Abhang 983
करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥ ॥ ध्रु. ॥ माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥३॥ निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥४॥ तुका ह्मणे आहें पाईक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥५॥
मी कविता करतो असें कोणी म्हणेल, पण ही वाणी माझी स्वतःची नाही ॥१॥ ध्रु.॥ हा जो प्रकार आहे तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही, विश्वंभर देवच मला बोलवतो ॥२॥ मी पामर अर्थभेद तरी कुठें जाणतो? गोविंद जें बोलवतो तेंच मी बोलतो ॥३॥ मी फक्त एक निमित्तमात्र बसवलेला आहे, मी स्वतः कांहीच नाही, ही सगळी स्वामीची सत्ता आहे ॥४॥ तुका म्हणतो, मी खरोखर फक्त एक सेवक आहे, त्याच्या नामाची मुद्रा तेवढी वागवतो आहे ॥५॥
pocketpage.in