Abhang 805
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं जाला सन्निपात ॥२॥ कावीळ जयाच्या जाहाली नेत्रासी । देखे तो चंद्रासी पीतवर्ण ॥३॥ तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥४॥
ज्याप्रमाणे नव्या तापाने अंग फणफणलेलं असताना दूधसुद्धा विषासारखं कडू लागतं, त्याचप्रमाणे ज्यांनी परमार्थाला दूर लोटलं, त्यांना जणू सन्निपातच झालेला असतो. ज्याच्या डोळ्यांना कावीळ झालेली असते, त्याला चंद्रसुद्धा पिवळा दिसतो. तुका म्हणतो, ज्याला दारू पिण्याची सवय लागली आहे, त्याला ताज्या लोण्याची गोडी कळत नाही.
pocketpage.in