शुकसप्तति
लंगडा ब्राह्मण आणि चोर
वाटेत चोर
आणखी एका संध्याकाळी प्रभावतीने पोपटाला विचारले, “मी बाहेर जाऊ का?” पोपट म्हणाला, “जा बाई, पण संकटात गांगिलासारखे बोलायला तुला सुचले तरच.” प्रभावती म्हणाली, “मला ती गोष्ट ठाऊक नाही. ती मला सांग.” आणि पोपटाने गोष्ट सुरू केली. चमत्कारपूर नावाचे एक नगर आहे. तिथे विद्वान आणि धार्मिक लोक राहतात. एकदा त्या नगरातले काही ब्राह्मण यात्रेला निघाले. वलभीनाथ नावाच्या देवाच्या दर्शनाला ते जात होते. ते चांगले सुखवस्तू होते. गाड्या, घोडे घेऊन ते थाटात प्रवास करत होते. बायका-मुले, उंची कपडे आणि वाटेसाठी भरपूर शिधा त्यांनी बरोबर घेतला होता. वाटेत चोरांची एक टोळी त्यांच्यावर तुटून पडली. सगळे ब्राह्मण घाबरले आणि जीव वाचवायला पळत सुटले. पण गांगिल नावाचा एक ब्राह्मण लंगडा होता. इतरांबरोबर त्याला पळता येईना. तो गाडीतच बसून राहिला, आणि चोरांनी त्याला चहूबाजूंनी घेरले. त्याचा भाऊ त्याच्याजवळ होता. काय करावे, ते त्याला सुचत नव्हते. पोपट म्हणाला, “आता सांग, तो कसा सुटला असेल?”
लंगडा ब्राह्मण आणि चोर
लंगड्याचे धनुष्य
उत्तर ऐकायला प्रभावती घरीच थांबली, आणि पोपट पुढे सांगू लागला. गांगिलाला पळता येत नव्हते. म्हणून त्याने धिटाईचा आव आणला. जणू त्याला जगात कशाचीच भीती नव्हती, अशा थाटात त्याने भावाला हाक मारली. तो म्हणाला, “भाऊ, सांग बरे, आपल्याकडे हत्ती किती आणि घोडे किती? आणि लवकर माझे धनुष्य आणि बाण दे. दिव्य अस्त्राने मी या सगळ्यांना एकदम मारून टाकतो.” हे ऐकताच सगळे चोर पळून गेले. पोपट म्हणाला, “ज्याला बोलायचे कसे ते कळते, त्याला कुणी हरवू शकत नाही.” आणि प्रभावती झोपायला गेली. शुकसप्तति, म्हणजे ‘पोपटाच्या सत्तर गोष्टी’, हा संस्कृत कथासंग्रह बाराव्या शतकापूर्वीचा आहे. ही एक्कावन्नाव्या रात्रीची गोष्ट आहे. बी. हेल वर्थम यांनी १९११ मध्ये केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून, संस्कृत मूळाशी ताडून, ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.