Abhang 561
मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥ ॥ध्रु.॥ चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ कोणाची बाईल होऊनियां वोठूं । संवसारीं काठूं आपदा किती ॥२॥ काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥३॥ कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥४॥ तुका ह्मणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥५॥
मलाच केंद्र करून यांनी हा योगीपणाचा उद्योग मांडला आहे; यातून मला काय सुख मिळाले? इतरांच्या घरी चालत सगळी सुखं येतात, पण माझी फजिती काही संपत नाही. मी कोणाची बायको होऊन हे सोसू? संसारात किती संकटे सहन करू? मुलांना खायला तरी काय देऊ, ती उपासमारीने मरतील; आता मेली तरी बरेच होईल असे वाटते. हे मला जगूही देत नाहीत, घर अगदी उघडे-बोडके आहे, जमीन सारवायला शेणही नाही. तुकाराम म्हणतात, बायको काही विचार न करता संसाराचा सगळा भार डोक्यावर घेऊन कण्हत राहते.