शुकसप्तति
नायिनीची रेशमी चोळी
पंचायतीत रावडी
आणखी एका संध्याकाळी, अंधार पडू लागला तशी प्रभावती पोपटाला म्हणाली, “मी बाहेर जाते.” पोपट म्हणाला, “जा सुंदरी, पण नायिनीसारखे उत्तर तुला देता आले तरच.” प्रभावतीने विचारले, “कोण ही नायिनी? ती कुठे राहत होती, आणि तिने काय उत्तर दिले? सांग ना ती गोष्ट.” आणि पोपटाने गोष्ट सुरू केली. सरड नावाच्या गावात शूरपाल नावाचा पाटील राहत होता. त्याची बायको नायिनी त्याच्यामागे सारखी रेशमी चोळीसाठी लकडा लावत असे. तो म्हणे, “आपण शेतकरी माणसे. आपण सुती कपडे घालतो. आपल्या घरात रेशमाचे नावसुद्धा कुणी काढत नाही.” रावडी म्हणजे भरड कण्यांची पेज, गरिबाचे अन्न. एके दिवशी शूरपाल गावच्या पंचायतीत बसला होता. नायिनीने तिथे त्याला हाक मारली, “धनी, घरी ये, रावडी खा!” म्हणजे पाटील गरीब आहे, हेच तिने भर पंचायतीत सांगून टाकले. घरी आल्यावर शूरपाल तिला म्हणाला, “अगं, पंचायतीत तू असे का बोललीस? त्या बोलण्याने मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. मला ते मुळीच आवडले नाही.” नायिनी म्हणाली, “आणि मला आवडते ते तू का केले नाहीस?” मग पाटलाने तिच्याशी सौदा केला. तो म्हणाला, “मी आज तुला चोळी देतो, पण तू तुझे शब्द मागे घे.” नायिनी म्हणाली, “चोळी मिळाली की घेते मागे.” मग त्याने तिला चोळी दिली. पोपट म्हणाला, “आता सांग, तिने ते शब्द कसे मागे घेतले असतील?”
नायिनीची रेशमी चोळी
गावाला मेजवानी
उत्तर ऐकायला प्रभावती घरीच थांबली, आणि पोपट पुढे सांगू लागला. एके दिवशी नायिनी नवऱ्याला म्हणाली, “आज तू पंचायतीत असताना मी तुला पुन्हा मागच्यासारखीच हाक मारीन. मी हाक मारली की सगळ्या पंचांना घेऊन घरी ये.” शूरपालाने तसेच केले. सगळी पंचायत घरी आली, तेव्हा नायिनीने सगळ्यांना थाटाचे जेवण वाढले. तेव्हा गावचे लोक म्हणाले, “शूरपाल तर चांगला सधन आहे. गर्विष्ठ दिसू नये म्हणूनच त्याची बायको तसे बोलली.” अशा रीतीने नायिनीने स्वतःचे शब्द मागे घेतले. आणि प्रभावती झोपायला गेली. शुकसप्तति, म्हणजे ‘पोपटाच्या सत्तर गोष्टी’, हा संस्कृत कथासंग्रह बाराव्या शतकापूर्वीचा आहे. ही छत्तिसाव्या रात्रीची गोष्ट आहे. बी. हेल वर्थम यांनी १९११ मध्ये केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून, संस्कृत मूळाशी ताडून, ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.