आटपाट नगरच्या कहाण्या
मंगळागौरीची कहाणी
गोसावी भिक्षा घेईना
आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी राहायचा. त्याला मुलगा नव्हता. रोज एक गोसावी त्याच्या दारी यायचा. “भिक्षा घाला, भिक्षा घाला!” तो हाक मारायचा. “देवाच्या नावानं भिक्षा घाला.” पण वाण्याची बायको भिक्षा घेऊन आली, की तो ती घ्यायचा नाही. जिला मूलबाळ नाही, अशा बाईकडून तो काहीच घ्यायचा नाही. तिने नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याने तिला गोसाव्याला फसवायला सांगितलं. मग ती दाराआड लपून बसली. गोसाव्याने हाक मारली, तशी तिने हळूच एक सोन्याची मोहोर त्याच्या झोळीत टाकली. पण गोसाव्याने तिला पकडलं. तो संतापला. तुला कधीच मूलबाळ होणार नाही, असा त्याने तिला शाप दिला.
मंगळागौरीची कहाणी
निळा घोडा
बायको फार घाबरली. ती गोसाव्याच्या पाया पडली, क्षमा करा म्हणून विनवू लागली. गोसाव्याला तिची दया आली. “तुझ्या नवऱ्याला निळे कपडे घालायला सांग,” तो म्हणाला. “निळ्या घोड्यावर बसून रानात जायला सांग. दुसरा एक घोडा भेटेपर्यंत त्याने पुढे पुढे जात राहायचं. मग खाली उतरायचं, आणि जमीन खणायची. शेवटी त्याला पार्वतीचं देऊळ लागेल. त्याने पार्वतीची प्रार्थना करायची. त्या त्याला मूल देतील.” नवरा घरी आला, तेव्हा तिने त्याला हे सगळं सांगितलं. त्याने लगेच निळे कपडे घातले, निळ्या घोड्यावर बसला, आणि रानात गेला.
मंगळागौरीची कहाणी
सोन्याचं देऊळ
त्याला तो घोडा भेटला. तो खाली उतरला, आणि खणू लागला. शेवटी त्याला पार्वतीचं देऊळ सापडलं. ते देऊळ सगळं सोन्याचं होतं. खांब हिऱ्यांचे होते, कळस माणकांचा होता. आत देवीची मूर्ती होती. मूर्तीपुढे वाण्याने प्रार्थना केली. “माझ्याकडे घरं आहेत, गुरंढोरं आहेत, पैसाअडका आहे, सगळं काही आहे,” तो म्हणाला. “पण मला मुलगा नाही, म्हणून मी फार दुःखी आहे.” पार्वतींना त्याची दया आली. त्या म्हणाल्या, “तुला कसला मुलगा हवा? गुणी असेल पण लवकर मरेल, असा? की खूप जगेल पण जन्मापासून आंधळा असेल, असा?” वाण्याला काय बोलावं ते सुचेना. शेवटी तो म्हणाला, “गुणी पण लवकर मरणारा मुलगा मी मागतो.”
मंगळागौरीची कहाणी
एकच आंबा
“ठीक आहे,” पार्वती म्हणाल्या. “माझ्या मागच्या बाजूला जा. तिथं गणपतीची मूर्ती आहे. तिच्यामागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या पोटावर चढ, आणि एक आंबा तोड. तो घरी ने, आणि बायकोला खायला दे. तुझी इच्छा पूर्ण होईल.” एवढं बोलून पार्वती अदृश्य झाल्या. वाणी गणपतीच्या पोटावर चढला. त्याने खाता येतील तेवढे आंबे खाल्ले. मग एक मोठं गाठोडं आंब्यांनी भरलं, आणि तो खाली उतरला. पण खाली येऊन पाहतो तो गाठोड्यात एकच आंबा! तीन-चार वेळा तो वर चढला, गाठोडं भरलं. प्रत्येक वेळी एकच आंबा उरला.
