आटपाट नगरच्या कहाण्या
पिठोरी अमावास्येची कहाणी
श्राद्धाचं जेवण
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहायचा. दर वर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो आपल्या वडिलांचं श्राद्ध करायचा. श्राद्धाला तो नेहमी दुसऱ्या ब्राह्मणांना जेवायला बोलवायचा. पण वडील वारले, तेव्हापासून दर श्रावणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणाच्या सुनेला मुलगा व्हायचा. आणि दर वेळी पाहुणे जेवायला बसले, की ते बाळ दगावायचं. बाळाच्या मरणाने श्राद्ध मोडायचं. ते तिथंच थांबवावं लागायचं, आणि पाहुण्यांना उपाशीच परत पाठवावं लागायचं.
पिठोरी अमावास्येची कहाणी
रानात हाकलून दिलं
असं सहा वर्षं दर वर्षी झालं. सातव्या वर्षी पुन्हा मुलगा झाला. पाहुणे जेवायला बसले, आणि तोही दगावला. आता मात्र ब्राह्मणाचा धीर सुटला. त्याने ते मेलेलं बाळ सुनेच्या ओटीत घातलं, आणि तिला घरातून हाकलून रानात घालवून दिलं. ती चालत चालत एका मोठ्या, दाट, अंधाऱ्या रानात आली. तिथं तिला एका झोटिंगाची बायको भेटली. “बाई गं, तू कोणाची बायको? इथं कशाला आलीस?” झोटिंगाची बायको म्हणाली. “जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर पळून जा. माझ्या नवऱ्याने तुला पाहिलं, तर तो तुझे तुकडे तुकडे करून खाऊन टाकील.”
पिठोरी अमावास्येची कहाणी
झोटिंगाची बायको
आपण एका ब्राह्मणाची सून आहोत, असं तिने सांगितलं. दर वर्षी श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तिला मुलगा व्हायचा, आणि दर वर्षी तो श्राद्धाच्या जेवणाच्या मधेच दगावायचा. शेवटी सासऱ्यांनी बाळ तिच्या ओटीत घातलं, आणि तिला रानात घालवून दिलं. “तुला जीव प्यारा असेल, तर इथून निघून जा,” झोटिंगाची बायको पुन्हा म्हणाली. ती रडू लागली. शेवटी झोटिंगाच्या बायकोला तिची दया आली. “भिऊ नकोस,” ती म्हणाली. “थोडं पुढे जा. तिथं शंकराची एक पिंडी लागेल. जवळच बेलाचं झाड आहे. त्या झाडावर चढ, आणि फांद्यांत लपून बस.
पिठोरी अमावास्येची कहाणी
काय म्हणायचं
“आज रात्री नागकन्या त्या पिंडीची पूजा करायला येतील. त्या पाताळात राहतात. त्यांच्याबरोबर वनदेवता येतील, आणि त्यांच्या रक्षणाला सात असुर येतील. देवाला नैवेद्य दाखवून झाला, की त्या मोठ्याने विचारतील, ‘इथं कोणी न बोलावता आलेला पाहुणा आहे का? त्याला आम्हाला काही द्यायचं आहे.’ “तेव्हा तू ओरडून सांग, ‘हो, मी आहे.’ त्या तुला पाहतील, तू कोण म्हणून विचारतील. मग तू आपली सगळी हकीकत त्यांना सांग.” तिने ते मान्य केलं. पुढे चालत ती शंकराच्या पिंडीपाशी आली. बेलाच्या झाडावर चढली, आणि मध्यरात्र होईपर्यंत तिथंच बसून राहिली.
पिठोरी अमावास्येची कहाणी
मध्यरात्री
मध्यरात्री नागकन्या आणि वनदेवता सात असुरांना घेऊन आल्या, आणि त्यांनी पिंडीची पूजा केली. नैवेद्य दाखवून झाल्यावर त्यांनी मोठ्याने विचारलं, “इथं कोणी न बोलावता आलेला पाहुणा आहे का? त्याला आम्हाला काही द्यायचं आहे.” ती लगेच झाडावरून खाली उतरली. “हो, मी आहे,” ती ओरडून म्हणाली. नागकन्यांना आणि वनदेवतांना फार नवल वाटलं. “तू कोण?” त्यांनी विचारलं. तिने त्यांना आपली सगळी हकीकत सांगितली. मग त्यांनी सात असुरांना हुकूम दिला, “जा, हिचे सात मुलगे शोधून आणा.” असुरांनी घोड्यांना टाच मारली, आणि ते चारी दिशांना दौडत गेले.
