पुराणे आणि महाकाव्यांतील कथा · Tales from the Ramayana
हनुमानाला सीता सापडते
अशोकवनात
राक्षसांचा राजा रावण याने राजकुमार रामाची पत्नी सीता हिला पळवून नेले होते. समुद्रातल्या बेटावर त्याची लंका नगरी होती. तिथे त्याने तिला ठेवले होते. वायूचा पुत्र हनुमान हा एक वानर. तो तिला शोधायला समुद्र ओलांडून झेपावला, आणि रात्रभर त्याने नगरी पिंजून काढली. शेवटी ती त्याला अशोकवनात सापडली. ती रावणाची एक बाग होती. सीता एका झाडाखाली बसली होती. ती रोडावली होती, रडत होती. तिच्याभोवती राक्षसींचा गराडा होता. त्या रात्रंदिवस तिच्यावर पहारा करत, आणि तिला मारून टाकण्याच्या धमक्या देत. हनुमान तिच्या डोक्यावरच्या फांद्यांत लपून बसला. हजारो वानर जिला शोधत होते, ती त्याला सापडली होती. पण आता तिच्याशी बोलायचे कसे?
हनुमानाला सीता सापडते
बोलायचे कसे?
त्याने विचार केला, “तिला धीर न देता मी निघून गेलो, तर कदाचित ती प्राण सोडील. आणि रामांनी मला विचारले, ‘सीता काय म्हणाली?’ तर मी काय उत्तर देऊ? “पण विद्वान ब्राह्मणासारख्या शुद्ध, पंडिती भाषेत मी बोललो, तर तिला वाटेल हा वेष घेतलेला रावणच आहे. कारण रावण हवे ते रूप घेऊ शकतो. ती ओरडली, तर पहारेकरी धावत येतील. मी त्यांच्याशी लढलो, तर इतका थकेन, की समुद्र ओलांडून परत उडी मारू शकणार नाही. आणि दुसरा कोणताही वानर ती उडी मारू शकत नाही. “म्हणून मी साध्या माणसांसारखे साधे शब्द बोलेन. आणि सुरुवात रामांच्या गोष्टीने करीन. राम तिला प्रिय आहेत. मग ती न घाबरता ऐकेल.”
हनुमानाला सीता सापडते
रामाची गोष्ट
मग आपल्या फांदीवरूनच हनुमान हळू आवाजात बोलू लागला. फक्त सीतेला ऐकू जाईल, एवढ्याच आवाजात. “दशरथ नावाचे एक चांगले राजे होते. त्यांच्या आज्ञेने त्यांचे थोरले पुत्र राम वनात राहायला गेले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि भाऊ लक्ष्मण होते. तिथे रावणाने रामांना फसवले, आणि त्यांच्या पत्नीला पळवून नेले. “रामांनी सुग्रीव नावाच्या एका वानराशी मैत्री केली, आणि त्याला वानरांचा राजा केले. आता हजारो वानर रामांच्या पत्नीला शोधत आहेत. मी समुद्र ओलांडून झेप घेतली, आणि मला ती सापडली. रामांनी वर्णन केले होते, अगदी तशीच ती दिसते.” सीता चकित झाली. तिने तोंड वर करून झाडाकडे पाहिले. आणि तिथे तिला तो दिसला.
हनुमानाला सीता सापडते
हा रावण तर नाही?
हनुमान झाडावरून खाली उतरला. तो तिला म्हणाला, “राम खुशाल आहेत. त्यांनी मला दूत म्हणून पाठवले आहे. ते आपली खुशाली विचारतात. लक्ष्मण आपल्याला मस्तक लववून नमस्कार करतात.” सीतेला खूप आनंद झाला. ती म्हणाली, “एक जुनी म्हण आहे. जो जिवंत राहतो, त्याला शंभर वर्षांनी का होईना, आनंद भेटतोच. ती खरी आहे, हे आज मला कळले.” पण हनुमान आणखी जवळ आला, तशी ती घाबरली. तिला वाटले, “हा पुन्हा रावणच, नवा वेष घेऊन आलेला.” ती खाली जमिनीवर बसली, आणि त्याच्याकडे पाहीनाच. ती म्हणाली, “वनात संन्याशाचा वेष घेऊन भिक्षा मागायला आलेला तो रावण जर तू असशील, तर मला पुन्हा छळू नकोस. उपवासाने मी आधीच खंगले आहे.” मग तिचे मन डळमळले. “पण हा रावण कसा असेल? याला पाहून तर मला इतका आनंद होतो आहे.”
