शुकसप्तति
पाणी की जमीन?
रत्नांचे सभागृह
आणखी एका संध्याकाळी प्रभावतीने पोपटाला विचारले, “मी बाहेर जाऊ का?” पोपट म्हणाला, “जा बाई, पण वीर राजाच्या सभागृहात त्या दूताने जशी शंका सोडवली, तशी तुला सोडवता आली तरच.” प्रभावतीने विचारले, “ते कसे?” आणि पोपटाने गोष्ट सुरू केली. वीर राजाचे एक अद्भुत सभागृह होते. ते देवांनी बांधले आहे, असे लोक म्हणत. त्यात सगळीकडे नाना प्रकारची रत्ने जडवलेली होती. दुसऱ्या एका राजाने त्याची कीर्ती ऐकली. ते पाहायला त्याने एक दूत पाठवला, आणि बरोबर हजार भेटी दिल्या: उंची रत्ने, घोडे आणि हत्ती. दूत वीर राजाच्या नगरात आला आणि राजापुढे गेला. तो म्हणाला, “आपले अद्भुत सभागृह पाहायला माझ्या स्वामींनी मला पाठवले आहे.” राजा म्हणाला, “उद्या सकाळी मी ते तुम्हाला दाखवीन.” दुसऱ्या दिवशी राजाने त्याला बोलावणे पाठवले, आणि दूत लगेच आला. त्याने सभागृह पाहिले. ते रत्नांनी इतके झगमगत होते की समोरची जमीन पक्की आहे की पाण्याचे तळे आहे, हे त्याला कळेना. काय करावे, ते त्याला सुचेना. पोपट म्हणाला, “आता सांग, त्याने ते कसे ओळखले असेल?”
पाणी की जमीन?
सुपारी
उत्तर ऐकायला प्रभावती घरीच थांबली, आणि पोपट पुढे सांगू लागला. दूताने एक सुपारी घेतली आणि ती समोर टाकली. ती जिथे पडली, तिथेच स्थिर राहिली. त्यावरून ती पक्की जमीन आहे, हे त्याने ओळखले. ते अद्भुत सभागृह पाहून दूत घरी परतला. आणि प्रभावती झोपायला गेली. शुकसप्तति, म्हणजे ‘पोपटाच्या सत्तर गोष्टी’, हा संस्कृत कथासंग्रह बाराव्या शतकापूर्वीचा आहे. ही साठाव्या रात्रीची गोष्ट आहे. बी. हेल वर्थम यांनी १९११ मध्ये केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून, संस्कृत मूळाशी ताडून, ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.