कथासरित्सागर
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
सोने मिळालेला ब्राह्मण
विंध्याच्या जंगलात गुणाढ्य पिशाच काणभूतीला आपल्या आयुष्याची गोष्ट सांगत होता. तो पिशाचांच्या भाषेत बोलत होता. पूर्वी तो माल्यवान होता, शिवाचा गण. शिवाची गोष्ट काणभूतीकडून ऐकून तो जगात पसरवेल, तेव्हा तो पार्वतीच्या शापातून सुटणार होता. मोठा विद्वान होऊन तो घरी परतला होता. शिष्यांबरोबर तो नगरातून चालला होता. तिथे त्याला एक ब्राह्मण दिसला. सामवेदाचे मंत्र गाणे, हेच त्याचे काम होते. सामवेद म्हणजे गाऊन म्हणायच्या मंत्रांचा वेद. कोणीतरी या ब्राह्मणाला सोन्याच्या आठ मोहरा दिल्या होत्या. नगरातल्या एका रंगेल गृहस्थाने त्याला सल्ला दिला. “तुम्ही ब्राह्मण आहात, त्यामुळे पोटापुरते तुम्हाला मिळतेच,” तो म्हणाला. “हे सोने जगाचे व्यवहार शिकण्यात खर्च करा. मग तुम्ही जाणते व्हाल.” आता, साम या शब्दाला दोन अर्थ आहेत. एक, हा ब्राह्मण गात असे ते सामवेदाचे मंत्र. दुसरा, गोड बोलून मन वळवणे, लाडीगोडी. साम, दाम, दंड, भेद यांतले साम ते हेच.
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
थोडेसे साम
“मला कोण शिकवणार?” त्या मूर्खाने विचारले. “चतुरिका नावाच्या गणिकेच्या घरी जा,” रंगेल गृहस्थ म्हणाला. “तिथे मी काय करायचे?” ब्राह्मणाने विचारले. “तिला सोने द्या,” तो म्हणाला, “आणि थोडेसे साम वापरून तिला खूश करा.” मग तो ब्राह्मण लगबगीने चतुरिकेच्या घरी गेला. ती त्याला सामोरी आली, आणि तो बसला. त्याने तिला सोने दिले, आणि अडखळत म्हणाला, “आता ही दक्षिणा घ्या, आणि मला जगाचे व्यवहार शिकवा.” तिथली मंडळी फिदीफिदी हसू लागली. ब्राह्मणाने क्षणभर विचार केला. मग गायीच्या कानासारखे हात जुळवून त्याने एक प्रकारची पुंगी केली. आणि किनऱ्या आवाजात तो सामवेद गाऊ लागला.
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
अर्धचंद्र
घरातले सगळे रंगेल लोक गंमत पाहायला भोवती जमले. “हा कोल्हा इथे कुठून घुसला?” ते म्हणाले. “चला, लवकर याच्या गळ्यावर अर्धचंद्र देऊ या!” अर्धचंद्र देणे म्हणजे चंद्रकोरीसारखा हात वाकवून गळा धरणे, आणि बाहेर हाकलून देणे. पण ब्राह्मणाला वाटले, अर्धचंद्र म्हणजे चंद्रकोरीच्या आकाराचे टोक असलेला बाण. आता हे आपले मुंडके उडवणार, अशी त्याला भीती वाटली. “मी जगाचे व्यवहार शिकलो!” असे बेंबीच्या देठापासून ओरडत तो घरातून पळत सुटला.
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
गायीचा चारा
ज्याने त्याला पाठवले होते, त्या माणसाकडे ब्राह्मण गेला. त्याने सगळी हकीकत सांगितली. रंगेल गृहस्थाला हसू आवरेना. “मी साम वापरा म्हणालो,” तो म्हणाला, “तेव्हा मला गोड बोलणे, लाडीगोडी म्हणायचे होते. अशा कामात वेदाचे काय काम? वेद डोक्यात कोंबून कोंबून तुम्ही पुरते मूर्ख झालात, असे दिसते.” हसत हसतच तो चतुरिकेच्या घरी गेला. “त्या दोन पायांच्या गायीचा सोन्याचा चारा त्याला परत दे,” तो म्हणाला. चतुरिकाही हसली, आणि तिने पैसे परत दिले. ते हातात पडताच ब्राह्मण घरी गेला. जणू त्याचा पुनर्जन्मच झाला होता, इतका तो आनंदात होता.
