पुराणे आणि महाकाव्यांतील कथा · Tales from the Ramayana
अहल्या
ओस पडलेला आश्रम
अयोध्येचा राजा दशरथ याचा थोरला मुलगा राम आपला भाऊ लक्ष्मण याच्याबरोबर प्रवास करत होता. थोर ऋषी विश्वामित्र दोघांना सांभाळून नेत होते. ज्या वनात रामाने त्राटिकेला मारले, ते वन त्यांनी आधीच पार केले होते. त्राटिका ही एक भयंकर यक्षिणी होती. तिने तो सगळा प्रदेश उद्ध्वस्त केला होता. आता विश्वामित्र दोघांना मिथिलेला घेऊन चालले होते. मिथिलेत जनक राजा राज्य करत होता. मिथिलेबाहेरच्या एका उपवनात त्यांना एक आश्रम दिसला. तो फार जुना होता, आणि फार सुंदरही होता. पण तिथे कोणीच राहत नव्हते. रामाने ऋषींना विचारले, “हे कोणते ठिकाण? दिसतो तर आश्रमासारखा, पण इथे एकही ऋषी नाही. पूर्वी इथे कोण राहत होते?” विश्वामित्र म्हणाले, “मी तुला सगळे खरे खरे सांगतो. एका थोर ऋषींनी रागाच्या भरात या जागेला शाप दिला.”
अहल्या
गौतम आणि अहल्या
विश्वामित्र सांगू लागले, “हा आश्रम पूर्वी गौतम ऋषींचा होता. ते थोर आणि पवित्र ऋषी होते. त्या काळी हा आश्रम स्वर्गातल्या एखाद्या जागेसारखा झळाळत असे. देवसुद्धा त्याचा मान राखत. “इथे गौतम आपल्या पत्नीबरोबर राहत होते. तिचे नाव अहल्या. पुष्कळ, पुष्कळ वर्षे गौतमांनी इथे तपश्चर्या केली. “देवांचा राजा इंद्र संधीची वाट पाहत होता. गौतम आश्रमात नसतील, अशी वेळ त्याला हवी होती. ती वेळ आली. तेव्हा इंद्राने हुबेहूब गौतमांचे रूप घेतले, आणि तो अहल्येकडे गेला.”
अहल्या
इंद्र आला
“गौतमांच्या रूपातला इंद्र अहल्येला म्हणाला, ‘सुंदरी, आता मला धीर धरवत नाही. मला आत्ताच तुझा सहवास हवा आहे.’ “अहल्येने ते सोंग ओळखले. हा आपला नवरा नाही, हा इंद्र आहे, हे तिला कळले. तरीही देवांच्या राजाचे प्रेम कसे असते, याची तिला उत्सुकता वाटली. आणि मूर्खपणाने ती त्याला वश झाली. “मग तिला आनंद झाला, पण भीतीही वाटली. ती म्हणाली, ‘देवराज, माझी इच्छा पुरी झाली. आता आपण लवकर निघून जावे. गौतमांपासून स्वतःला आणि मलाही वाचवावे.’ “इंद्र हसला. ‘सुंदरी, मी फार प्रसन्न आहे,’ तो म्हणाला. ‘आलो तसा मी परत जातो.’”
अहल्या
दारातच गाठ पडली
“गौतमांच्या भीतीने इंद्र घाईघाईने झोपडीबाहेर पडला. पण नेमके त्याच क्षणी गौतम आत आले. “ते पवित्र तीर्थात स्नान करून आले होते. त्यांचे अंग अजून ओले होते. पूजेसाठी त्यांनी समिधा आणि दर्भ आणले होते. तपश्चर्येने त्यांना इतके बळ मिळाले होते, की देव किंवा दैत्य कोणीही त्यांच्यापुढे टिकू शकत नसे. ते अग्नीसारखे धगधगत होते. “त्यांना पाहताच इंद्र भीतीने गारठला. त्याचा चेहरा उतरला. “गौतमांनी पाहिले, तो दुष्ट देव अजून त्यांच्याच रूपात उभा होता. गौतम सदाचारी होते. त्यांचा राग उफाळून आला. ते म्हणाले, ‘दुष्ट बुद्धीच्या इंद्रा, तू माझे रूप घेतलेस, आणि जे कधीच करू नये ते केलेस. म्हणून तुझे पुरुषत्व नष्ट होईल.’ आणि तत्क्षणी तसेच झाले.”
