शुकसप्तति
लक्ष्मी आणि दूती
लक्ष्मीसाठी निरोप
तर, त्या पहिल्या संध्याकाळी प्रभावती मैत्रिणींसह घरीच बसली, आणि पोपटाने गोष्ट सुरू केली. चंद्रावती नगरात मोहन नावाचा एक श्रीमंत तरुण राहत होता. तो एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. त्याच नगरातली लक्ष्मी नावाची एक विवाहित स्त्री त्याला हवी होती. तिचा नवराही व्यापाऱ्याचाच मुलगा होता. पण लक्ष्मी तयार होईना. म्हणून मोहन पूर्णा नावाच्या एका बाईकडे गेला. एकेका वेळी महिनाभर उपवास करणारी म्हणून ती प्रसिद्ध होती. मोहनाने तिला भरपूर पैसे दिले. मग लक्ष्मीचा नवरा परगावी गेला असताना, मोहनाने स्वतःच्या वतीने बोलायला पूर्णेला लक्ष्मीच्या घरी पाठवले. पूर्णेने गोड गोड बोलून लक्ष्मीला आपलेसे केले. शेवटी लक्ष्मी म्हणाली, “तू जे मागशील, ते मी करीन.” पूर्णा म्हणाली, “मग मी सांगेन त्या पुरुषाला जवळ कर.” लक्ष्मी म्हणाली, “चांगल्या घरच्या बाईला हे शोभत नाही. पण मी तुला शब्द दिला आहे. तो मी पाळीन.” पूर्णेला फार आनंद झाला. त्या संध्याकाळी मोहनाला भेटवायला ती लक्ष्मीला स्वतःच्या घरी घेऊन गेली. पण मोहन कुठल्याशा कामात अडकला, आणि ठरलेल्या वेळी आला नाही. आता लक्ष्मीला प्रियकराची ओढ लागली होती. ती म्हणाली, “मग कुणीही पुरुष घेऊन ये.” म्हणून पूर्णा बाहेर गेली, आणि ती मूर्ख बाई नेमका लक्ष्मीचा स्वतःचाच नवरा घेऊन आली. पोपट म्हणाला, “दारात तर तिचा नवरा उभा! आता सांग, तिने काय केले असेल?”
लक्ष्मी आणि दूती
केसांना धरले
प्रभावती आणि तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, “आम्हाला नाही सुचत. तूच सांग.” पोपट म्हणाला, “तू गेली नाहीस, तर सांगतो.” प्रभावती म्हणाली, “मी जाणार नाही.” मग उत्तर ऐकायला प्रभावती घरीच थांबली, आणि पोपट पुढे सांगू लागला. आत येणारा माणूस स्वतःचाच नवरा आहे, हे लक्ष्मीने लगेच ओळखले. तिने त्याला केसांना धरले आणि ती ओरडली, “लबाडा! माझ्याशिवाय दुसरी कुठलीच बाई तुला आवडत नाही, असे तू मला नेहमी सांगतोस. तुझी परीक्षा घ्यायला मी हे सगळे जुळवून आणले होते. आता मला खरे काय ते कळले.” आणि ती त्याच्यावर तावातावाने भडकली. तिचा राग शांत करायला नवऱ्याला कितीतरी गोड बोलून तिची समजूत घालावी लागली. शेवटी तो तिला घरी घेऊन गेला. आणि प्रभावती झोपायला गेली. शुकसप्तति, म्हणजे ‘पोपटाच्या सत्तर गोष्टी’, हा संस्कृत कथासंग्रह बाराव्या शतकापूर्वीचा आहे. ही पहिल्या रात्रीची गोष्ट आहे. बी. हेल वर्थम यांनी १९११ मध्ये केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून, संस्कृत मूळाशी ताडून, ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.