कथासरित्सागर
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
कौशांबीत दोन पाहुणे
विंध्याच्या जंगलात वररुची काणभूतीला आपल्या आयुष्याची गोष्ट सांगत होता. वररुची पूर्वी पुष्पदंत होता, शिवाचा गण. पार्वतीच्या शापामुळे तो माणूस म्हणून जन्मला होता. लहानपणी वररुची कौशांबीत आपल्या विधवा आईबरोबर राहत होता. एका रात्री दोन ब्राह्मण मुक्कामाला आले, व्याडी आणि इंद्रदत्त. एकदा ऐकलेले काहीही या मुलाला तोंडपाठ होते, हे त्यांना दिसून आले. मग ते कशासाठी आले होते, ते व्याडीने वररुचीच्या आईला सांगितले. त्याने सांगितलेली गोष्ट अशी.
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
व्याडीची गोष्ट
“आई,” व्याडी म्हणाला, “मी आणि इंद्रदत्त दोन भावांचे मुलगे. ते दोघे वेतस नगरातले ब्राह्मण. माझे वडील वारले. त्यांच्या दुःखाने इंद्रदत्ताचे वडीलही गेले. मग आमच्या आयांनीही दुःखाने खचून प्राण सोडले. “आमच्याकडे पैसा होता, पण वाट दाखवणारे कोणी नव्हते. आणि आम्हाला विद्या हवी होती. म्हणून आम्ही दक्षिणेकडे गेलो, आणि कार्तिकेयाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. त्याने स्वप्नात येऊन आम्हाला सांगितले, ‘नंद राजाची राजधानी पाटलिपुत्र. तिथे वर्ष नावाचा एक ब्राह्मण राहतो. त्याच्याकडून तुम्हाला सगळे ज्ञान मिळेल. तिथे जा.’ “म्हणून आम्ही पाटलिपुत्राला गेलो. पण तिथले लोक म्हणाले, ‘या गावात वर्ष नावाचा एक मठ्ठ ब्राह्मण आहे.’”
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
पडके घर
“त्यांचे घर अगदी पडायला आले होते,” व्याडी पुढे म्हणाला. “भिंतींना भेगा पडल्या होत्या. उंदरांनी त्याचे जणू वारूळ करून टाकले होते. “वर्ष आत ध्यान लावून बसले होते. म्हणून आम्ही त्यांच्या पत्नीकडे गेलो. ती रोडावलेली होती, मळलेली होती, अंगावर चिंध्या होत्या. तरी तिने आमचे प्रेमाने स्वागत केले. आम्ही तिला आमची हकीकत सांगितली. गावातले लोक तिच्या पतीविषयी काय म्हणतात, तेही सांगितले. “‘मुलांनो,’ ती म्हणाली, ‘खरे सांगायला मला लाज वाटत नाही.’ मग तिने आपल्या पतीविषयी सांगितले.”
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
पावसाळ्यातली प्रथा
वर्षांच्या पत्नीने सांगितले, की वर्षांना एक धाकटे भाऊ आहेत, उपवर्ष. वर्ष मंदबुद्धी होते, आणि गरीब. उपवर्ष नेमके त्यांच्या उलट. पावसाळ्यात गावातल्या बायकांची एक प्रथा आहे. त्या पिठात गूळ घालून एक पदार्थ भाजतात. त्याचा आकार पुरुषाच्या गुप्त इंद्रियासारखा असतो. जो ब्राह्मण त्यांना मठ्ठ वाटतो, त्याला तो देतात. ब्राह्मण तो घेत नाहीत, कारण ही प्रथा किळसवाणी आहे. उपवर्षांच्या पत्नीने तो पदार्थ वर्षांना दिला. त्यांनी तो घेतला, आणि घरी आणला. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना खूप बोल लावले. मग आपल्या मठ्ठपणाचे वर्षांना फार दुःख झाले. ते कार्तिकेयाची उपासना करायला गेले, आणि त्यांनी तपश्चर्या केली.
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
कार्तिकेयाचे वरदान
देव प्रसन्न झाला. त्याने वर्षांना सगळ्या विद्यांचे ज्ञान दिले. पण त्याबरोबर एक आज्ञाही दिली. “एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा ब्राह्मण मिळेल, तेव्हाच तू हे शिकवू शकशील.” वर्ष आनंदाने घरी आले, आणि त्यांनी पत्नीला सगळे सांगितले. तेव्हापासून ते जप आणि ध्यान करत बसले होते. “म्हणून एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा कोणी शोधा, आणि त्याला इथे घेऊन या,” वर्षांची पत्नी म्हणाली. “मग तुम्हा दोघांच्याही सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” तिची गरिबी पाहून व्याडी आणि इंद्रदत्ताने तिला सोन्याची शंभर नाणी दिली. मग त्यांनी ते नगर सोडले.
