Abhang 829
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पुढें नाडियेलें जग । नेतो लागों नेदी माग ॥२॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥३॥ वैकुंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥४॥ पुंडलिकें थारा । देउनि आणिलें या चोरा ॥५॥ तुका ह्मणे चला । तुह्मी आह्मी धरूं त्याला ॥६॥
हा भुलवणारा (मैंद) पंढरीत आला आहे, हातात प्रेमाचा पाश घेऊन. त्याने आधीच जगाला भुलवून टाकलं आहे, तो सगळ्यांना घेऊन जातो, मागमूसही लागू देत नाही. हात उभारून तो नुसत्या नजरानजरीनेच लोकांना मोहवून टाकतो. वैकुंठ सोडून त्याने पंढरीतच मुक्काम केला आहे. पुंडलिकाने त्याला आसरा देऊन या चोराला इथे आणून ठेवलं. तुका म्हणतो, चला, आपण सगळे मिळून याला पकडून बांधून टाकू.
pocketpage.in