आटपाट नगरच्या कहाण्या
बुधबृहस्पतीची कहाणी
द्यायला काही नाही
आटपाट नगर होतं. तिथं एक राजपुत्र राहायचा. त्याला सात मुलगे होते, आणि सात सुना. रोज दोन ब्राह्मण त्याच्या घरी भिक्षा मागायला यायचे. पण दर वेळी सुना निरोप पाठवायच्या, आम्ही कामात आहोत, काही द्यायला वेळ नाही. पुढे राजपुत्राची सगळी संपत्ती गेली, आणि तो अगदी गरीब झाला. त्याचा धाकटा मुलगा घर सोडून प्रवासाला निघून गेला. पुन्हा ते दोन ब्राह्मण भिक्षा मागायला आले. या वेळी थोरली सून म्हणाली, “आता आम्ही कामात नाही. पण तुम्हाला द्यायला आमच्याकडे काहीच नाही. काही असतं, तर आम्ही दिलं असतं.”
बुधबृहस्पतीची कहाणी
धाकटी सून विचारते
धाकटी सून हुशार होती. तिच्या मनात आलं, “ब्राह्मण आपल्यावर रागावतील. पैसा होता तेव्हा आपण त्यांना काही दिलं नाही. आणि आता काही नाही, म्हणून काही देत नाही.” मग ती दोघांपैकी मोठ्या ब्राह्मणाच्या पाया पडली. “आमच्या हातून फार पाप झालं,” ती म्हणाली. “आम्ही गरीब झालो, ते योग्यच झालं. पण आम्हाला क्षमा करा. आणि आम्ही पुन्हा श्रीमंत कसे होऊ, ते मला सांगा.” “दर बुधवारी आणि दर गुरुवारी एका ब्राह्मणाला जेवायला बोलाव,” तो म्हणाला. “जेवणासाठी पैसा नसेल, तर पैशाच्या पेटीवर गाईची दोन पावलं काढ. धान्य हवं असेल, तर धान्याच्या कोठीवर काढ. त्या पावलांची पूजा कर, आणि ब्राह्मणांचं स्वागत कर. पेटीत पैसा मिळेल, कोठीत धान्य मिळेल. आणि हळूहळू तुम्ही सगळे पूर्वीसारखे श्रीमंत व्हाल.”
बुधबृहस्पतीची कहाणी
पेटीत पैसा
ब्राह्मणाने सांगितलं तसं धाकट्या सुनेने केलं. ती जेव्हा जेव्हा ब्राह्मणांना जेवायला बोलवायची, तेव्हा तेव्हा पैशाच्या पेटीवर आणि धान्याच्या कोठीवर गाईची पावलं काढायची. आणि जेवणापुरता पैसा आणि धान्य नेहमी मिळायचं. काही दिवसांनी ती झोपली असताना तिला स्वप्न पडलं. दोन देव तिच्या उशाशी आले. ते बुध आणि बृहस्पती होते, बुध ग्रहाचे आणि गुरू ग्रहाचे देव. “तुझा नवरा एका मोठ्या देशाचा राजा झाला आहे,” ते म्हणाले. “त्याच्याकडे जा. आणि तो भेटला, की आमची पूजा करायला, ब्राह्मणांना जेवणं घालायला विसरू नकोस.”
बुधबृहस्पतीची कहाणी
मजुरीची वेळ
ती उठली, आणि तिने बाकीच्या सहा सुनांना हे सांगितलं. पण त्यांना तिचा हेवा वाटला. त्या फार रागावल्या. त्यांनी तिला लाथा मारल्या, तिच्या डोक्यावर हातांनी मारलं. इतक्या वेळा आणि इतक्या जोराने मारलं, की ती गाईची पावलं काढायचं साफ विसरून गेली. त्यामुळे पुन्हा कधी तिला पेटीत पैसा मिळाला नाही, कोठीत धान्य मिळालं नाही. घर दिवसेंदिवस आणखी गरीब होत गेलं. आधी गडी पळून गेले. मग घरातले पुरुष निघून गेले. शेवटी घरात फक्त सात सुना उरल्या. त्या उपाशी होत्या. अन्न मिळवायला काहीच मार्ग नव्हता. तेवढ्यात त्यांनी ऐकलं, शेजारच्या देशाच्या राजाला एक तळं बांधायचं आहे. त्यासाठी तो मजूर बोलावतो आहे. म्हणून त्या तिथं मजुरी करायला गेल्या.
