आटपाट नगरच्या कहाण्या
शिवामुठीची कहाणी
गोठ्यातली सून
आटपाट नगर होतं. तिथल्या राजाला चार सुना होत्या, त्याच्या चार मुलांच्या बायका. तिघी त्याच्या फार लाडक्या होत्या. चौथी दिसायला कुरूप होती, लहानशी होती. ती त्याला मुळीच आवडत नव्हती. तिघींना तो चांगलं खायला द्यायचा, उंची कपडे द्यायचा. चौथीला मात्र आपल्या ताटातलं उरलंसुरलं द्यायचा. नेसायला जाडेभरडे कपडे द्यायचा. तिला घरात झोपूसुद्धा द्यायचा नाही. ती गोठ्यात झोपायची, आणि गाई सांभाळायची. ती फार दुःखी झाली. पावसाळ्याचा श्रावण महिना आला. पहिल्या श्रावणी सोमवारी ती महालातून पळाली. धावत धावत नगराबाहेर गेली. शेवटी रानात जाऊन लपली.
शिवामुठीची कहाणी
रानात
त्याच दिवशी पाताळातून नागकन्यांचा एक मेळा वर आला होता. त्या रानातून फिरल्या, तिथल्या ओढ्यांत न्हायल्या. मग वनदेवताही त्यांना येऊन मिळाल्या. सगळ्या मिळून तिच्याच दिशेने येत होत्या. आधी तर ती इतकी घाबरली, की तिच्या तोंडून शब्दच फुटेना. पण शेवटी तिने विचारलं, “बायांनो, तुम्ही कुठे चाललात?” “आम्ही शंकराच्या देवळात चाललो, त्यांची पूजा करायला,” त्या म्हणाल्या. “ज्या शंकराची पूजा करतात, त्यांना नवऱ्याचं प्रेम मिळतं. त्यांना मुलंबाळं होतात. मनात जे येईल, ते त्यांना मिळतं.” अशा पूजेने प्रेम मिळतं, हे ऐकून तिला वाटलं, आपल्यालाही सासऱ्यांचं प्रेम मिळेल. म्हणून मीही तुमच्याबरोबर येते, असं तिने त्यांना सांगितलं.
शिवामुठीची कहाणी
रानातली प्रार्थना
त्या रानात आत आत गेल्या, आणि शंकराच्या एका देवळापाशी आल्या. तिथं नागकन्यांनी आणि वनदेवतांनी देवाला तांदूळ, सुपारी, धूप, फुलं आणि बेलाची पानं वाहिली. सुनेनेही अगदी तसंच केलं. पूजा झाल्यावर ती मोठ्याने म्हणाली, “शंकरा, माझीही प्रार्थना ऐका. माझे सासू-सासरे, माझे दीर, जावा, नणंदा, सगळे माझा दुस्वास करतात. त्याऐवजी त्यांनी माझ्यावर तितकंच प्रेम करावं, असं करा.” संध्याकाळी ती घरी आली, आणि तिने उपवास केला. काही खाल्लं नाही. राजाच्या ताटातलं उरलंसुरलं तिच्यापुढे टाकलं, ते तिने आपल्या लाडक्या गाईला दिलं. मग एकटी बसून शंकराची प्रार्थना करत राहिली.
शिवामुठीची कहाणी
दुसरा सोमवार
पुढच्या सोमवारी ती पुन्हा रानात पळाली. नागकन्या आणि वनदेवता भेटल्या. त्यांच्याबरोबर ती रानाच्या अगदी मधोमध, दूरच्या त्या देवळात गेली. पहिल्या वेळी पूजेचं साहित्य त्यांनी तिला दिलं होतं. पण पुढच्या वेळी तुझं तू आणायचं, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून या वेळी तिने धूप आणि फुलं, तांदूळ, सुपारी आणि बेलाची पानं आणली. ती तिने देवाला वाहिली, सोबत थोडे तीळ वाहिले. आणि मागच्यासारखीच प्रार्थना केली. मग घरी येऊन तिने पुन्हा उपवास केला. आपलं सगळं जेवण लाडक्या गाईला दिलं. आणि एकटी बसून शंकराची प्रार्थना करत राहिली.
शिवामुठीची कहाणी
“माझा देव दूर राहतो”
त्या संध्याकाळी राजाने तिला विचारलं, “तू पूजा करतेस तो देव कोण? तो राहतो कुठे?” “माझा देव दूर राहतो,” ती म्हणाली. “त्याच्याकडे जायच्या वाटा अवघड, पायवाटा काट्यांनी भरलेल्या. जिथं साप फार, जिथं वाघ दबा धरून बसतात, तिथं त्याचं देऊळ.” तिसऱ्या श्रावणी सोमवारी ती पुन्हा निघाली. बरोबर फुलं आणि धूप, सुपारी आणि बेलाची पानं, तांदूळ आणि तीळ घेतले. या वेळी राजा आणि घरातले इतर पुरुष तिच्या मागोमाग निघाले. “ए कुरूप सुनबाई,” ते म्हणाले, “आम्हालाही बरोबर ने. आम्हाला तुझा देव दाखव.”