अहल्या
अहल्येला शाप
“मग गौतमांनी पत्नीलाही शाप दिला. “‘दुराचारिणी,’ ते म्हणाले, ‘तू हजारो वर्षे इथेच राहशील. काहीही खाणार नाहीस. फक्त हवेवर जगशील. तपश्चर्या करशील, आणि राखेवर झोपशील. कोणताही जीव तुला पाहू शकणार नाही. या आश्रमात तू कोणालाही न दिसता राहशील. “‘पण एके दिवशी दशरथाचा मुलगा राम या वनात येईल. तेव्हा तू शुद्ध होशील. तू त्याचा पाहुणचार करशील, तेव्हा तुझा लोभ आणि मोह नाहीसे होतील. मग तू आपल्या मूळ रूपात आनंदाने माझ्याकडे परत येशील.’ “असे बोलून गौतम आश्रम सोडून गेले. हिमालयातल्या एका सुंदर शिखरावर जाऊन त्यांनी तिथे तपश्चर्या केली.”
अहल्या
इंद्राची सबब
विश्वामित्र पुढे सांगू लागले, “इंद्र देवांकडे परत गेला. त्याचे डोळे भीतीने विस्फारले होते. तो देवांना म्हणाला, ‘मी तुमचेच काम केले. मी गौतमांच्या तपश्चर्येत विघ्न आणले, आणि त्यांना रागावायला लावले. आम्हांला शाप देताना त्यांनी तपश्चर्येने मिळवलेले बरेचसे पुण्यबळ खर्च केले. तुमची सेवा करताना मी माझे पुरुषत्व गमावले. आता मला पुन्हा पूर्ण करा.’ “तेव्हा देव पितरांकडे गेले. अग्नीच्या सांगण्यावरून पितरांनी एका मेंढ्याचे पुरुषत्व काढून इंद्राला दिले. तेव्हापासून इंद्राला स्वतःच्या ऐवजी मेंढ्याचे पुरुषत्व आहे. “तर रामा, चल,” ऋषी म्हणाले. “त्या पुण्यवान ऋषींच्या आश्रमात जा. अहल्येला मुक्त कर. ती थोर स्त्री आहे, आणि देवतेसारखी सुंदर आहे.”
अहल्या
राम आश्रमात गेला
राम आणि लक्ष्मण आश्रमात गेले. विश्वामित्र त्यांच्या पुढे चालत होते. तिथे त्यांना अहल्या दिसली. दीर्घ तपश्चर्येने ती तेजस्वी झाली होती. तिचे तेज इतके प्रखर होते, की देवांनासुद्धा तिच्याकडे पाहवत नव्हते. धुराने वेढलेल्या ज्वालेसारखी ती दिसत होती. गौतमांच्या शब्दामुळे आजवर स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोणालाही ती दिसली नव्हती. ती रामाला पाहीपर्यंत असेच चालायचे होते. आता तिचा शाप संपला होता, आणि सगळ्यांना ती दिसू लागली.
अहल्या
अखेर मुक्ती
दोघा राजपुत्रांनी आनंदाने अहल्येला वाकून नमस्कार केला, आणि तिच्या पायांना स्पर्श केला. तिला गौतमांचे शब्द आठवले. तिने दोघांचे पाहुणे म्हणून स्वागत केले. पाय धुवायला पाणी आणले, आणि थोर पाहुण्याला देतात ते अर्घ्य दिले. रामाने ते रीतीप्रमाणे स्वीकारले. तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला, आणि देवदुंदुभी वाजू लागले. “शाबास! शाबास!” असे म्हणत देवांनी अहल्येचा सन्मान केला. दीर्घ तपश्चर्येने तिचा दोष धुऊन निघाला होता. मग गौतमही परत आले. शापात सांगितल्याप्रमाणे अहल्या पुन्हा आपल्याजवळ आली, म्हणून त्यांना आनंद झाला. त्यांनी सगळे विधी करून रामाचा यथोचित सत्कार केला. आणि पतिपत्नी दोघे मिळून पुन्हा तपश्चर्या करू लागले. थोर ऋषींनी असा सन्मान केल्यावर राम मिथिलेकडे निघाला. लक्ष्मण आणि विश्वामित्र त्याच्याबरोबर होते. वाल्मीकी रामायण, बालकांड, सर्ग ४८ मधले श्लोक ११ ते ३३, आणि सर्ग ४९ यांवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. पुढच्या काळातल्या कथांत अहल्येची शिळा होते. वाल्मीकी मात्र तिची शिळा करत नाहीत. राम येईपर्यंत ती आश्रमात कोणालाही न दिसता राहते.