Abhang 1093
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥२॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥३॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥४॥ तुका ह्मणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥५॥
ये रे, ये रे पांडुरंगा, मला उचलून तुझ्या कुशीत घे. इथे तुझ्याच गावात, तुझ्याच वेशीत राहूनही मी परका, परदेशी असल्यासारखा वाटतो आहे. हा जो काही गुंता, अडकणूक झाली आहे ती उलगडून, देवा, मला त्यातून सोडवून घेऊन जा. तुझ्यापुढे आड येईल, तुला रोखेल असे कुठलेही बळ या जगात नाही. तुका म्हणतो, हे हृषीकेशा, मग आता हे असे का उशीर लावतो आहेस?
pocketpage.in