Abhang 501
शब्दांचीं रत्ने करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥ ॥ ध्रु. ॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥२॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥३॥ रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥४॥ एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥५॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥६॥
शब्दांचे दागिने करून मी विश्वाला व्यापणाऱ्या देवाची पूजा केली. भक्तिभावाने केलेला नैवेद्य अर्पण करून नारायणाला जेवू घातले. संसार हातात देऊन आचवणाचे (हात धुण्याचे) पाणी दिले, मुख शुद्ध करायला मन अर्पण केले. सर्व इंद्रिये रंगून गेली, तीच सुंदर तांबूल-विडा झाली आणि डोक्यावर तुळशीपत्र वाहिले. एकनिष्ठ भावाचा दिवा करून देहाचेच आसन देवाला दिले. न बोलता तुका देवाच्या चरणांची सेवा करतो आणि देवाला आपल्या हृदयमंदिरात (माजघरात) निजवतो.