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
राजाचा मंत्री
पावलोपावली अशी नवलाची दृश्ये पाहत गुणाढ्य राजवाड्यात आला. तो राजवाडा इंद्राच्या दरबारासारखा वैभवशाली होता. गुणाढ्य आल्याची वर्दी द्यायला त्याचे शिष्य पुढे आत गेले. सातवाहन राजा आपल्या सभेत रत्नजडित सिंहासनावर बसला होता. भोवती त्याचे मंत्री होते. त्यांच्यात शर्ववर्मा नावाचा एक मंत्री होता. गुणाढ्याने राजाला आशीर्वाद दिला, आणि तो आसनावर बसला. राजाने त्याचा सन्मान केला. मग शर्ववर्म्याने आणि इतर मंत्र्यांनी त्याची स्तुती केली. “महाराज, हे सगळ्या विद्यांत पारंगत आहेत. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली आहे. गुणाढ्य, म्हणजे गुणांनी संपन्न. हे नाव यांना खरोखर शोभते.” गुणाढ्याची अशी स्तुती ऐकून राजा खूश झाला. त्याने लगेच त्याला मंत्री केले. गुणाढ्याने लग्न केले, आणि तो तिथे सुखाने राहू लागला. राजाचे कामकाज पाहायचे, आणि शिष्यांना शिकवायचे, असा त्याचा दिनक्रम होता.
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
गोदावरीकाठची बाग
एकदा गुणाढ्य गोदावरीच्या काठाने निवांत फिरत होता. तिथे त्याला एक बाग दिसली. ती इतकी सुंदर होती, की स्वर्गातली देवांची बागच वाटावी. ही बाग इथे कशी आली, असे त्याने माळ्याला विचारले. “स्वामी,” माळी म्हणाला, “जुन्याजाणत्या लोकांकडून आम्ही अशी गोष्ट ऐकली आहे. फार पूर्वी इथे एक ब्राह्मण आला. तो मौन पाळत असे, आणि काहीही न खाता राहत असे. त्याने ही स्वर्गीय बाग तयार केली, आणि तिच्यात एक देऊळ बांधले. “तो कोण आहे, हे जाणून घ्यायला इथले सगळे ब्राह्मण जमले. ते त्याला पुन्हा पुन्हा विचारत राहिले. शेवटी त्याने त्यांना आपली गोष्ट सांगितली.”
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
आळशी ब्राह्मणाची गोष्ट
“त्याने सांगितले, तो नर्मदेच्या काठच्या एका प्रांतात ब्राह्मण म्हणून जन्मला होता. कोणीच त्याला भिक्षा घालत नसे, कारण तो गरीब तर होताच, शिवाय आळशीही होता. शेवटी जगण्याला कंटाळून त्याने घर सोडले. एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्री भटकत तो विंध्याच्या डोंगरातल्या दुर्गादेवीच्या देवळात आला. “देवीला पाहून त्याच्या मनात आले, ‘लोक या देवीला पशूंचा बळी देऊन प्रसन्न करतात. मी तर एखाद्या मूर्ख जनावरासारखाच आहे. तेव्हा इथे देवीसमोर मीच माझा जीव देतो.’ “स्वतःचे मस्तक तोडायला त्याने तलवार उचलली. तत्क्षणी देवी स्वतः त्याच्याशी बोलली, कारण ती त्याच्यावर प्रसन्न झाली होती. ‘बाळा,’ ती म्हणाली, ‘तुला सिद्धी मिळाली आहे. जीव देऊ नकोस. इथेच माझ्याजवळ राहा.’”
सामवेदी ब्राह्मण आणि देवीची बाग
स्वर्गातले बी
“मग देवीने त्याला वर दिला,” माळी पुढे सांगू लागला, “आणि तो दिव्य झाला. त्या दिवसापासून त्याला ना भूक लागली, ना तहान. “मग एके दिवशी देवी त्याला म्हणाली, ‘बाळा, जा, प्रतिष्ठानात एक सुंदर बाग लाव.’ तिने स्वतःच्या हाताने त्याला स्वर्गातले बी दिले. तो इथे आला, आणि देवीच्या प्रभावाने त्याने ही सुंदर बाग तयार केली. “‘आता तुम्ही ही बाग नीट राखा,’ तो ब्राह्मणांना म्हणाला. एवढे बोलून तो अदृश्य झाला. तर स्वामी, अशी ही बाग फार पूर्वी देवीने तयार केली.” देवीने अशी कृपा केली, हे ऐकून गुणाढ्य मनात नवल करत घरी गेला. अकराव्या शतकात काश्मीरच्या सोमदेवाने संस्कृतमध्ये कथासरित्सागर लिहिला. सी. एच. टॉनी यांनी १८८० मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर केले. त्याच्या पहिल्या भागातल्या सहाव्या अध्यायावरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.