मंगळागौरीची कहाणी
अखेर मुलगा झाला
वाणी सारखा पोटावर चढत होता. त्यामुळे गणपतीचं पोट दुखू लागलं, आणि ते रागावले. “तुला एकच आंबा मिळेल,” ते ओरडले. “चल, घरी जा आता!” वाणी तो एक आंबा घेऊन भरधाव घरी आला. बायकोने तो आंबा खाल्ला. नऊ महिन्यांनी तिला मुलगा झाला. मुलगा आठ वर्षांचा झाला, तेव्हा त्याची मुंज झाली. मग आई म्हणाली, “आता याच्या लग्नाचा विचार करायला हवा.” “याची काशीयात्रा झाल्याशिवाय याचं लग्न करायला माझा धीर होत नाही,” वाणी म्हणाला. मग मुलाचा मामा त्याला काशीला न्यायला तयार झाला.
मंगळागौरीची कहाणी
खेळणाऱ्या मुली
मामा-भाचे बरोबर निघाले. काही दिवसांनी ते एका गावी थांबले. तिथं काही लहान मुली खेळत होत्या. “तू तर एक कमनशिबी विधवा आहेस,” एक मुलगी दुसरीला म्हणाली. “छे, मुळीच नाही,” दुसरी म्हणाली. “आमच्या घराण्यात कधीच कोणी विधवा होत नाही. माझी आई पार्वतीची पूजा करते. म्हणून मी कधीच विधवा होणार नाही.” मामाने हे ऐकलं, आणि त्याच्या मनात आलं, जी मुलगी कधीच विधवा होणार नाही, तिचा नवरा कधीच मरणार नाही. भाच्याचं हिच्याशी लग्न झालं, तर तो लवकर मरणार नाही. मग हे लग्न कसं जुळवायचं, याचा तो विचार करू लागला.
मंगळागौरीची कहाणी
गोरज वेळेचं लग्न
योगायोग असा, की त्या मुलीचं लग्न त्याच दिवशी होणार होतं. पण त्या दिवशी सकाळी तिचा ठरलेला नवरा आजारी पडला. तिचे आईबाप मोठ्या संकटात पडले. शेवटी त्यांनी ठरवलं, लग्न पुढे ढकलायचं नाही, जमलेल्या पाहुण्यांचा हिरमोड करायचा नाही. त्याऐवजी गावातून जो पहिला वाटसरू जाईल, त्याच्याशी मुलीचं लग्न लावायचं. ते धर्मशाळेत गेले. तिथं कोणी उतरलं आहे का, ते विचारलं. तिथं त्यांना मामा-भाचे भेटले. त्याच संध्याकाळी, गायी घरी परततात त्या गोरज वेळी, त्यांनी आपल्या लहान मुलीचं त्या मुलाशी लग्न लावलं. त्यांनी भिंतीवर शंकर-पार्वतीचं चित्र काढलं. त्याखाली त्या दोन्ही लहानग्यांना झोपवलं. त्या रात्री मुलीला एक स्वप्न पडलं.
मंगळागौरीची कहाणी
रात्री आलेला साप
स्वप्नात तिला पार्वती दिसल्या. “बाळ,” त्या म्हणाल्या, “तुझ्या नवऱ्याला डसायला एक साप येईल. त्याला प्यायला दूध दे. त्याच्याजवळ मातीचा एक नवा घडा ठेव. दूध पिऊन झालं, की तो घड्यात शिरेल. मग लगेच अंगातली चोळी काढ, आणि घड्याच्या तोंडात कोंबून त्याला आत कोंडून टाक. सकाळी तो घडा आईला दे.” दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पार्वतींनी सांगितलं होतं, तसंच सगळं झालं. मुलगा झोपला होता. साप त्याला डसायला आला. मुलीने त्याला दूध दिलं, ते तो प्यायला. मग तो घड्यात वेटोळं घालून बसला. लगेच मुलीने आपली चोळी काढली, आणि घड्याच्या तोंडात कोंबली.
