Abhang 1466
कथेचा उल्लंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥१॥ ॥ध्रु.॥ कासया जीऊन जाला भूमी भार । अनुपकार मातेचे कुशीं ॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥२॥ तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥३॥
जो कथेचा (हरिकथेचा, कीर्तनाचा) अनादर करतो, तो नीच माणसांतला अतिनीच समजावा - ज्याला नाम आवडत नाही, त्याला तसाच ओळखावा. असा माणूस जगून तरी काय उपयोग, तो फक्त पृथ्वीवर भार बनून राहतो, ज्या आईच्या उदरातून जन्माला आला तिचेही उपकार तो जाणत नाही (कृतघ्न असतो). त्याला झोपेची फार आवड असते, पण जागरण (कीर्तन-भजनासाठी रात्र जागणे) त्याला नकोसं वाटतं, त्याच्या पोटात कुपथ्यामुळे किडे झालेले असतात. तुकाराम म्हणतात - अशा माणसाने दोन्ही कुळं (आई व वडिलांची) बुडवली, कथेच्या सभेच्या मध्ये त्याचं तोंड काळं (नामुष्की, लाज) होतं.