आटपाट नगरच्या कहाण्या
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
घरात काहीच नाही
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहायचा. त्याच्याबरोबर त्याची बायको आणि मुलं राहायची. भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी पार्वतीच्या लहान लहान मूर्ती विकत आणल्या. बायका थाळ्या वाजवत रस्त्यांनी फिरू लागल्या. ब्राह्मणाच्या मुलांनी हे पाहिलं. ती धावत आईकडे आली. “आई, आम्हालाही पार्वतीच्या मूर्ती आण ना,” ती म्हणाली. “बाकीच्या सगळ्या मुलांकडे आहेत.” “काय उपयोग?” आई म्हणाली. “मूर्ती आणल्या, की नैवेद्य दाखवावा लागेल. आणि घरात तर काहीच नाही. जा, बाबांना सांगा, बाजारातून धान्य आणा. त्यांनी धान्य आणलं, तर मी तुम्हाला मूर्ती आणीन.”
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
मुलं ऐकेनात
मुलं धावत बापाकडे गेली. आई काय म्हणाली, ते त्यांनी त्याला सांगितलं. ब्राह्मणाने सगळं घर धुंडाळलं. पण कुठे धान्याचा दाणा मिळाला नाही. त्याने बटवा पाहिला. धान्य आणायलाही पैसा नव्हता. त्याने मुलांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण मुलं ऐकेनात. ती आरडाओरडा करू लागली, “बाकीच्या मुलांसारख्या आम्हाला पार्वतीच्या मूर्ती का नाहीत?” शेवटी काळजीने ब्राह्मणाचा जीव अगदी कासावीस झाला. “माझी मुलं मला सोन्यासारखी आहेत,” तो म्हणाला. “पण केवळ गरिबीमुळे मी त्यांना मूर्ती आणू शकत नाही, हे त्यांना कळत नाही. भीक मागायला गेलो, तर कोणी मला कधी काही देत नाही. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं.”
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
वाटेत भेटलेली म्हातारी
म्हणून तो उठला, आणि गावच्या तळ्याकडे चालू लागला. तळ्यात उडी टाकून जीव द्यायचा, असं त्याने ठरवलं. तो निघाला तेव्हा अंधार झाला होता. अर्ध्या वाटेवर त्याला एक म्हातारी भेटली. त्याची चाहूल लागताच तिने विचारलं, “कोण आहे?” त्याने तिला आपलं सगळं दुःख सांगितलं. मुलांपासून सुटका व्हावी, म्हणून मी तळ्यात उडी टाकायला चाललो आहे, असंही सांगितलं. म्हातारीने त्याची समजूत घातली, आणि त्याचं मन वळवलं. मग तो माघारी फिरला, आणि म्हातारीलाही आपल्याबरोबर घरी घेऊन आला. बायको दिवा घेऊन दारात आली. “ही कोण?” तिने विचारलं. ही आत्ताच वाटेत भेटली, असं सांगायची ब्राह्मणाला लाज वाटली. म्हणून तो म्हणाला, “ही माझी आजी.”
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
धान्याची मडकी
बायकोने म्हातारीचं स्वागत केलं. “आत या, आज इथंच जेवा,” ती म्हणाली. पण तिचं मन जड झालं होतं. घरात खायला काहीच नाही, हे तिला ठाऊक होतं. म्हातारी बसली. मग बायको निराश होऊन धान्याच्या मडक्यांकडे गेली. ती रिकामी आहेत, हे तिला ठाऊक होतं. तरी एकदा पुन्हा पाहावं, असं तिला वाटलं. पण या वेळी पाहते तो काय, मडकी धान्याने अगदी काठोकाठ भरून वाहत होती. तिने नवऱ्याला हाक मारली. दोघांनाही खूप आनंद झाला. तिने वाट्या भरभरून भाताची पेज केली. मुलांनी, मोठ्यांनी, सगळ्यांनी पोट भरेपर्यंत खाल्लं. त्या रात्री सगळे अगदी आनंदात झोपले.
