आटपाट नगरच्या कहाण्या
महालक्ष्मीची कहाणी
राजाचा शत्रू
आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला दोन राण्या होत्या. एक त्याची आवडती होती, दुसरी नावडती. राजाचा एक भयंकर शत्रू होता. त्याचं नाव नंदनबाणेश्वर. तो ढगांत उडी मारायचा, नाहीतर समुद्राच्या तळाशी बुडी मारायचा. घटकेत स्वर्गात झेप घ्यायचा, तर दुसऱ्या घटकेला नरकात खाली जायचा. राजाला त्याची इतकी भीती वाटायची, की तो वाळलेल्या काटकीसारखा सुकून गेला होता. शेवटी काही उपाय उरला नाही, तेव्हा राजाने सगळ्या प्रजेला एकत्र बोलावलं. नंदनबाणेश्वराला शोधा आणि ठार मारा, असा हुकूम दिला. “जी महाराज, आत्ताच,” सगळे म्हणाले, आणि सगळीकडे शोधू लागले.
महालक्ष्मीची कहाणी
गरीब म्हातारीचा मुलगा
आटपाट नगरात एक गरीब म्हातारी राहायची. तिला एकच मुलगा होता. राजाचा हुकूम ऐकून तो म्हणाला, “आई, मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातो.” “वेडेपणा करू नकोस,” आई म्हणाली. “तू एक गरीब पोर. लोक तुला हसतील. ही घे भाकरी, आणि एखाद्या झाडामागे बसून खा.” मुलाने भाकरी घेतली. पण मग तो गावकऱ्यांबरोबर गेला, आणि त्यांच्या पुढे होऊन शत्रूला शोधू लागला. संध्याकाळ झाली, तरी शत्रू सापडला नाही. म्हणून सगळे गावकरी घरी गेले. राजा फार दुःखी झाला. पण म्हातारीचा मुलगा घरी गेला नाही. तो गावाबाहेरच्या एका रानात राहिला.
महालक्ष्मीची कहाणी
मध्यरात्रीची पूजा
मध्यरात्रीच्या सुमाराला तो होता त्या जागेजवळ नागकन्या आल्या. त्या पाताळात राहतात. त्यांच्याबरोबर वनदेवताही आल्या. त्या महालक्ष्मीची पूजा करायला आल्या होत्या. आधी मुलगा खूप घाबरला. शेवटी धीर करून त्याने विचारलं, “बायांनो, महालक्ष्मीची पूजा केली, तर काय मिळतं?” “जे हरवलं असेल, ते सापडतं,” नागकन्या म्हणाल्या. “आणि जे हवं असेल, ते मिळतं.” मग मुलानेही त्यांच्याबरोबर देवीची पूजा केली. रात्रभर त्यांनी देवीपुढे घागरी फुंकल्या. त्यांचा खोल, धीरगंभीर आवाज रानभर घुमला.
महालक्ष्मीची कहाणी
देवीचं वचन
पहाटे महालक्ष्मी प्रकट झाल्या. सगळ्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, आणि आशीर्वाद मागितला. त्यांनी आधी नागकन्यांना आशीर्वाद दिला, मग वनदेवतांना, आणि मग म्हातारीच्या मुलाला. “तुला आटपाटचं अर्धं राज्य मिळेल, आणि राजाचा अर्धा खजिना मिळेल,” त्या त्याला म्हणाल्या. “राजा तुझ्यासाठी स्वतःच्या घराइतकंच उंच घर बांधील. तुझं नाव नवलवाट ठेवील. कारण आज सकाळीच राजाचा तो बलाढ्य शत्रू मान मोडून मरेल. राजाच्या अंगणात तो मरून पडलेला सापडेल.” एवढं बोलून देवी अदृश्य झाल्या, आणि उडून कोल्हापूरला गेल्या. कोल्हापूर हे महालक्ष्मीचं मुख्य स्थान. मुलगा घरी गेला.
