आटपाट नगरच्या कहाण्या
बोलणाऱ्या दिव्यांची कहाणी
गोड पदार्थ कुठे गेले?
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहायचा. त्याला एक लहान सून होती. ती फार खादाड होती. एके दिवशी घरच्या सगळ्यांसाठी गोड पदार्थ केले होते. सून हळूच गेली, आणि तिने ते सगळे एकटीने खाऊन टाकले. मग ती घाबरली. आपण काय केलं ते राजाला कळलं, तर तो आपल्या चांगल्या थोबाडीत मारायला लावेल, असं तिला वाटलं. घरची मंडळी विचारू लागली, गोड पदार्थ कुठे गेले? तेव्हा ती खोटं बोलली. “उंदरांनी खाल्ले,” ती म्हणाली. लगेच सगळे उंदरांना शिव्या देऊ लागले. “मेले उंदीर! मांजराने धरून सगळ्यांना खाऊन टाकलं तर बरं होईल,” ते म्हणाले.
बोलणाऱ्या दिव्यांची कहाणी
उंदरांनी सूड घेतला
उंदरांनी हे सगळं ऐकलं. सुनेने आपल्यावर खोटा आळ घेतला, म्हणून त्यांना तिचा फार राग आला. ते सगळे एकत्र जमले, आणि तिचा सूड घ्यायची त्यांनी शपथ घेतली. काही दिवसांनी राजाकडे एक पाहुणा राहायला आला. त्या रात्री उंदीर सुनेच्या खोलीत गेले. तिची एक चोळी त्यांनी ओढून बाहेर आणली, आणि पाहुण्याच्या अंथरुणावर पसरून ठेवली. सकाळी परक्या माणसाच्या अंथरुणावर सुनेची चोळी सापडली. तिचं आणि पाहुण्याचं काहीतरी झालं, असंच सगळ्यांना वाटलं. तिची पार नाचक्की झाली. सासऱ्यांनी आणि सगळ्या दिरांनी तिला खूप बोल लावले. शेवटी राजाने तिला घरातून हाकलून दिलं.
बोलणाऱ्या दिव्यांची कहाणी
राजवाड्यातले दिवे
तोपर्यंत राजवाड्यातल्या दिव्यांची देखभाल ही सूनच करायची. रोज सकाळी ती दिवे घासूनपुसून लख्ख करायची, वाती नीट करायची. स्वतःच्या हाताने दिवे लावायची, आणि त्यांच्यावर भरपूर खडीसाखर ठेवायची. दिवाळीला दिव्यांची पूजा करायची, त्यांना नैवेद्य दाखवायची. ती गेली, आणि दिव्यांकडे कोणी पाहीनासं झालं. पुढच्या दिवाळीला राजा शिकारीहून परत येत होता. वाटेत एका झाडाखाली त्याने मुक्काम केला. तेवढ्यात त्याला दिसलं, आटपाट नगरातले सगळे दिवे येऊन त्या झाडाच्या फांद्यांवर बसले. मग एकेक दिवा आपल्या घरात काय काय झालं ते सांगू लागला. घरी कोणत्या जेवणावळी झाल्या, काय पदार्थ होते, कोणाकोणाला बोलावलं होतं, ते सांगितलं. आपली देखभाल कशी केली, दिवाळीला आपला मान कसा राखला, तेही सांगितलं.
बोलणाऱ्या दिव्यांची कहाणी
मोठ्या दिव्याचं दुःख
सगळ्यात शेवटी राजवाड्यातला मोठा दिवा बोलला. “दिवेदादांनो, तुम्हाला कसं सांगू, तेच मला कळत नाही. आजवर दर वर्षी आटपाटात माझ्याइतका मान कोणत्याही दिव्याला मिळत नव्हता. आणि या वर्षी तुमच्यापैकी कोणीही माझ्याइतकं दुःखी नाही.” बाकीच्या दिव्यांनी त्याची समजूत घातली. “तुझ्यावर ही वाईट वेळ कशी आली?” त्यांनी विचारलं. मोठा दिवा म्हणाला, “राजाच्या लहान सुनेने गोड पदार्थ खाल्ले, आणि स्वतःला वाचवायला उंदरांवर आळ घेतला. त्याचा बदला म्हणून उंदरांनीही तिच्यावर खोटा आळ घेतला. राजाच्या पाहुण्याच्या अंथरुणावर तिची चोळी ठेवली. म्हणून तिची नाचक्की झाली, तिला घरातून हाकलून दिलं. ती गेल्यापासून माझे वाईट दिवस आले. आता माझ्याकडे कोणी बघत नाही. दर वर्षी तीच माझी पूजा करायची, तीच माझा मान ठेवायची. ती कुठेही असो, तिचं भलं होवो. माझा तिला आशीर्वाद आहे.”
बोलणाऱ्या दिव्यांची कहाणी
सून घरी परत आली
दिवे जे जे बोलले, ते सगळं राजाने कान देऊन ऐकलं. त्यावरून सून निर्दोष आहे, हे त्याला कळलं. तो घरी आला. चोळीशिवाय सुनेविरुद्ध दुसरा काही पुरावा आहे का, असं त्याने विचारलं. दुसरा कोणताही पुरावा नव्हता. तिचं आणि पाहुण्याचं काही झालं, हे कोणीच पाहिलं नव्हतं. मग राजाने माणूस पाठवून सुनेला घरी आणलं. जे झालं त्याबद्दल तिची क्षमा मागितली, आणि सगळ्या घराचा कारभार तिच्या हाती दिला. त्या दिवसापासून राजाने अयोध्येच्या रामराजांसारखं शहाणपणाने आणि चांगलं राज्य केलं. आपल्यावर कधी कोणी खोटा आळ घेतला, तर दिव्यांनी राजाच्या सुनेला वाचवलं, तसं आपल्यालाही वाचवावं. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या चौदाव्या कहाणीवरून, ‘दिवे आणि राजाची सून’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.