आटपाट नगरच्या कहाण्या
शनिवारची कहाणी
अर्ध्या भाकरीचं धान्य
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहायचा. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्यातसुद्धा तो रोज पहाटे उठायचा. मुलांना आणि सुनांना घेऊन शेतावर कामाला जायचा. श्रावणातला पहिला शनिवार आला. त्या दिवशी सासरे धाकट्या सुनेला म्हणाले, “आज शनिवार आहे. तू घरीच राहा. घरात फारसं काही नाही, पण काहीतरी स्वयंपाक कर. माळ्यावरच्या रांजणांत असेल नसेल ते सगळं धान्य खरवडून काढ, आणि त्याच्या भाकरी कर. भाजीसाठी गवत आण, आणि रानातल्या तीनपानी पाल्याची चटणी कर.” रांजणांत अर्ध्या भाकरीपुरतंच धान्य होतं. म्हणून तिने लहान लहान भाकरी केल्या. गवताची भाजी केली, तीनपानी पाल्याची चटणी केली. मग घरची माणसं येण्याची वाट पाहत बसली.
शनिवारची कहाणी
अंगभर फोड आलेला भिकारी
ती वाट पाहत होती, तेवढ्यात शनिदेव घरी आले. ते भिकाऱ्याचं रूप घेऊन आले होते. त्या भिकाऱ्याच्या अंगभर फोड आले होते. “बाई, माझं सगळं अंग दुखतं आहे,” तो कण्हत म्हणाला. “मला आंघोळीला ऊन पाणी दे, अंगाला लावायला तेल दे. मग काहीतरी खायला दे.” तिला त्याची दया आली. तिने त्याला थेंबभर तेल आणून दिलं. आंघोळीला पाणी तापवून दिलं. मग आपल्या लहान भाकरींतली एक भाकरी त्याला दिली. भिकाऱ्याने ती भाकरी खाल्ली, आणि तिला आशीर्वाद दिला. “तुला कधी काही कमी पडणार नाही,” तो म्हणाला. ज्या पानांवर तो जेवला, ती पानं त्याने घडी करून वळचणीच्या एका कोपऱ्यात खोचून ठेवली. आणि तो अदृश्य झाला.
शनिवारची कहाणी
“द्यायला काही नाही”
थोड्या वेळाने घरची माणसं आली. पाहतात तो काय, घरात मोठा थाटाचा स्वयंपाक तयार! “हे सगळं आलं कुठून?” ती एकमेकांना विचारू लागली. “घरात तर काहीच नव्हतं.” पुढच्या शनिवारी दुसऱ्या सुनेची घरी राहायची पाळी आली. पुन्हा शनिदेव त्याच अंगभर फोड आलेल्या भिकाऱ्याचं रूप घेऊन आले. ऊन पाणी, तेल आणि खायला मागू लागले. “तुला द्यायला माझ्याकडे काही नाही,” ती म्हणाली. घरात असेल ते थोडं तरी दे, असं त्यांनी पुन्हा मागितलं. पण ती एवढंच म्हणाली, “माझ्याकडे काही नाही.” “बरं,” शनिदेव म्हणाले. “मग तुझ्याजवळ जे थोडं आहे, तेही जाईल.” आणि ते अदृश्य झाले. ती धान्य आणायला माळ्यावर गेली, तो सगळे रांजण रिकामे! घरची माणसं आली, तर जेवण नाही. तिने त्यांना भिकाऱ्याबद्दल सांगितलं. पण सगळे तिच्यावर रागावले, आणि त्यांनी तिला खूप बोल लावले.
शनिवारची कहाणी
तिसरा आणि चौथा शनिवार
तिसऱ्या शनिवारी तिसरी सून घरी राहिली. पुन्हा शनिदेव आले. तिनेही दुसरीसारखंच केलं. ऊन पाणी दिलं नाही, तेल दिलं नाही, खायला दिलं नाही. तुझ्याजवळ जे थोडं आहे, तेही जाईल, असं शनिदेव तिलाही म्हणाले. घरची माणसं आली, तर जेवण नाही. त्यांनी तिलाही तसेच खूप बोल लावले. चौथ्या शनिवारी पुन्हा धाकट्या सुनेची पाळी आली. शनिदेव आधीसारखेच आले. तिने पुन्हा त्यांना ऊन पाणी, तेल आणि खायला दिलं. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. “देव तुला श्रीमंत करील, सुखी करील,” ते म्हणाले. पुन्हा त्यांनी आपली पानं घडी करून वळचणीत खोचून ठेवली. ती माळ्यावर गेली, तो रांजण धान्याने भरलेले! तिने मोठा थाटाचा स्वयंपाक केला. घरची माणसं आली, आणि खूश झाली.
शनिवारची कहाणी
मोती आणि हिरे
या वेळी मात्र त्यांना राहवलं नाही. “हे सगळं अन्न आलं कुठून?” त्यांनी विचारलं. धाकटीने त्यांना सगळं सांगितलं. अंगभर फोड आलेला भिकारी, त्याचा आशीर्वाद, आणि त्याने वळचणीत खोचलेली पानं. तिचं खरं की खोटं, ते पाहायला त्यांनी छपराच्या कोपऱ्यात ती घडी केलेली पानं शोधली. ती सापडली. त्यांनी ती बाहेर काढली, तर पानं मोत्यांनी आणि हिऱ्यांनी भरलेली! तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाने ओळखलं, तो भिकारी म्हणजे शनिदेवच होते. रांजण रिकामे झाले, तेही त्यांचंच काम. दुसऱ्या दोघींनी त्यांना काहीच दिलं नव्हतं, म्हणून त्यांनी त्या दोघींना शाप दिला होता. सगळ्यांनी गुडघे टेकून शनिदेवांची प्रार्थना केली. ज्या दोघींनी काही दिलं नव्हतं, त्यांना शनिदेवांनी क्षमा केली. धाकट्या सुनेवर तर ते आधीपेक्षाही जास्त प्रसन्न झाले. सगळे सुखाने नांदले. शनिदेव जसे तिच्यावर प्रसन्न झाले, तसे आपणा सगळ्यांवर होवोत. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या सहाव्या कहाणीवरून, शनिवारच्या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.