कथासरित्सागर
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
गुणाढ्य जंगलात आला
फार पूर्वी पार्वतीने शिवाच्या दोन गणांना शाप दिला होता, “पृथ्वीवर माणूस म्हणून जन्म घ्या.” त्यांतला एक होता पुष्पदंत. दुसरा त्याचा मित्र माल्यवान. त्याने पुष्पदंताची बाजू घेतली होती. पुष्पदंत वररुची नावाचा विद्वान म्हणून जन्मला होता. तो आता मुक्त झाला होता. शिवाची ती महान गोष्ट त्याने काणभूतीला सांगितली होती. काणभूती हा एक यक्ष. शापामुळे तो पिशाच होऊन विंध्याच्या जंगलात राहत होता. आता तो तिथे माल्यवानाची वाट पाहत होता. माल्यवान ती गोष्ट त्याच्याकडून ऐकेल, आणि जगभर पसरवेल. मग काणभूती आणि माल्यवान, दोघेही मुक्त होणार होते. माल्यवानाने गुणाढ्य नावाने माणसाचा जन्म घेतला होता. तो सातवाहन राजाचा मंत्री होता. राजासमोर त्याने एक प्रतिज्ञा केली होती. संस्कृत, आणि लोक बोलतात त्या आणखी दोन भाषा, त्याने सोडून दिल्या होत्या. ते कसे घडले, ते तो पुढे सांगणार होता. उदास मनाने तो विंध्याच्या डोंगरातल्या दुर्गादेवीच्या देवळात आला. आणि देवीच्या आज्ञेने काणभूतीला शोधायला निघाला.
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
झोपेतून जागे झाल्यासारखे
काणभूतीला पाहताच गुणाढ्याला एकदम आठवले, आपण पूर्वी कोण होतो. झोपेतून जागे व्हावे, तसे झाले. सोडलेल्या तीन भाषांपैकी एकही त्याला बोलता येत नव्हती. म्हणून तो चौथ्या भाषेत बोलला. ती होती पिशाचांची भाषा. त्याने काणभूतीला आपले नाव सांगितले. “लवकर,” तो म्हणाला, “माझा मित्र पुष्पदंत, त्याच्याकडून तू ऐकलेली गोष्ट मला सांग. म्हणजे तू आणि मी, दोघेही शापातून सुटू.” काणभूतीने आनंदाने त्याला नमस्कार केला. “ती गोष्ट मी सांगेनच,” तो म्हणाला. “पण स्वामी, मला फार उत्सुकता आहे. आधी माझ्यावर एक कृपा करा. जन्मापासून आजवर आपल्या आयुष्यात जे जे घडले, ते सगळे मला सांगा.” मग गुणाढ्याने काणभूतीला आपल्या आयुष्याची गोष्ट सांगितली.
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
एक बहीण, दोन भाऊ
प्रतिष्ठान देशात पूर्वी एक सज्जन ब्राह्मण राहत होता. त्याला दोन मुलगे होते, आणि श्रुतार्था नावाची एक मुलगी. कालांतराने तो आणि त्याची पत्नी वारले. मग दोघे भाऊ बहिणीचा सांभाळ करू लागले. एके दिवशी अचानक श्रुतार्थेला दिवस गेले. दुसरा कोणताही पुरुष तिच्याजवळ कधी फिरकला नव्हता. म्हणून प्रत्येक भाऊ दुसऱ्यावर संशय घेऊ लागला. त्यांच्या मनात काय आहे, ते श्रुतार्थेने ओळखले. “असे वाईट मनात आणू नका,” ती म्हणाली. “ऐका, मी तुम्हाला खरे काय ते सांगते. मी स्नानाला चालले होते. तेव्हा नागलोकातल्या एका राजपुत्राने मला पाहिले. तो नागांच्या राजाचा पुतण्या आहे. त्याचे माझ्यावर प्रेम बसले. त्याने मला आपले कुळ आणि नाव सांगितले. मग गांधर्व विवाह करून त्याने माझ्याशी लग्न केले. तो नाग असला, तरी जातीने ब्राह्मण आहे. हे मूल त्याचेच आहे.” “हे सगळे आम्ही खरे कसे मानायचे?” भाऊ म्हणाले.