शिवामुठीची कहाणी
लांबचा रस्ता
देऊळ महालापासून फार दूर होतं. सुनेला त्याचं काही वाटलं नाही. वाईट वागणुकीची तिला सवयच होती. ती आधी दोनदा तिथं चालत गेली होती. तिचे पाय दगडासारखे कठीण झाले होते. पण राजा आणि त्याची माणसं पार थकून गेली. त्यांचे पाय सुजून हत्तीच्या पायांएवढे झाले. साळिंदराच्या पाठीसारखे काट्यांनी भरले. “ही पोरगी रानातून अशी चालते तरी कशी?” ते आपसात कुरकुरले. शेवटी सुनेला त्यांची दया आली. इथं जवळच एक देऊळ उभं करा, अशी तिने शंकराला प्रार्थना केली.
शिवामुठीची कहाणी
सोन्याचं देऊळ
शंकरांनी ते मान्य केलं. नागकन्यांच्या आणि वनदेवतांच्या मदतीने त्यांनी एकाएकी एक सुंदर देऊळ उभं केलं. सगळं पिवळ्याधमक शुद्ध सोन्याचं. त्याच्या खांबांवर रत्नं जडवलेली होती. आतले कलश सगळे स्फटिकाचे होते. मधोमध जमिनीतून शंकराची पिंडी वर आली होती. सगळ्यात शेवटी शंकरांनी राजाला आणि त्याच्या माणसांना आपल्या पूर्ण तेजात दर्शन दिलं. क्षणभरच ते दिसले, आणि अदृश्य झाले. राजा आणि त्याची माणसं थक्क होऊन पाहत राहिली. त्यांना हलता येईना, बोलता येईना. सुनेने मात्र जमिनीला डोकं टेकवून नमस्कार केला. देवाला फुलं आणि धूप वाहिला. मग मोठ्याने प्रार्थना केली, “शंकरा, माझी प्रार्थना ऐका. माझ्या सासरची माणसं आज माझा जितका दुस्वास करतात, तितकंच त्यांनी माझ्यावर प्रेम करावं, असं करा.” ती काय मागते आहे, ते राजाने ऐकलं. त्याचं मन तिच्याविषयी मऊ झालं. तो तिच्याशी प्रेमाने बोलला. त्याने तिला दागिने आणि सुंदर सुंदर वस्तू दिल्या.
शिवामुठीची कहाणी
खुंटीवरचं पागोटं
थोड्या वेळाने राजाने आपलं पागोटं काढलं, आणि देवळातल्या एका खुंटीला अडकवलं. मग तो एक सुंदर तळं पाहायला बाहेर गेला. आधी ते कोणाला दिसलं नव्हतं, पण आता ते देवळाच्या अगदी जवळ होतं. त्याची माणसंही त्याच्या मागोमाग फिरत गेली. पागोटं खुंटीवरच राहिलं. ते सगळे नजरेआड होताच सोन्याचं देऊळ नाहीसं झालं. ते पुन्हा कधीच कोणाला दिसलं नाही. तळं पाहून राजा पागोटं घ्यायला परत आला. पण देऊळ त्याला कुठेच सापडेना. असं का झालं, असं त्याने सुनेला विचारलं. ती काहीच बोलली नाही. ती फक्त पुढे पुढे रानात चालत राहिली. राजा आणि त्याची माणसं थकली होती, तरी तिच्या मागोमाग गेली.
शिवामुठीची कहाणी
तिचं छोटंसं देऊळ
शेवटी सगळे एका देवळापाशी आले. नागकन्यांबरोबर आणि वनदेवतांबरोबर सून जिथं पूजा करायची, तेच हे देऊळ. ते अगदी छोटंसं होतं. आत एक साधी, ओबडधोबड पिंडी होती. पिंडीपाशी तिने वाहिलेली फुलं पडली होती. आणि जवळच एका खुंटीवर राजाचं पागोटं टांगलेलं होतं. राजाने पुन्हा तिला विचारलं, “याचा अर्थ काय?” “हे माझं गरिबाचं छोटंसं देऊळ,” ती म्हणाली. “पण माझ्या प्रार्थनेमुळे शंकरांनी तुम्हाला त्या सुंदर सोन्याच्या देवळात दर्शन दिलं.”
शिवामुठीची कहाणी
पालखीतून घरी
राजा तिच्यावर आधीपेक्षाही जास्त खूश झाला. तिच्या प्रार्थनेमुळे शंकरांनी दर्शन दिलं होतं. म्हणून तिचा मान करायला त्याने आपली राजपालखी मागवली, आणि तिला थाटामाटात पालखीतून घरी नेलं. तेव्हापासून चारी सुनांमध्ये ती राजाची सगळ्यात लाडकी झाली. बाकीच्या तिघींपेक्षा तो तिच्याशी कितीतरी प्रेमाने वागू लागला. त्यामुळे त्या तिघी तिच्यावर फार जळू लागल्या. पण राजाला आणि त्याच्या एकेकाळच्या नावडत्या सुनेला त्याचं जराही काही वाटलं नाही. दोघंही पुढे सुखाने नांदली. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या विसाव्या कहाणीवरून, ‘सोन्याचं देऊळ’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.