आटपाट नगरच्या कहाण्या
नागपंचमीची कहाणी
एकटी राहिली
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहायचा. त्याला सात सुना होत्या, सगळ्या लहान वयाच्या. पुढे पावसाळ्याचा श्रावण महिना आला, आणि त्याबरोबर नागपंचमीचा दिवस आला. हा नागोबाचा सण. नागोबा म्हणजे सगळ्या नागांचे थोर राजे. सणाला प्रत्येक सून आपापल्या माहेरी गेली. कोणी बापाच्या घरी, कोणी आजोबांच्या घरी. शेवटी सगळ्यात धाकटी सून एकटीच मागे राहिली. तिला जायला कुठे जागाच नव्हती. तिचे आईवडील वारले होते. ना काका-मामा, ना आत्या-मावशी, ना भाऊ-बहीण. ती एका कोपऱ्यात बसून रडू लागली.
नागपंचमीची कहाणी
नागोबांना प्रार्थना
मग तिला आठवलं, आज कोणता दिवस आहे. आज नागपंचमी, नागोबाचा सण. ती हळूच पुटपुटली, “नागोबा राजा, मला माहेरी न्यायला कुणी पाठवल्यासारखे इथं या हो!” नागोबांनी तिची प्रार्थना ऐकली. कोपऱ्यात रडत बसलेल्या त्या मुलीची त्यांना दया आली. त्यांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं, आणि ते तिच्या सासरी आले. तिला माहेरी न्यायला मला पाठवलं आहे, असं त्यांनी सांगितलं. तिचे सासरे चकित झाले. हा माणूस खरंच तिचा नातेवाईक असेल, तर आजवर तिला भेटायला कधीच कसा आला नाही?
नागपंचमीची कहाणी
“माझे मामा”
शेवटी सासऱ्यांनी तिला विचारलं, हा माणूस कोण? तिला काहीच ठाऊक नव्हतं. पण कोणीतरी न्यायला आलं, याचा तिला इतका आनंद झाला, की ती लगेच म्हणाली, “हे माझे मामा.” सासऱ्यांना ते खरं वाटलं. त्यांनी तिला नागोबांबरोबर पाठवून दिलं. ब्राह्मणाच्या रूपातच नागोबा तिला जमिनीखालच्या आपल्या महालाच्या दाराशी घेऊन आले. तिथं त्यांनी आपण कोण, ते तिला सांगितलं. त्यांनी पुन्हा आपलं खरं रूप घेतलं, एका मोठ्या नागाचं. डोक्यामागे मोठा फणा पसरला. त्या फण्यावर तिला बसवलं, आणि जमिनीखालच्या आपल्या सुंदर महालात तिला घेऊन गेले.
नागपंचमीची कहाणी
जमिनीखालचा महाल
महालाच्या मोठ्या दालनात नागोबांनी तिला नागराणीसमोर आणि सगळ्या नागकुमारांसमोर आणलं. काहीही झालं तरी हिला कधीही डसायचं नाही, असं त्यांनी सगळ्यांना बजावलं. एके दिवशी नागराणी बाळंत होणार होती. तिने मुलीला जवळ बसून दिवा धरायला सांगितलं. मुलीने तसं केलं. थोड्या वेळाने नागराणीला पुष्कळ पिल्लं झाली. ती सगळी वळवळणारी पिल्लं पाहून मुलगी घाबरली. तिच्या हातून दिवा निसटला. तो खाली जमिनीवर पडला, आणि पिल्लांच्या शेपट्या जळून गेल्या.
नागपंचमीची कहाणी
सासरी परत
नागराणीने पिल्लांना शांत करायचा खूप प्रयत्न केला. पण शेपट्यांची थोटकं इतकी ठणकत होती, की त्यांना झोपवायला तिला बराच वेळ लागला. संध्याकाळी नागोबा घरी आले, तेव्हा तिने त्यांना सगळं सांगितलं. नागराणीला मुलीचा इतका राग आला होता, की तिला सासरी परत पाठवीन, असं वचन नागोबांना द्यावं लागलं. काही दिवसांनी नागोबांनी पुन्हा ब्राह्मणाचं रूप घेतलं. मुलीला भरपूर आहेर केला, आणि तिला तिच्या सासरी पोचवलं.