मंगळागौरीची कहाणी
अंगठी आणि वाटी
त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याने तिला एक अंगठी दिली. तिने त्याला बदल्यात एक वाटी दिली, मिठाई ठेवायची. मग तो आणि त्याचा मामा काशीच्या वाटेला लागले. ते गेल्यावर मुलीने तो घडा आईला दिला. आईने चोळी बाहेर काढली. घड्यात साप नव्हता. त्याऐवजी एक हार होता. आईने तो हार मुलीच्या गळ्यात घातला. आठवडे गेले, पण मामा-भाचे परत आले नाहीत. मुलीचे आईवडील काळजीत पडले. तिचा ठरलेला नवरा आता बरा झाला होता. पण तिचं लग्न झालं होतं, त्यामुळे त्याच्याशी लग्न होणं शक्य नव्हतं. आणि ज्याच्याशी लग्न झालं, तो मुलगा तर निघून गेला होता. तो कधी परत येईल की नाही, कोण जाणे.
मंगळागौरीची कहाणी
वाटसरूंसाठी घर
हताश होऊन आईबापांनी एक घर बांधलं. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूचं तिथं स्वागत करायचं. कधी ना कधी त्यांतला एखादा आपल्या मुलीचा नवरा निघेल, अशी त्यांना आशा होती. आई प्रत्येक वाटसरूला पाणी द्यायची. मुलगी त्याचे पाय धुवायची. तिचा भाऊ गंध द्यायचा, आणि वडील सुपारी द्यायचे. पण सगळं व्यर्थ. नवऱ्याने दिलेली अंगठी कोणाच्याच बोटात बसली नाही. आणि तिने दिलेली वाटी कोणालाच दाखवता आली नाही.
मंगळागौरीची कहाणी
यमाचा दूत
इकडे मामा-भाचे काशीला पोचले. त्यांनी गरिबांना भरपूर दान दिलं. सगळ्या तीर्थांचं दर्शन घेतलं. सगळ्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी मुलगा बेशुद्ध पडला. स्वप्नात त्याने पाहिलं, यमाचा दूत जवळ येतो आहे, जणू त्याला न्यायलाच. मग त्याने पाहिलं, पार्वती त्याला वाचवायला आल्या आहेत. झटापट झाली, आणि शेवटी पार्वतींनी यमाच्या दूताला हाकलून लावलं. मुलगा शुद्धीवर आला, तेव्हा त्याने मामाला ते स्वप्न सांगितलं. मामाला खूप आनंद झाला. आता हा लवकर मरणार नाही, अशी त्याची खात्री पटली. दुसऱ्या दिवशी ते काशीहून घरी निघाले.
मंगळागौरीची कहाणी
अंगठी बसली
वाटेत, मुलाचं लग्न झालं होतं ते गाव लागलं. गावच्या तळ्याकाठी ते न्याहारी करत होते. तेवढ्यात एक दासी आली. वाटसरूंच्या घरी चला, असं तिने बोलावलं. आधी मामाने नाही म्हटलं. पण त्यांना न्यायला पालखी आली, तेव्हा ते त्यात बसले. मुलगी नवऱ्याचे पाय धुऊ लागली, तोच तिने त्याला ओळखलं. तिने त्याच्या बोटात अंगठी घालून पाहिली. ती बरोबर बसली. त्यानेही तिने दिलेली वाटी तिला दाखवली. तिच्या आईवडिलांना फार आनंद झाला. त्यांनी मुलाच्या आईवडिलांना बोलावणं पाठवलं, आणि ते आले. मुलाची आई सुनेच्या पाया पडली. माझ्या मुलाला वाचवलंस, म्हणून तिने सुनेचे आभार मानले. मग मोठी मेजवानी झाली. सगळे खूप आनंदात होते. शेवटी सगळ्यांनी पार्वतीची पूजा केली. सगळ्यांसारख्याच पार्वतीही प्रसन्न झाल्या. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या तिसऱ्या कहाणीवरून, मंगळवारच्या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.