महालक्ष्मीची कहाणी
अंगणात मरून पडला
पहाटे राजाची आवडती राणी पाटमाधवराणी राजाच्या अंगणात गेली. तिथं नंदनबाणेश्वर मान मोडून मरून पडला होता. ती धावत राजाला सांगायला गेली. सगळे म्हणाले, त्या म्हातारीच्या मुलानेच त्याला मारलं असणार. कारण तो मागे राहिला होता. राजाने मुलाला बोलावणं पाठवलं. मुलगा घाबरून ओरडला, “मी कुणाचं काही वाईट केलं नाही. महाराज, आपण मला का बोलावलं?” “घाबरू नकोस,” राजा म्हणाला. “लोक म्हणतात, तू माझ्या शत्रूला मारलंस. हे खरं का?” “नाही महाराज,” मुलगा म्हणाला. “तो महालक्ष्मीच्या प्रतापाने मेला.” आणि देवींनी त्याला काय वचन दिलं होतं, ते त्याने राजाला सांगितलं. मग देवींनी जे वचन दिलं होतं, ते सगळं राजाने मुलाला दिलं. अर्धा मुलूख, अर्धा खजिना, आणि स्वतःच्या महालाइतक्या उंच छताचा महाल. तेव्हापासून मुलाला सगळे नवलवाट म्हणू लागले.
महालक्ष्मीची कहाणी
सोळा पदरी दोरा
हे ऐकून पाटमाधवराणीने नवलवाटाला बोलावलं. महालक्ष्मीची पूजा कशी करायची, ते विचारलं. नागकन्यांनी जे जे केलं होतं, ते सगळं त्याने तिला सांगितलं. आश्विनाच्या अष्टमीला मनगटावर सोळा पदरी दोरा बांधायचा. महिना संपेपर्यंत तो मनगटावर ठेवायचा. तो दिवस आला, तेव्हा राणीने दोरा बांधला. एक-दोन दिवसांनी राजा तिच्याशी सारीपाट खेळायला आला. त्याचं लक्ष दोऱ्याकडे गेलं. हे काय, म्हणून त्याने विचारलं. तिने सांगितलं. राजा खूप रागावला. “माझ्या महालात हार, गोफ, कडी कितीतरी आहेत,” तो गरजला. “तो फालतू दोरा फेकून दे. तो मी तुला घालू देणार नाही.” मग राणीने दोरा ओढून काढला, आणि जमिनीवर फेकून दिला.
महालक्ष्मीची कहाणी
नावडती राणी
दुसऱ्या दिवशी सकाळी दासी महाल झाडत होत्या. एकीला केरात तो दोरा सापडला. तिने तो नवलवाटाला दाखवला. त्याला आवडत्या राणीचा फार राग आला. दोरा घेऊन तो तडक दुसऱ्या राणीकडे गेला. ती चिमादेवराणी, राजाची नावडती राणी. त्याने तिला सगळं सांगितलं. “तो दोरा मला द्या, आणि महालक्ष्मीची पूजा कशी करायची ते मला शिकवा,” अशी तिने त्याला विनवणी केली. “तुम्हाला गर्व होईल,” तो म्हणाला. “मग मी सांगेन तसं तुम्ही करणार नाही.” पण तुम्ही सांगाल ते सगळं करीन, असं तिने वचन दिलं. मग नागकन्या आणि वनदेवता जे जे करताना त्याने पाहिलं होतं, ते सगळं त्याने तिला शिकवलं. वर्षभर सगळं आधीसारखंच चाललं.
