Abhang 871
न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥१॥ ॥ध्रु.॥ दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लक उपायीं सिण जाला ॥२॥ येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥३॥ खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । वापुडे संसारीं सदा असों ॥४॥ शेवटा पाववी नावेचें बैसणें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥५॥ तुका ह्मणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥६॥
आता पोटासाठी काळजी करू नये; जे काही पूर्वसंचित आहे त्यावरच भागवावे ॥१॥ दृष्टी परमार्थाकडेच लावावी; क्षुल्लक (फुटकळ) उपायांनी नुसते श्रम होतात ॥२॥ या जगात बरोबर घेऊन जाण्यासारखे काही नाही; उगाच खोट्या गोष्टींसाठी आयुष्य खर्च करू नये ॥३॥ संसारातील येरझाऱ्यांचा त्रास कधी संपत नाही; तरीही आपण बिचारे त्यातच अडकून राहतो ॥४॥ नावेत बसणेच शेवटी किनाऱ्यास पोचवते; उगाच स्वतःच्या बाहुबळाने कष्ट कशाला करावेत? ॥५॥ तुकाराम म्हणतात, आता सर्वांचे सार एवढेच - व्यापार करायचाच असेल तर असाच (नामाचा) करावा ॥६॥