नागपंचमीची कहाणी
तीन रागावलेले नागकुमार
पुढे ती पिल्लं मोठी झाली, नागकुमार झाली. पण त्यांच्या शेपट्या पुन्हा कधी आल्या नाहीत. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना तशीच नावं ठेवली. शेपूट नाही म्हणून एकाचं नाव लांडोबा, कापलेल्या शेपटीचा दुसरा बांडोबा, आणि थोटक्या शेपटीचा तिसरा थोटोबा. एके दिवशी नागकुमारांनी आईला विचारलं, आमच्या शेपट्या कशा गेल्या? तिने सांगितलं, त्या मुलीच्या हातून दिवा पडला, आणि शेपट्या जळल्या. नागकुमारांना त्या मुलीचा भयंकर राग आला. त्यांनी सूड घ्यायची शपथ घेतली. ती कुठे राहते ते शोधून काढलं, आणि आम्ही भेटायला येतो, असा तिला निरोप पाठवला. पण खरं तर, ती दिसताक्षणी तिला डसून मारायचं, असा त्यांचा बेत होता.
नागपंचमीची कहाणी
भिंतीवरची चित्रं
नागकुमार येणार, म्हणून मुलीला खूप आनंद झाला. नागोबांनी तिच्या मामाचं सोंग घेतलं होतं, तेव्हापासून ती लांडोबा, बांडोबा, थोटोबा यांना आपले मामेभाऊच मानत होती. ते येणार तो दिवस नागपंचमीचा होता. ती घरात एकटी त्यांची वाट पाहत बसली. त्यांना यायला उशीर झाला. वेळ जावा म्हणून तिने भिंतीवर नागोबाची चित्रं काढली. जेवताना बसायचा पाट होता, त्यावरही चित्रं काढली. चित्रं काढून झाल्यावर तिने त्यांची पूजा केली. दूध आणि नैवेद्य ठेवला. मग प्रार्थना केली, “नागोबा राजा, माझे मामेभाऊ लांडोबा, बांडोबा, थोटोबा कुठेही असोत, त्यांचं सगळ्या संकटांपासून रक्षण करा.” सगळ्यात शेवटी तिने चित्रांपुढे जमिनीवर साष्टांग नमस्कार घातला.
नागपंचमीची कहाणी
नागकुमारांचं मन पालटलं
इकडे तिला कळलंही नव्हतं, पण तिन्ही नागकुमार येऊन पोचले होते. ती आपल्या वडिलांची पूजा करते आहे, हे त्यांनी पाहिलं. आपल्यासाठी तिने केलेली प्रार्थना ऐकली. मग तिला डसावं, मारावं, असं त्यांना वाटेनासं झालं. उलट ते तिच्यासमोर आले. दिवसभर घरात राहिले, आणि अगदी गुणी, शांत होऊन वागले. रात्र झाली, तेव्हा तिने नागोबांपुढे ठेवलेलं दूध ते प्यायले. आणि त्या जागी त्यांनी नवरत्नांचा एक सुंदर हार ठेवला.
नागपंचमीची कहाणी
दुधाच्या जागी हार
पहाट व्हायच्या आधीच ते गुपचूप आपल्या वडिलांच्या जमिनीखालच्या महालात परत गेले. सकाळी मुलगी उठली. दूध ठेवलं होतं तिथं तिला तो सुंदर हार दिसला. ती आनंदाने ओरडली. तिने हार गळ्यात घातला, आणि घरभर धावत जाऊन सगळ्यांना दाखवला. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. त्या घरात नागकुमार पुन्हा कधीही कुणाला डसायला आले नाहीत. ती मुलगी, तिचा नवरा, तिचे सासरे, आणि लांडोबा, बांडोबा, थोटोबा, सगळे पुढे खूप खूप दिवस सुखाने राहिले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या नवव्या कहाणीवरून, ‘नागोबा, नागांचा राजा’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.