महालक्ष्मीची कहाणी
म्हातारी भिकारीण
पुढच्या वर्षी आश्विनाच्या अष्टमीला महालक्ष्मी म्हाताऱ्या भिकारणीचं रूप घेऊन आटपाट नगरात आल्या. आधी त्या आवडत्या राणीच्या महालात गेल्या. तो दिवस देवीचा पवित्र दिवस. तरी तिथं कोणीही देवीची पूजा करत नव्हतं. हे पाहून देवी फार नाराज झाल्या. “पाटमाधवराणी बाई, लेकुरवाळ्या बाई,” म्हातारी म्हणाली, “आज तुमच्या घरात काय आहे?” “आज माझ्या घरात काही नाही,” राणी म्हणाली. “या भिकारणीला थोडं पाणी द्या,” म्हातारी म्हणाली, “तुमच्या सगळ्या राज्याला पुरेल इतकं पुण्य तुम्हाला मिळेल.”
महालक्ष्मीची कहाणी
शाप
“तांब्याचं घंगाळ भरून पाणी दिलं, तरी तेवढं माझ्या सगळ्या राज्याला पुरायचं नाही,” राणी म्हणाली. “मग मला थोडा दहीभात द्या,” म्हातारी म्हणाली, “तुमच्या सगळ्या राज्याला पुरेल इतकं पुण्य तुम्हाला मिळेल.” “दहीभाताचं मोठं जेवण घातलं, तरी माझ्या सगळ्या राज्याला पुरायचं नाही,” राणी म्हणाली. मग म्हातारी खूप संतापली, आणि तिने राणीला शाप दिला. “तू अर्धी बेडूक आणि अर्धी बाई होशील. सवतीच्या न्हाणीघराबाहेर उभी राहून बेडकासारखी डरांव डरांव करशील.” पण राणी तिला मोठमोठ्याने हसली. आणि महालक्ष्मी रागारागाने तिथून निघून गेल्या.
महालक्ष्मीची कहाणी
देवीची तीन रूपं
मग देवी नावडत्या राणीच्या महालात गेल्या. तिथं पूजेची सगळी तयारी होती. भिंतीला टेकून महालक्ष्मीची मूर्ती ठेवली होती. “आज आम्ही महालक्ष्मीची पूजा करतो आहोत,” चिमादेवराणी म्हातारीला म्हणाली. “मीच महालक्ष्मी,” म्हातारी म्हणाली. हे खरं कसं मानायचं, असं राणीने विचारलं. “सकाळी मी लहान मुलगी होईन, दुपारी तरुण सवाष्ण होईन, आणि संध्याकाळी म्हातारी होईन,” देवी म्हणाल्या. देवी ती तिन्ही रूपं घेऊन दिसल्या. मग चिमादेवराणीने त्यांना आत घेतलं. न्हाऊ घातलं, उटी लावली, नेसायला रेशमी परकर दिला, आणि बसायला पाट दिला. तिने नवलवाटाला बोलावलं. दोघांनी मिळून देवीची पूजा केली, आणि घागरी फुंकल्या. तो घुमणारा आवाज राजाच्या कानावर गेला, आणि तो पाहायला आला. चिमादेवराणी त्याला माडीवर घेऊन गेली. पहाटेपर्यंत ते दोघं सारीपाट खेळले. महालक्ष्मी बसून ते पाहत होत्या.
महालक्ष्मीची कहाणी
“तिथंच मारून टाका”
पहाटे देवींनी चिमादेवराणीला आशीर्वाद दिला. “राजा तुला स्वतःच्या महालात परत नेईल,” त्या म्हणाल्या, “आणि तुझी सवत अर्धी बेडूक होऊन तुझ्या न्हाणीघराबाहेर डरांव डरांव करील.” पाटमाधवराणीला एवढा भयंकर शाप देऊ नका, अशी चिमादेवराणीने विनवणी केली. तेव्हा देवींचं मन थोडं द्रवलं. “मग राजा तिला बारा वर्षं रानात हाकलून देईल,” त्या म्हणाल्या, आणि उडून कोल्हापूरला परत गेल्या. सूर्य उगवला, तेव्हा राजा चिमादेवराणीला रथात बसवून स्वतःच्या महालात घेऊन गेला. मग त्याने पाटमाधवराणीला बोलावलं. ती फाटक्या चिंध्या नेसून आली. केस मोकळे सुटलेले, डोक्यावर जळत्या निखाऱ्यांचं मडकं. ती ओरडत होती, किंचाळत होती. “कोण ही?” राजा गरजला. “भूत, की हडळ?” “ह्या आपल्या पाटमाधवराणी, महाराज,” शिपाई म्हणाले. “हिला रानात न्या,” राजा गरजला, “आणि तिथंच मारून टाका.”
