Abhang 1106
नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥ ॥ध्रु.॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥२॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥३॥ क्रद्षषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां ते गुण न सरती ॥४॥ तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥५॥
हे विष्णुरूपा, विश्वरूपा, माझ्या माय-बापा, अगणित अमाप अशा पांडुरंगा, तुला नमस्कार असो. मी एक गरीब, दास, सेवक अशी विनंती करतो आहे - माझं एवढं एक वचन ऐकावंस. तुझी स्तुती करता करता वेदही थकले आणि शेवटी 'हे असं नाही, तसंही नाही' असं म्हणत गप्प बसले. मोठमोठे ऋषी, मुनी, सिद्धपुरुष आणि कवी तुझे गुण वर्णन करत असले, तरी ते गुण काही संपत नाहीत. तुका म्हणतो, मग तिथे माझ्या शब्दांची काय किंमत, की जे तुझी कीर्ती, हे देवा, वर्णन करू शकतील?
pocketpage.in