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
गुणांनी संपन्न मूल
श्रुतार्थेने मनातल्या मनात त्या नाग राजपुत्राचे स्मरण केले. तो लगेच तिथे आला. “हे खरे आहे,” तो भावांना म्हणाला. “तुमच्या बहिणीला मी पत्नी करून घेतले आहे. ती स्वर्गातली अप्सरा आहे. एका शापामुळे ती पृथ्वीवर आली आहे. तुम्ही दोघेही त्याच कारणाने इथे आला आहात. तुमच्या बहिणीला इथे नक्की मुलगा होईल. मग ती आणि तुम्ही, सगळेच मुक्त व्हाल.” एवढे बोलून तो अदृश्य झाला. काही दिवसांनी श्रुतार्थेला मुलगा झाला. “तो मुलगा म्हणजे मीच,” गुणाढ्याने काणभूतीला सांगितले. त्याच क्षणी आकाशवाणी झाली, “हे मूल म्हणजे पृथ्वीवर जन्मलेला गुणच आहे. याचे नाव गुणाढ्य असेल. हा ब्राह्मण आहे.” गुणाढ्य म्हणजे गुणांनी संपन्न. मग त्यांचा शाप संपला, आणि त्याची आई व दोघे मामा मरण पावले. तो लहानगा दुःखाने व्याकूळ झाला.
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
पुन्हा घरी
पण गुणाढ्याने दुःख बाजूला सारले. तो लहान होता, तरी त्याला स्वतःच्या बळावर विश्वास होता. विद्या मिळवायला तो दक्षिणेकडे, दख्खनला गेला. कालांतराने तो सगळ्या शास्त्रांत पारंगत झाला, आणि त्याची कीर्ती पसरली. मग आपली विद्या दाखवायला तो आपल्या देशी परत आला. बऱ्याच काळाने तो आपल्या नगरात शिरला. भोवती शिष्यांचा गराडा होता. तिथे त्याला एक सुंदर दृश्य दिसले. एकीकडे काही जण रीतीप्रमाणे सामवेदाचे मंत्र गात होते. दुसरीकडे ब्राह्मण धर्मग्रंथांच्या अर्थावरून वाद घालत होते. तिसरीकडे जुगारी खोटेनाटे बोलून जुगाराचे गोडवे गात होते, “ज्याला जुगाराची कला येते, त्याच्या हातात खजिनाच असतो.” आणि आणखी एका ठिकाणी काही व्यापारी जमले होते. पैसा कमावण्यातल्या आपल्या हुशारीच्या ते बढाया मारत होते. त्यांच्यात एक व्यापारी बोलत होता.
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
व्यापाऱ्याची बढाई
“सावध माणूस पैशातून पैसा कमावतो, यात काही नवल नाही,” तो व्यापारी म्हणाला. “पण मी तर एकही पैसा नसताना माझी संपत्ती कमावली. “मी जन्मायच्या आधीच माझे वडील वारले. मग दुष्ट नातेवाइकांनी आईचे सगळे हडप केले. पोटातल्या बाळाची तिला काळजी वाटली. म्हणून ती माझ्या वडिलांच्या एका मित्राच्या घरी पळून गेली. तिथे माझा जन्म झाला. सगळ्यात कष्टाची, हलकी कामे करून तिने मला वाढवले. “ती फार गरीब होती. म्हणून तिने एका गुरुजींना विनवून राजी केले. त्यांनी मला धर्मार्थ लिहायला आणि हिशेब करायला शिकवले. मग आई म्हणाली, ‘तू व्यापाऱ्याचा मुलगा आहेस. आता तू व्यापार केला पाहिजेस. या देशात विशाखिल नावाचा एक मोठा श्रीमंत व्यापारी आहे. चांगल्या घरच्या गरीब तरुणांना तो पैसे उसने देतो. जा, सुरुवातीसाठी त्याच्याकडे काहीतरी माग.’”
