Abhang 575
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघे ची दुःख ॥१॥ ॥ध्रु.॥ ह्मणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ खवळलिया कामक्रोधीं । अंगीं भरती आधिव्याधी ॥२॥ तुका ह्मणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥
शांतीपेक्षा मोठं सुख नाही, बाकी सगळं दुःखच आहे. म्हणून शांती धरून ठेवा, म्हणजे तुम्ही पैलतीराला पोचाल. काम आणि क्रोध भडकले की अंगात नाना व्याधी-आजार भरतात. तुकाराम म्हणतात, शांती धरली की तिन्ही प्रकारचे ताप आपोआप निघून जातात.
pocketpage.in