शुकसप्तति
गणपतीचे पाच मांडे
राजाची जागरणाची रात्र
आदल्या रात्री पोपटाने उज्जयिनीच्या विक्रमादित्य राजाची एक गोष्ट सुरू केली होती. राजाने राणीला तळलेले मासे देऊ केले होते. ती म्हणाली, “हे तर नर! यांना शिवणे राहू द्या, यांच्याकडे पाहणेसुद्धा मला सहन होत नाही.” ते ऐकून ताटातले मासे मोठ्याने हसले. ते का हसले, हे राजाला कुणीच सांगू शकले नाही. मग राजपुरोहिताची हुशार मुलगी बालपंडिता हिने त्याबद्दल राजाला एक श्लोकातले कोडे घातले होते, आणि ती घरी गेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रभावतीने पोपटाला विचारले, “पोपटा, मासे का हसले, हे राजाला कधी कळले का?” पोपट म्हणाला, “ते कोडे राजाला उलगडले नाही. रात्रभर त्याला झोप लागली नाही. सकाळी त्याने बालपंडितेला बोलावून घेतले. तो म्हणाला, ‘मुली, तुझ्या कोड्याचा अर्थ मला लागत नाही. तेव्हा मासे का हसले, ते तूच सांग.’ “बालपंडिता म्हणाली, ‘महाराज, मला विचारू नका. नाहीतर एका व्यापाऱ्याच्या बायकोसारखे तुम्हाला पस्तावावे लागेल. मांडे कुठून येतात, हे कळल्याशिवाय ती स्वस्थ बसली नाही.’ राजाने विचारले, ‘ते कसे?’” आणि बालपंडितेने राजाला सांगितलेली ती गोष्ट पोपटाने प्रभावतीला सांगितली. जयंती नगरात सुमती नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या बायकोचे नाव पद्मिनी. त्याचे पुण्य संपले आणि त्याचे सगळे धन गेले. सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. कारण लोक पैसेवाल्यांचीच कदर करतात. मग सुमती जंगलातून गवत आणि लाकडे आणी आणि नगरात विकी. एके दिवशी त्याला ना गवत मिळाले, ना लाकूड. त्याला मिळाली फक्त कठीण लाकडात कोरलेली गणपतीची एक मूर्ती. ती फोडून सरपण करायचे, असे त्याने ठरवले.
गणपतीचे पाच मांडे
गुपित
मूर्ती फोडायला तो उठला, तेवढ्यात गणपती त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, “मी तुला रोज साखर-तूप घातलेले पाच मांडे देईन. रोज सकाळी माझ्या देवळात ये. पण हे गुपित कुणालाही सांगू नकोस. सांगितलेस, तर माझे वचन टिकणार नाही.” सुमतीने ते कबूल केले. रोज तो ते पाच मांडे बायकोच्या हाती देई. त्यांच्यावर पद्मिनी सगळ्या घराचे पोट भरी. काही मांडे ती नातेवाइकांच्या घरी पाठवी, आणि रोज काही मंदोदरीकडे पाठवी. मंदोदरी तिची जिवलग मैत्रीण होती. पण हे मांडे कुठून येतात, हे पद्मिनीलाच ठाऊक नव्हते. एके दिवशी मंदोदरीने तिला विचारले, “हे मांडे कुठून येतात गं?” पद्मिनीला सांगता आले नाही. मग मंदोदरी कावेबाजपणे म्हणाली, “माझ्यापासूनच गुपित लपवतेस, मग कसली मैत्रीण तू? मैत्रिणी एकमेकींना देतात आणि घेतात, गुपिते सांगतात आणि विचारतात, एकत्र जेवतात आणि एकमेकींना जेवू घालतात.” पद्मिनी म्हणाली, “माझा नवरा मला सांगतच नाही. शंभर वेळा विचारले मी.” मंदोदरी म्हणाली, “एवढी गोष्ट तुला कळत नसेल, तर तुझे जगणे, तुझे रूप, तुझे तारुण्य सगळे फुकटच.” म्हणून पद्मिनीने नवऱ्याला विचारले, “हे मांडे आपल्याला कसे मिळतात?” सुमतीने गुपित फोडले नाही. तो म्हणाला, “दैवाच्या कृपेने. एकदा एका टोपलीत एक साप वेटोळे घालून उपाशी पडला होता. रात्री एका उंदराने टोपलीला भोक पाडले, आणि उंदीर थेट सापाच्या तोंडातच पडला. साप उंदराला खाऊन उंदराच्या त्याच भोकातून बाहेर निघून गेला. माणसाला वर नेते तेही दैवच, आणि खाली आणते तेही दैवच.”
गणपतीचे पाच मांडे
कुऱ्हाड
नवरा सांगत नाही म्हणून पद्मिनीने अन्न सोडले. सुमती म्हणाला, “मी सांगितले, तर मोठा अनर्थ होईल, आणि तुला पस्तावावे लागेल.” पण त्याने कितीही बजावले, तरी ती हट्ट सोडेना. दैवामुळे सुमतीची बुद्धी फिरली होती. त्याने तिला गुपित सांगितले. पद्मिनी मंदोदरीकडे गेली आणि तिला सगळे सांगून टाकले. मंदोदरीने स्वतःच्या नवऱ्याला हातात कुऱ्हाड देऊन गणपतीकडे पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आणि सुमती दोघेही देवळात पोहोचले. गणपतीने दोघांनाही बांधून घातले, सुमतीला आणि कुऱ्हाडवाल्यालाही. मग ते सुमतीला म्हणाले, “हे संकट तू स्वतःच ओढवून घेतले आहेस. म्हणून शिक्षा तुलाच.” मंदोदरीच्या नवऱ्याने गणपतीकडे मांडे मागितले, आणि गणपतीने ते पाच मांडे त्याला दिले. दोघेही घरी परतले. आणि स्वतःच्या करणीचा पद्मिनीला पस्तावा झाला. बालपंडिता म्हणाली, “तेव्हा महाराज, तुम्हीही मला विचारू नका, नाहीतर तुम्हाला पस्तावावे लागेल. कोडे तुमचे तुम्हीच सोडवा.” एवढे बोलून ती उठली आणि घरी गेली. आणि प्रभावती झोपायला गेली. शुकसप्तति, म्हणजे ‘पोपटाच्या सत्तर गोष्टी’, हा संस्कृत कथासंग्रह बाराव्या शतकापूर्वीचा आहे. ही सहाव्या रात्रीची गोष्ट आहे. बी. हेल वर्थम यांनी १९११ मध्ये केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून, संस्कृत मूळाशी ताडून, ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. पोपटाच्या गोष्टीत बालपंडिता ही गोष्ट विक्रमादित्य राजाला सांगते. ती हसणाऱ्या माशांच्या गोष्टीत येते. ती गोष्ट पाचव्या रात्रीपासून नवव्या रात्रीपर्यंत चालते.