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
भांडवल एका मेलेल्या उंदराचे
“म्हणून मी विशाखिलाच्या घरी गेलो,” व्यापारी पुढे सांगू लागला. “मी आत शिरलो, नेमका तेव्हाच तो एका व्यापाऱ्याच्या मुलावर रागाने ओरडत होता. “‘जमिनीवरचा हा मेलेला उंदीर दिसतो का?’ तो म्हणत होता. ‘हुशार माणूस यातूनसुद्धा पैसा कमावेल. हासुद्धा मालच आहे. पण नालायका, मी तुला कितीतरी मोहरा दिल्या. त्यांत भर घालणे दूरच, तुला त्या टिकवताही आल्या नाहीत.’ “हे ऐकताच मी लगेच पुढे झालो. ‘हा उंदीर मी तुमच्याकडून घेतो,’ मी विशाखिलाला म्हणालो. ‘व्यापारासाठी उसने भांडवल म्हणून.’ “मी उंदीर हातात उचलला, आणि त्याला त्याची पावती लिहून दिली. त्याने ती पावती आपल्या तिजोरीत ठेवली. मी निघालो. आणि विशाखिल? तो खो खो हसत सुटला.”
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
पावसात लाकडे
“मी तो उंदीर एका व्यापाऱ्याला त्याच्या मांजरीच्या खाण्यासाठी विकला. त्याने मला दोन मुठी चणे दिले. मी ते चणे कुटले. एक घडाभर पाणी घेतले. आणि गावाबाहेर एका चौकात सावलीत उभा राहिलो. “तिथून लाकूडतोड्यांचा एक घोळका आला. मी अदबीने त्यांना पाणी आणि चणे दिले. आभार म्हणून प्रत्येकाने मला दोन लाकडे दिली. ती लाकडे मी बाजारात विकली. त्या पैशांतल्या थोड्याशा भागातून आणखी चणे घेतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा लाकूडतोड्यांकडून लाकडे मिळवली. “असे मी रोज करू लागलो. हळूहळू माझे भांडवल वाढत गेले. मग लाकूडतोड्यांची तीन दिवसांची सगळी लाकडे मी विकत घेतली. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. कुठेच लाकूड मिळेना. मी माझी लाकडे कित्येक शेकडो नाण्यांना विकली.”
गुणाढ्य आणि उंदराचा व्यापारी
सोन्याचा उंदीर
“त्या पैशांतून मी दुकान थाटले,” व्यापारी म्हणाला. “व्यापार केला, आणि स्वतःच्या हुशारीने मोठा श्रीमंत झालो. “मग मी सोन्याचा एक उंदीर करवून घेतला, आणि तो विशाखिलाला दिला. आणि त्याने आपली मुलगी मला दिली. या सगळ्यामुळे लोक मला सगळीकडे ‘उंदीर’ म्हणतात. अशी ही सगळी संपत्ती मी खिशात एक दमडीही नसताना कमावली.” बाकीचे व्यापारी थक्क झाले. काहीही नसताना त्याने एवढी संपत्ती उभी केली होती! आपल्या नगरात परतताना गुणाढ्याला पावलोपावली अशी नवलाची दृश्ये दिसली. हे त्यांतलेच एक, असे त्याने काणभूतीला सांगितले. अकराव्या शतकात काश्मीरच्या सोमदेवाने संस्कृतमध्ये कथासरित्सागर लिहिला. सी. एच. टॉनी यांनी १८८० मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर केले. त्याच्या पहिल्या भागातल्या सहाव्या अध्यायावरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.