Abhang 843
काय देह घाळूं करवती कर्मरीं । टाकूं या भीतरी अग्नीमाजी ॥१॥ ॥ ध्रु. ॥ काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मौन धरुनी बैसों ॥२॥ काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥३॥ काय त्यजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥४॥ तुका ह्मणे काय करावा उपाव । ऐसा देई भाव पांडुरंगा ॥५॥
देवा, काय करू, हा देह करवतीने कापून टाकू, की विस्तवात जाळून टाकू? रानावनात जाऊन थंडी-उन्हाचे, तहानेचे चटके सोसू, की मौन धरून स्वस्थ बसून राहू? अंगाला भस्म फासून चारी दिशांना तीर्थाटन करत फिरू, की उपवास करून अन्नत्याग करू आणि आपला जीव संपवत आणू? तुका म्हणतो, देवा, यातलं नेमकं काय करावं ते कळत नाही; तूच मला खरी भक्तिभावना दे.
pocketpage.in