बुधबृहस्पतीची कहाणी
हत्तिणीची निवड
तो राजा म्हणजे राजपुत्राचा धाकटा मुलगा. धाकट्या सुनेचा नवरा. प्रवासात तो एका नगरात आला होता. तिथला राजा नुकताच वारला होता. त्याला ना मूलबाळ, ना नातेवाईक. नवा राजा कसा निवडायचा, ते लोकांना कळेना. शेवटी त्यांनी एका हत्तिणीला फुलांची माळ दिली, आणि तिला मोकळं सोडलं. ती सरळ राजपुत्राच्या मुलाकडे गेली, आणि तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. नगरातले लोक फार रागावले. त्यांनी माळ हिसकावून घेतली, आणि त्याला हाकलून दिलं. पण हत्तिणीने पुन्हा त्याच्या गळ्यात माळ घातली. पुन्हा लोकांनी ती हिसकावली. तिसऱ्यांदा हत्तिणीने माळ घातली, तेव्हा लोकांनी त्याला उंच उचलून धरलं, आणि हा आमचा राजा, असं जाहीर केलं.
बुधबृहस्पतीची कहाणी
राजाला आठवण झाली
राजा झाल्याच्या आनंदात तो सुरुवातीला आपल्या लहान बायकोला साफ विसरून गेला. पण एका रात्री बुध आणि बृहस्पती त्याच्या स्वप्नात आले. त्यांनी त्याला बायकोची आठवण करून दिली. ती किती गरीब आहे, ते सांगितलं. राज्य सोडून त्याला तिला शोधायला जाता येईना. म्हणून त्याने ठरवलं, एक तळं खणायचं, आणि चारी बाजूंनी मजूर बोलवायचे. तो रोज तळ्यावर जायचा, आणि मजुरांमध्ये बायकोला शोधायचा. एके दिवशी त्याला ती दिसली. त्याने तिला जवळ बोलावलं. बुध आणि बृहस्पती दोघांच्याही स्वप्नात कसे आले, ते त्यांनी एकमेकांना सांगितलं. बायको सापडली, म्हणून राजाला इतका आनंद झाला, की त्याने लगेच तिला त्या देशाची राणी म्हणून जाहीर केलं.
बुधबृहस्पतीची कहाणी
कणकेचे पाय, कणकेच्या मुठी
बाकीच्या सुना अजून तळ्यावर काम करत होत्या. आपलं भाग्य उघडलं, हे नव्या राणीने त्यांना कळू दिलं नाही. तिने सगळ्या मजुरांना मोठी मेजवानी दिली. पण त्याआधी तिने महालात गव्हाची कणीक मळली, आणि माणसांच्या पायांचे आणि मुठींचे आकार केले. बाकीच्या सुना गर्दीत बसून जेवत होत्या. तेव्हा राणी त्यांच्याजवळ गेली. घरी जिने जिने तिला लाथा मारल्या होत्या, त्या प्रत्येकीला तिने कणकेचा पाय दिला. जिने जिने हातांनी मारलं होतं, तिच्या हातात कणकेची मूठ दिली. तेव्हा त्यांना कळलं, ही तरुण राणी कोण आहे. त्या तिच्या पाया पडल्या, क्षमा मागू लागल्या. तिने त्यांना क्षमा केली, आणि आपल्याबरोबर नवऱ्याच्या महालात नेलं. आणि मग ते सगळे एकत्र सुखाने नांदले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या चौथ्या कहाणीवरून, बुधवारच्या आणि गुरुवारच्या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.