महालक्ष्मीची कहाणी
जीव वाचला, पण हाकलली
रानात गेल्यावर शिपायांनी पाटमाधवराणीला राजाचा हुकूम सांगितला. ती रडू लागली. ते शिपाई दयाळू होते. “राणीसाहेब, रडू नका,” ते म्हणाले. “आम्ही आपल्या हातची भाकरी खाल्ली आहे, आपल्या हातचं पाणी प्यायलो आहोत. म्हणून आम्ही आपल्याला मारू शकत नाही. पण आपण या राज्यात पुन्हा कधीही येऊ नका.” ते तिला तिथंच सोडून गेले. ती भटकत भटकत दूरच्या एका नगरात पोचली. तिथं तांबटआळीत एक तांबट त्या नगराच्या तरुण राणीसाठी बांगड्या घडवत होता. अचानक एकही बांगडी सांधेना. त्याच्या कारागिरांनी कोणी परका माणूस आला आहे का, ते शोधलं. तर ती जवळच लपलेली सापडली. तांबटाने आणि त्याच्या माणसांनी तिला खूप मारलं, आणि हाकलून दिलं. कोष्टीआळीत त्याच राणीसाठी एक साडी विणली जात होती. तिथं सगळे माग बंद पडले. कोष्ट्यांनाही ती सापडली. त्यांनीही तिला खूप मारलं, आणि हाकलून दिलं. ती पळत पळत पुन्हा रानात गेली.
महालक्ष्मीची कहाणी
ऋषींची गुहा
रानात तिला एका ऋषींची गुहा लागली. ऋषी ध्यानात मग्न होऊन बसले होते. ते आंघोळीला जाईपर्यंत ती थांबली. मग गुपचूप गुहेत शिरली. गुहा झाडली, जमीन सारवली, त्यांच्या पूजेची भांडी नीट लावून ठेवली, आणि गुपचूप बाहेर पडली. बारा वर्षं ती रोज असं करत होती. ऋषींना हे ठाऊक होतं, पण त्यांनी तसं कधी दाखवलं नाही. मनातून मात्र ते तिच्यावर प्रसन्न होते. शेवटी त्यांनी हाक मारली, “माझी गुहा कोण झाडतं, कोण सारवतं? जी कोणी असेल, तिने पुढे यावं.” राणी आत आली, आणि तिने त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. “आपण मला शिक्षा करणार नाही, असं वचन द्याल, तर सांगते,” ती म्हणाली. ऋषींनी वचन दिलं, आणि तिने आपली सगळी हकीकत सांगितली.
महालक्ष्मीची कहाणी
अखेर क्षमा
ऋषींनी जादूच्या पोथ्या उघडून पाहिल्या. त्यांना कळलं, हिला महालक्ष्मीचा शाप आहे. मग त्यांनी तिला देवीची पूजा शिकवली. रात्रभर दोघांनी देवीपुढे घागरी फुंकल्या. पहाटे महालक्ष्मी प्रकट झाल्या. राणीवर त्यांचा राग अजून गेला नव्हता. पण ऋषींनीही तिच्यासाठी क्षमा मागितली, आणि शेवटी देवींचं मन द्रवलं. “उद्या राजा या वाटेने येईल,” त्या राणीला म्हणाल्या. “त्याला तहान लागलेली असेल. त्या झाडाखाली पाय धुवायला पाणी, चंदनाचं गंध, फळांची ताटं, कापराची कांडी आणि वाळ्याचे पंखे मांडून ठेव. हे सगळं तू स्वतःच्या हाताने हाताळ. म्हणजे तू नेहमी लावायचीस, तो सुगंध त्या सगळ्याला लागेल. तो सुगंध राजाला आठवेल. राजाचे शिपाई हे सगळं पाहतील, आणि त्याला सांगतील. मग राजा स्वतः येईल.”
