Abhang 903
तरि कां नेणते होते मागें ऋषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥ वोळगती जया अष्ट महासिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥ कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास रानां तरी केला ॥३॥ लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौनमुद्रे ॥४॥ तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥
पूर्वीचे ऋषी अज्ञानी नव्हते, म्हणूनच त्यांनी स्वतःला लोकांपासून दूर ठेवलं. ज्यांच्यापुढे आठही महासिद्धी हात जोडून उभ्या राहतात, तेदेखील सामान्य लोकांच्या संकुचित विचारांना शिवत नाहीत. ते कंदमुळे आणि पाला खाऊन शरीर जगवतात, आणि त्यासाठी रानावनात वास्तव्य करतात. डोळे मिटून स्वस्थ बसतात, मौन धारण करून काहीच बोलत नाहीत. तुकाराम म्हणतात, हे अनंता, माझ्याही मनाला असंच घडव - मला लोकांपासून दूर ठेव.
pocketpage.in