हनुमानाला सीता सापडते
रामाचा दूत
हनुमानाने तिची भीती ओळखली. तिला आवडेल अशा शब्दांत तो रामाबद्दल बोलला. तो म्हणाला, “एका हरणाने रामांना आपल्यापासून दूर नेले, आणि रावणाने आपल्याला पळवले. लवकरच रावणाला त्याची किंमत मोजावी लागेल. राम आपल्या धगधगत्या बाणांनी युद्धात त्याला मारतील. “वानरांचा राजा सुग्रीव रामांचा मित्र आहे. तेही आपली खुशाली विचारतात. मी सुग्रीवांचा मंत्री आहे. माझे नाव हनुमान. आपल्याला वाटते तो मी नाही. भीती सोडा, आणि माझ्यावर विश्वास ठेवा. “हे पाहा,” तो म्हणाला. “आपल्याला दाखवायला रामांनी ही अंगठी मला दिली आहे. तिच्यावर त्यांचे नाव कोरलेले आहे.”
हनुमानाला सीता सापडते
अंगठी
आपल्या पतीच्या बोटात असलेली ती अंगठी सीतेने हातात घेतली. ती तिच्याकडे पाहत राहिली. जणू पतीच तिला परत भेटला होता. ग्रहणाचा दैत्य राहू चंद्राला सोडतो, तेव्हा चंद्र उजळतो, तसा तिचा चेहरा उजळला. ती म्हणाली, “वानरश्रेष्ठा, तू शूर आहेस, हुशार आहेस. एखादे डबके ओलांडावे, तसा तू समुद्र ओलांडलास. “राम खुशाल आहेत ना? त्यांना माझ्यासाठी दुःख होते का? मला सोडवायची तयारी करत आहेत का? मग ते येत का नाहीत? मी दूर आहे, म्हणून त्यांचे माझ्यावरचे प्रेम आटले का? त्यांच्या आईवडिलांपेक्षाही त्यांचे माझ्यावर अधिक प्रेम आहे. त्यांची खबर कानी येत राहील, तोवरच मी जीव धरून राहीन.”
हनुमानाला सीता सापडते
रामाचे दुःख
हनुमानाने हात जोडले. तो म्हणाला, “आपण कुठे आहात, हे रामांना ठाऊक नाही. म्हणून ते आले नाहीत. माझ्याकडून हे कळताच ते वानरांची आणि अस्वलांची मोठी सेना घेऊन लगेच येतील. समुद्र ओलांडतील. लंकेतला एकूण एक राक्षस नाहीसा करतील. “त्यांच्या मनात आपल्याशिवाय दुसरा विचारच नाही. त्यांना झोप जवळजवळ लागतच नाही. लागली, तर ‘सीते!’ अशी हाक मारत रडत जागे होतात. आपल्याला आवडेल असे एखादे फळ किंवा फूल दिसले, की ते सुस्कारा सोडतात, आणि आपल्याला ‘प्रिये’ म्हणून हाक मारतात.” रामाबद्दल ऐकून सीतेला आनंद झाला. त्याचे दुःख ऐकून ती दुःखी झाली. आनंद आणि दुःख, दोन्ही एकदमच तिच्या चेहऱ्यावर उमटले.
हनुमानाला सीता सापडते
पत्नीचे उत्तर
त्याच दिवशी आपल्या पाठीवर बसवून रामाकडे घेऊन जाण्याची तयारी हनुमानाने दाखवली. सीता जायला तयार झाली नाही. शंभर योजने समुद्र ओलांडेपर्यंत एखाद्या स्त्रीला धरून राहणे जमणार नाही, असे ती म्हणाली. शिवाय रामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला ती स्वतःहून स्पर्श करणार नव्हती. तिचे उत्तर ऐकून हनुमानाला आनंद झाला. तो म्हणाला, “रामांच्या पत्नीला शोभेल असेच आपण बोललात. असे दुसरे कोण बोलेल? माझे रामांवर प्रेम आहे, आपल्याबद्दल मला आदर आहे, आणि हे मला जमेल हे मला ठाऊक आहे. म्हणूनच मी तसे म्हणालो. आपण जे जे बोललात, ते सगळे रामांना सांगेन. “पण आपण माझ्याबरोबर येणार नसाल, तर मला एखादी खूण द्या. आपल्याकडूनच आले आहे, हे रामांना ओळखता येईल अशी काहीतरी वस्तू द्या.”