महालक्ष्मीची कहाणी
राजाला आठवलेला सुगंध
दुसऱ्या दिवशी सकाळी, देवींनी सांगितलं होतं तसाच राजा आला. तो शिकारीने थकला होता. झाडाच्या गार सावलीत तो विसाव्याला बसला. त्याने पाय धुतले, फळं खाल्ली, गार पाणी प्यायलं, आणि कापूर चोखला. मग त्याने शिपायांना विचारलं, “पाटमाधवराणी नेहमी लावायची, तोच सुगंध या पाण्याला, या फळांना, या कापराला कसा येतो?” “महाराजांनी आम्हाला क्षमा करायचं वचन दिलं, तर सांगतो,” ते म्हणाले. राजाने वचन दिलं. मग त्यांनी सांगितलं, आम्ही राणीसाहेबांना मारलं नाही. आम्ही त्यांच्या हातची भाकरी खाल्ली होती, त्यांच्या हातचं पाणी प्यायलो होतो. म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलं.
महालक्ष्मीची कहाणी
राजाने नमस्कार घातला
“पाहा, ती कुठे जवळपास आहे का,” राजा म्हणाला. शिपाई शोधत शोधत ऋषींच्या गुहेपाशी आले, आणि धावत राजाला सांगायला गेले. राजा उठला, गुहेत गेला, आणि त्याने ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी तो स्वीकारला. मग त्यांनी राजाला बराच वेळ उपदेश केला. शेवटी राणीला साष्टांग नमस्कार घाल, अशी त्यांनी राजाला आज्ञा केली. राजाने तसं केलं. मग ऋषींनी पाटमाधवराणीला राजाच्या हवाली केलं, आणि दोघांना आशीर्वाद दिला. राजाने तिला रथात बसवलं, आणि घरी, आटपाट नगरात आणलं.
महालक्ष्मीची कहाणी
दोन्ही राण्या घरी
नगराबाहेर राजा थांबला, आणि त्याने चिमादेवराणीला बोलावणं पाठवलं. तिने न्हाऊन सगळी रेशमी वस्त्रं, शाली, दागिने घातले. आटपाटचे सगळे तुतारीवाले तिच्यापुढे तुताऱ्या फुंकत चालले. अशी ती राजाला भेटायला आली. “एवढ्या थाटामाटाने कोण येतं आहे?” राजा म्हणाला. “नागकन्या, की वनदेवता?” “आपण हुकूम केला, तशा राणी चिमादेवराणी आपल्याला भेटायला येत आहेत,” शिपाई म्हणाले. राजा पाटमाधवराणीकडे वळला. “तूही अशी मला भेटायला आली असतीस, वेडीसारखी आली नसतीस,” तो म्हणाला, “तर तुझे एवढे हाल झाले नसते.” ती काही बोलली नाही, शांत बसून राहिली. राजाने चिमादेवराणीला उचलून रथात बसवलं. कान बधिर करणाऱ्या तुताऱ्यांच्या आवाजात तिघं नगरात आले. त्यानंतर राजा दोन्ही राण्यांबरोबर अगदी सुखाने नांदला. त्याने इतकं चांगलं राज्य केलं, की प्रजेला वाटलं, अयोध्येचे रामराजेच पुन्हा राज्य करायला आले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या सातव्या कहाणीवरून, ‘महालक्ष्मी आणि दोन राण्या’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.