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
भिकेला भरभरून
सकाळी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. “बाळा, माझ्या आंघोळीला पाणी आण, आणि मला चांगलं गरम गरम जेवण कर. लवकर कर. उगाच काही अडचणी सांगत बसू नकोस.” ब्राह्मणाने आणि त्याच्या बायकोने तिच्या आंघोळीला पाणी आणलं. मग ब्राह्मण भिक्षा मागायला गेला. आधी त्याला कोणी कधीच काही दिलं नव्हतं. पण आज सगळे धावत बाहेर आले. कोणी अन्न दिलं, कोणी गूळ दिला, कोणी तांब्याची नाणी दिली. तो मोठ्या आनंदात घरी आला. बायकोने झकास जेवण केलं. मुलं पोट तट्ट फुगेपर्यंत जेवली. जेवण झाल्यावर म्हातारी म्हणाली, “उद्या मला जेवायला दुधाची खीर हवी.”
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
अंगणभर गुरं
“पण आजी,” ब्राह्मण म्हणाला, “दूध कुठून आणू?” “त्याची काळजी करू नकोस,” ती म्हणाली. “तुझ्या अंगणात जमतील तितक्या खुंट्या ठोक. आज संध्याकाळी गुरं घरी परत येतील, तेव्हा गावच्या गाईम्हशींना नावाने हाक मार. त्या तुझ्याकडे येतील. त्यांचं दूध काढ. माझ्या खिरीला पुरेल इतकं दूध मिळेल.” ब्राह्मणाने तिने सांगितलं तसं केलं. संध्याकाळी त्याने गाईम्हशींना नावाने हाक मारली. चारी दिशांनी त्या धावत आल्या. मागे वासरं उड्या मारत आली. शेवटी त्याचं अंगण इतकं भरलं, की आणखी एकही जनावर आत मावेना. त्याने सगळ्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी बायकोने दुधाची खीर केली. अशी खीर पुढच्या हजार वर्षांत कोणी पाहणार नाही! मुलं पोटभर खीर खाऊन लोळली, आणि गाढ झोपली.
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
“मी पार्वती”
त्या संध्याकाळी म्हातारी म्हणाली, “बाळा, मला माझ्या घरी पोचवून ये.” “आजी, कसं पोचवू?” ब्राह्मण म्हणाला. “हे सगळं भाग्य तुझ्यामुळेच आलं आहे. तू गेलीस, की ते लगेच नाहीसं होईल.” “भिऊ नकोस,” ती म्हणाली. “मी पार्वती आहे. मी तुला आशीर्वाद दिला, तर तुझं भाग्य कधीच नाहीसं होणार नाही. तेव्हा माझ्याबरोबर चल, आणि मला घरी पोचव.” पण ब्राह्मण म्हणाला, “माझं भाग्य नुसतं टिकून राहावं, एवढंच मला नको. ते वाढत जावं, असं मला वाटतं.”
पार्वती आणि गरीब ब्राह्मण
वाळू
“माझ्याबरोबर चल,” पार्वती म्हणाल्या. “मी तुला थोडी वाळू देईन. घरी गेलास, की ती घरभर टाक. घागरी-मडक्यांवर टाक. पेट्यांत, कपाटांत ठेव. अंगणातही टाक. मग तुझं भाग्य आता आहे त्यापेक्षा कधीच कमी होणार नाही.” ब्राह्मणाचं समाधान झालं. त्याने देवीची पूजा केली. मग तो त्यांच्याबरोबर तलावाकडे निघाला. वाटेत पार्वती एकाएकी अदृश्य झाल्या. तो घरी परत आला. पार्वतींनी सांगितलं होतं, तशी त्याने सगळीकडे वाळू टाकली. त्या दिवसापासून भाग्याने त्याची साथ कधीच सोडली नाही. त्याची धनदौलत वाढली, त्याला आणखी मुलं झाली, आणि ते सगळे सुखाने नांदले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या अकराव्या कहाणीवरून, ‘पार्वती आणि ब्राह्मण’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.