हनुमानाला सीता सापडते
कावळा
सीतेचा कंठ दाटून आला. ती म्हणाली, “माझ्याच शब्दांत त्यांना हे सांग. ही सगळ्यांत चांगली खूण आहे. “नाथ, एकदा चित्रकूट पर्वतावर मंदाकिनी नदीजवळ एक कावळा मला सारखा टोचत होता. तो जाईना. मी त्याला हाकलत होते, ते पाहून आपल्याला हसू आले. मग आपण दोघे झोपलो, आळीपाळीने एकमेकांच्या मांडीवर डोके ठेवून. “तेवढ्यात तो कावळा पुन्हा आला, आणि त्याने माझी छाती ओरबाडली. माझ्या रक्ताने आपल्याला जाग आली. फुत्कारणाऱ्या सापासारखा आपल्याला राग आला. आपण तो कावळा पाहिलात. त्याची नखे माझ्या रक्ताने लाल झाली होती. तो देवांचा राजा इंद्र याचा मुलगा होता.
हनुमानाला सीता सापडते
रामाचा बाण
“आपण आपल्या चटईतून एक गवताची काडी उपसलीत. त्या काडीवर आपण ब्रह्मास्त्राचा मंत्र म्हटलात. ब्रह्मास्त्र म्हणजे सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाचे अस्त्र. आपण ती काडी कावळ्यावर फेकलीत, आणि तिने आकाशातून त्याचा पाठलाग केला. “कोणी आपल्याला वाचवील का, हे शोधत तो कावळा सगळ्या जगात पळत फिरला. त्याच्या वडिलांनी त्याला दूर लोटले. महर्षींनीही त्याला आश्रय दिला नाही. शेवटी तो आपल्याकडेच परत आला, आणि आपल्यापुढे जमिनीवर पडला. तो मरणाच्याच लायकीचा होता, तरी आपल्याला त्याची दया आली. पण ते अस्त्र वाया जाऊ शकत नव्हते. म्हणून त्याने त्याचा उजवा डोळा घेतला, आणि त्याचे प्राण वाचले. “माझ्यासाठी आपण एका साध्या कावळ्यावर ब्रह्मास्त्र सोडलेत. मग ज्याने मला आपल्यापासून पळवून आणले, त्याला का सोडता? आपल्यासारखे पती असूनही मी अनाथासारखी जगते आहे.”
हनुमानाला सीता सापडते
चूडामणी
हनुमान म्हणाला, “आपल्या आठवणीने दुःखी झालेले राम कशातच रमत नाहीत. मी शपथ घेऊन सांगतो. पण आता मला आपण सापडला आहात. ही दुःख करण्याची वेळ नाही. लवकरच आपल्या दुःखाचा अंत होईल.” सीता म्हणाली, “मग माझा रामांना नमस्कार सांग. आणि लक्ष्मणालाही. तो रामांना वडिलांसारखे मानतो, आणि मला आईसारखे. आणि रामांना पुन्हा पुन्हा हे सांग, ‘मी आणखी एक महिना जगेन. सत्याची शपथ घेऊन सांगते, त्यापुढे मी जगणार नाही.’” तिने आपल्या वस्त्राच्या गाठीतून एक तेजस्वी रत्न सोडवले. ते केसांत घालायचे रत्न होते, चूडामणी. ती म्हणाली, “हे रामांना दे.” हनुमानाने ते घेतले, आणि नमस्कार केला. आदराने तिला प्रदक्षिणा घालून तो तिच्या बाजूला उभा राहिला. ती सापडली, म्हणून त्याचे मन आनंदाने भरून गेले होते. मनाने तो आधीच राम-लक्ष्मणांकडे पोहोचला होता. आणि तो निघण्याच्या तयारीला लागला. वाल्मीकी रामायण, सुंदरकांड, सर्ग ३०, ३१, ३४, ३६ आणि ३८ यांवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. सीतेला पाठीवरून घरी नेण्याची हनुमानाची तयारी सर्ग ३७ मध्ये सांगितली आहे, आणि सर्ग ३८ मध्ये तिची आठवण काढली आहे. रावणाच्या महालात हनुमानाने घेतलेला शोध, रावणाचे अशोकवनात येणे, त्रिजटा नावाच्या राक्षसीचे स्वप्न, आणि सीतेचे व हनुमानाचे बरेचसे प्रश्नोत्तर इथे गाळले आहे.