Abhang 1000
तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥२॥ अनाथाचा नाथ बोलतील संत । ऐकोनियां मात विश्वासलों ॥३॥ न करावी निरास न धरावें उदास । देई याचकास कृपादान ॥४॥ तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देई पायापासीं ठाव देवा ॥५॥
मी तुला शरण आलो आहे, तुझा अंकित सेवक झालो आहे; पांडुरंगा, माझें खरें हित तूंच कर ॥१॥ ध्रु.॥ पतितांना पावन करणें हा तुझा लौकिक/बिरुद आहे; आई-बापा, तो आतां तूंच सांभाळ ॥२॥ संत म्हणतात की तूं अनाथांचा नाथ आहेस; हें ऐकूनच माझा विश्वास बसला ॥३॥ मला नाकारूं नकोस, उदासीन राहूं नकोस; या याचकाला कृपेचें दान दे ॥४॥ तुका म्हणतो, मी तर पापांची रास आहे; देवा, मला तुझ्या पायाशी थोडी जागा दे ॥५॥
pocketpage.in