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
शोध संपला
“आम्ही पृथ्वीभर भटकलो,” व्याडी वररुचीच्या आईला म्हणाला. “पण एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा कोणीच कुठे मिळाला नाही. आज थकूनभागून आम्ही तुमच्या घरी आलो. आणि इथे तुमचा मुलगा भेटला. तो एकदा ऐकलेले लक्षात ठेवतो. “म्हणून त्याला आमच्याबरोबर पाठवा. आम्ही जाऊन विद्या मिळवू.” वररुचीच्या आईने आदराने उत्तर दिले. “सगळे जुळते आहे,” ती म्हणाली. “माझा तुमच्यावर विश्वास आहे. “माझा एकुलता एक मुलगा जन्मला, तेव्हा मला एक आकाशवाणी ऐकू आली. बोलणारे कोणी दिसत नव्हते. ती वाणी म्हणाली, ‘एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा मुलगा जन्मला आहे. तो वर्षांकडून शिकेल. तो व्याकरणशास्त्र जगात प्रसिद्ध करेल.’”
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
नावाचा अर्थ
त्या वाणीने त्याचे नावही ठेवले होते, असे आई म्हणाली. संस्कृतमध्ये ‘वर’ म्हणजे श्रेष्ठ, आणि ‘रुच्’ म्हणजे रुचणे, आवडणे. “जे जे श्रेष्ठ, ते ते याला रुचेल. म्हणून याचे नाव वररुची,” असे ती वाणी म्हणाली होती. “तो मोठा होऊ लागला, तेव्हापासून मी रात्रंदिवस विचार करते आहे,” ती व्याडी आणि इंद्रदत्ताला म्हणाली. “हे वर्ष गुरू कुठे असतील? आज तुमच्याकडून कळले, आणि मला आनंद झाला. याला घेऊन जा. त्यात काय वाईट होणार? तो तुमच्या भावासारखाच आहे.” दोघे मित्र इतके आनंदले, की ती रात्र क्षणात संपल्यासारखी वाटली.
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
घर सोडले
मग व्याडीने वररुचीच्या आईला जेवणावळीसाठी स्वतःचे पैसे दिले, आणि मुलाची मुंज केली. निरोप घेताना वररुचीने मोठ्या धीराने आपले दुःख आवरले. आईला मात्र अश्रू आवरता आवरेनात. कार्तिकेयाने आपल्याला दिलेले वचन खरे झाले, असे व्याडी आणि इंद्रदत्ताला वाटले. ते वररुचीला घेऊन लगेच निघाले, आणि यथावकाश वर्षांच्या घरी पोहोचले. वर्षांनाही हा मुलगा म्हणजे माणसाचे रूप घेऊन आलेली कार्तिकेयाची कृपाच वाटली.
मठ्ठ ब्राह्मण झाले थोर गुरू
पवित्र ओंकार
दुसऱ्या दिवशी वर्षांनी तिघांना आपल्यासमोर बसवले. ते स्वतः एका पवित्र जागी बसले, आणि दिव्य स्वरात ओंकाराचा उच्चार करू लागले. लगेच सहा वेदांगांसकट सगळे वेद त्यांना एकदम स्फुरले. ते शिकवू लागले. गुरू सांगत, ते वररुचीला एकदा ऐकून पाठ होई. व्याडीला ते दोनदा ऐकावे लागे, आणि इंद्रदत्ताला तीनदा. तो दिव्य स्वर ऐकून नगरातले ब्राह्मण ते नवल पाहायला सगळीकडून धावत आले. त्यांनी वर्षांना वाकून नमस्कार केला, आणि त्यांची स्तुती केली. त्यांचे भाऊ उपवर्ष आणि सगळ्या नगराने उत्सव साजरा केला. नंद राजालाही खूप आनंद झाला. त्याने वर्षांचे घर धनाने भरून टाकले, आणि त्यांचा सर्व प्रकारे सन्मान केला. पाटलिपुत्रातले मठ्ठ ब्राह्मण आता पाटलिपुत्राचे थोर गुरू झाले होते. अकराव्या शतकात काश्मीरच्या सोमदेवाने संस्कृतमध्ये कथासरित्सागर लिहिला. सी. एच. टॉनी यांनी १८८० मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर केले. त्याच्या पहिल्या भागातल्या दुसऱ्या अध्यायावरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.