Abhang 956
काय आतां आह्मीं पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मणौनि ॥१॥ ॥ ध्रु. ॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥२॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥३॥ तुका ह्मणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥४॥
आतां फक्त पोट भरण्यासाठीच मी भक्त म्हणवून जगाला फसवावें कां? ॥१॥ ध्रु.॥ हे देवा, एवढा एक विचार मला सांगा, यामुळें मी खूप अस्वस्थ होतो ॥२॥ कवित्व करण्याची केवळ रूढी घालून, नुसतीच अक्षरांची जुळवाजुळव करूं कां? ॥३॥ तुका म्हणतो, या धंद्यात गुंतून नारायणाचा घात करून इथेंच राहूं कां? ॥४॥
pocketpage.in