पिठोरी अमावास्येची कहाणी
सात मुलगे
थोड्याच वेळात असुरांचा धिप्पाड नायक घोड्यावरून परत आला. त्याच्या हातात सहा वर्षांच्या एका मुलाचं शरीर होतं. दुसरा असुर पाच वर्षांचा मुलगा घेऊन आला. आणखी चार असुर चार, तीन, दोन वर्षांचे मुलगे, आणि एक वर्षाचं एक बाळ घेऊन आले. सगळ्यात शेवटी सातवा असुर एक तान्हं बाळ घेऊन आला. त्यांनी ती सगळी शरीरं नागकन्यांच्या आणि वनदेवतांच्या पुढे ठेवली. आधी सहा वर्षांचा मुलगा जिवंत झाला. उठला, आणि धावत आईकडे गेला. मग पाच, चार आणि तीन वर्षांचे मुलगे जिवंत झाले, आणि तेही धावत आईकडे गेले. दोन वर्षांचा मुलगा जिवंत होऊन उठला, पण तो फक्त चालत आईपाशी गेला. एक वर्षाचं बाळ जिवंत झालं, पण त्याला उभं राहता येईना. म्हणून ते उताणं पडून पाय झाडू लागलं. सगळ्यात शेवटी तान्हं बाळ जिवंत झालं, पण त्याला पायसुद्धा झाडता येत नव्हते.
पिठोरी अमावास्येची कहाणी
योगिनींची प्रार्थना
आईला पाहून सगळ्या मुलांना खूप आनंद झाला. आपले सगळे मुलगे परत मिळाले, म्हणून आईलाही खूप आनंद झाला. पण नागकन्यांनी आणि वनदेवतांनी तिला बजावलं, “चौसष्ट योगिनींची प्रार्थना कर. त्या दुर्गादेवीच्या सेविका आहेत. नाहीतर तुझी मुलं पुन्हा तुझ्यापासून हिरावून नेली जातील. आणि अगदी मनापासून प्रार्थना कर. ती थेट नरकाच्या तळापर्यंत पोचली पाहिजे.” मग तिने अगदी मनापासून चौसष्ट योगिनींची प्रार्थना केली. नंतर नागकन्यांना, वनदेवतांना आणि असुरांना साष्टांग नमस्कार घातला. एक वर्षाचं बाळ तिने कडेवर घेतलं, तान्हं बाळ छातीशी धरलं, आणि बाकीच्या पाच मुलांना घेऊन ती चालत गावाला परत आली.
पिठोरी अमावास्येची कहाणी
घरी स्वागत
तिला येताना पाहून गावातले लोक धावत ब्राह्मणाकडे गेले. “तुमची सून घरी परत येते आहे!” ते म्हणाले. ब्राह्मणाला फार राग आला. तिला पुन्हा हाकलून देईन, अशी त्याने शपथ घेतली, आणि तो तिची वाट पाहत बसला. पण आधी त्याला सहा वर्षांचा एक मुलगा घराकडे चालत येताना दिसला. मग पाच आणि चार वर्षांचे मुलगे, मग तीन आणि दोन वर्षांचे आणखी दोघं. सगळ्यात शेवटी त्याची सून आली. तिच्या कडेवर एक वर्षाचं बाळ होतं, आणि छातीशी तान्हं बाळ. ब्राह्मण उठला. त्याने एक घंगाळभर पाणी आणि दोन मुठी तांदूळ आणले. सुनेच्या आणि सगळ्या मुलांच्या डोक्यावरून त्याने तांदूळ ओवाळले. आणि सगळ्यात शेवटी त्यांचे पाय धुतले. असं त्याने आपल्या नातवांचं आणि त्यांच्या आईचं घरी स्वागत केलं. मग त्याने सुनेकडून तिची सगळी हकीकत ऐकून घेतली. पुढे ती, तिची मुलं आणि ब्राह्मण, सगळे जन्मभर मोठ्या सुखाने आणि आनंदाने राहिले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या एकोणिसाव्या कहाणीवरून, ‘ब्राह्मण स्त्री आणि तिचे सात मुलगे’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.