस तरून जातो, मग तो जाणता असो वा अजाण असो, उच्च जातीचा असो वा कुळहीन असो. राम म्हणायला आणखी कुठलेही वेगळे कष्ट, साधना लागत नाही; मोठमोठे केलेले घोर पापसुद्धा त्यामुळे जळून भस्म होतात. राम म्हणणाऱ्याच्या जवळपास भूतसुद्धा फिरकत नाही, मग यमदूत तरी कुठून येणार? राम म्हणताच संसाररूपी समुद्र पार होता येतो, राम म्हणताच जन्ममरणाची येरझार चुकते, थांबते. तुका म्हणतो, हेच खरे सुखाचे साधन आहे; एका निष्ठेने हे अमृतपान करून घ्या.
pocketpage.in