शुकसप्तति
आनंद झाला की नाही?
वहाणांचे पैसे
आणखी एका संध्याकाळी अंधार पडू लागला, तेव्हा प्रभावतीने पोपटाला विचारले, “मी बाहेर जाऊ का?” पोपट म्हणाला, “जा बाई, पण श्रीधर ब्राह्मणासारखे उत्तर तुला सुचले तरच.” प्रभावतीने विचारले, “ते कसे?” आणि पोपटाने गोष्ट सुरू केली. चर्मकूट गावात श्रीधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच गावात चंदन नावाचा एक चांभार राहत होता. श्रीधराने चंदनाकडून वहाणांची एक जोडी शिवून घेतली. चांभार रोज पैसे मागे. आणि रोज श्रीधर त्याला एकच उत्तर देई, “मी तुला आनंद देईन.” पैसे मात्र त्याने कधीच दिले नाहीत. असा बराच काळ गेला. मग एके दिवशी चांभाराने श्रीधराला धरले, आणि तो त्याला सोडेना. पण श्रीधराकडे पैसा अजिबात नव्हता. पोपट म्हणाला, “आता सांग, तो कसा सुटला असेल?”
आनंद झाला की नाही?
गावात आनंदाची बातमी
उत्तर ऐकायला प्रभावती घरीच थांबली, आणि पोपट पुढे सांगू लागला. त्याच वेळी गावच्या पाटलाच्या घरी मुलगा जन्मला. श्रीधर नेहमी काहीतरी युक्ती शोधतच असे. आता त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, “चांभारा, मी तुला आनंद देईन, असे मी तुला फार पूर्वीच सांगितले होते. आता पाटलाला मुलगा झाला आहे. बोल, तुला आनंद झाला की नाही?” चांभार पेचात सापडला. “मला आनंद झाला नाही,” असे म्हणावे, तर राजा कदाचित त्याला पकडवील. “झाला,” असे म्हणावे, तर श्रीधराने दिलेला शब्द पाळला, असे होणार. मग वहाणांचे पैसे बुडणार. म्हणून तो म्हणाला, “मला आनंद झाला.” अशा रीतीने श्रीधर युक्तीने सुटला आणि निघून गेला. पोपट म्हणाला, “तर बाई, तुला असे उत्तर सुचत असेल, तर जा.” आणि प्रभावती झोपायला गेली. शुकसप्तति, म्हणजे ‘पोपटाच्या सत्तर गोष्टी’, हा संस्कृत कथासंग्रह बाराव्या शतकापूर्वीचा आहे. ही पंचावन्नाव्या रात्रीची गोष्ट आहे. बी. हेल वर्थम यांनी १९११ मध्ये केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून, संस्कृत मूळाशी ताडून, ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.