Abhang 1247
आपुले गांवींचे न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कुंठूं ॥१॥ ॥ध्रु.॥ ह्मणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढे ॥२॥ तुका ह्मणे कोणी न संगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥
आपल्या गावातले कुणीच आता दिसेनासे झाले आहे; परक्या मुलखात एकटे किती काळ गोंधळून, कासावीस होत राहायचे? म्हणून मी वाटेकडे डोळे लावून बसतो, की कुठलातरी जिवलग भेटेल आणि निरोप घेऊन येईल. पाहावे तिकडे नुसत्याच दिशा दिसतात, सगळीकडे माझ्या नजरेसमोर ओसाडच ओसाड दिसते. तुकाराम म्हणतात, कोणीच मला काही खबर आणून देत नाही; हे पांडुरंगा, तुझीच चिंता मला वाटत राहते.
pocketpage.in