Abhang 883
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥ ॥ध्रु.॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ति ॥२॥ काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥३॥ तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित ह्मणउनी ॥४॥
दुसऱ्याचे बघून शिकलेला तोरा तो मिरवतो; पण गारगोटीचा खडा हिऱ्यासारखा कसा होईल? ॥१॥ अरे अभागी माणसा, आपली मर्यादा ओळख; देवाच्याच तोडीच्या का सगळ्या मूर्ती असतात? ॥२॥ कशाला खोटेपणाच्या मोहात पडला आहेस? ही खोटी थोरवी बाजूला सारून टाक ॥३॥ तुकाराम म्हणतात, पुढे तुझा घात होताना मला दिसतो आहे, म्हणूनच मी तुला असे उघड बोलून लाजवतो आहे ॥४॥
pocketpage.in