Abhang 904
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥१॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । जातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥ कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥ तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥
मी कोणाच्या आधारे विचार करू? मला धीर कोण देईल? मी काही शास्त्रज्ञ पंडित नाही, फक्त एक वाचणारा आहे; माझी जातकुळीही शुद्ध नाही. या कलियुगात लोक फार हुशार झाले आहेत, तुझे गुणगान गाऊ लागलो तरी ते मला छळतील. म्हणून देवा, भजन करावं की करू नये, याबद्दल माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तुकाराम म्हणतात, आता लोकांपासून दूर राहणं किंवा मरण - या दोन्हींतलं एक बरं.
pocketpage.in