आटपाट नगरच्या कहाण्या
श्रावणी सोमवारची कहाणी
राजाची इच्छा
आटपाट नगर होतं. तिथं एक मोठा धर्मिष्ठ राजा होता. एके दिवशी त्याच्या मनात आलं, शंकराचा गाभारा दुधाने भरावा, अगदी छतापर्यंत. काय करावं, म्हणून त्याने मुख्य प्रधानाला विचारलं. प्रधानाने नगरात दवंडी पिटवली. दर सोमवारी सगळ्यांनी घरातलं सगळं दूध आणायचं, आणि शंकराला वाहायचं. जो आणणार नाही, त्याला भयंकर शिक्षा होईल. लोक घाबरले. पुढच्या सोमवारी त्यांनी आटपाट नगरातलं थेंब न् थेंब दूध देवळात आणलं. वासरांसाठी ठेवलं नाही, मुलांसाठीसुद्धा ठेवलं नाही. पण सोमवारमागून सोमवार गेले, गाभारा काही छतापर्यंत भरला नाही.
श्रावणी सोमवारची कहाणी
दुधाचे चार थेंब
मग एके दिवशी एक म्हातारी देवळात आली. आधी तिने घरातलं सगळं काम उरकलं होतं. सगळ्या मुलांना खाऊ घातलं होतं. आपल्या लहान लहान सुनांना न्हाऊ घातलं होतं. मग तिने दुधाचे चार थेंब घेतले. थोडं गंध, थोडी फुलं, सहा दाणे तांदूळ घेतले, आणि ती पूजेला गेली. तिने ते दुधाचे चार थेंब वाहिले. “देवा, राजाच्या एवढ्या दुधाने आपला गाभारा भरला नाही,” ती शंकराला म्हणाली, “तर माझ्या या थोड्याशा दुधाने कसा भरणार? पण मी मनापासून वाहते आहे.” मग ती उठली आणि घरी गेली. तिने पाठ फिरवली मात्र, गाभारा दुधाने छतापर्यंत भरला.
श्रावणी सोमवारची कहाणी
गाभारा कोण भरतं?
पुजारी धावत राजाकडे गेले, आणि त्याला सांगितलं. पण हे कसं झालं, ते कुणालाच सांगता आलं नाही. पुढच्या सोमवारी राजाने दारावर एक शिपाई ठेवला. पुन्हा म्हातारी आली, तिने पूजा केली, आणि पुन्हा गाभारा छतापर्यंत भरला. शिपाई धावत राजाकडे गेला. पण त्यालाही हे कसं झालं, ते सांगता आलं नाही. तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः गेला, आणि देवळाजवळ लपून बसला. म्हातारी आली, तिने पूजा केली, हे त्याने पाहिलं. पाठोपाठ गाभारा भरला, तेही पाहिलं. तो तिच्या मागे धावला, आणि त्याने तिला पकडलं. म्हातारी जीव वाचवा म्हणून विनवू लागली. तू खरं सांगितलंस, तर तुझा जीव वाचवीन, असं राजाने वचन दिलं.
श्रावणी सोमवारची कहाणी
म्हातारीचं उत्तर
“महाराज,” ती म्हणाली, “आटपाट नगरातलं सगळं दूध इथं आणायचा आपण हुकूम केलात. आणि त्याचं काय झालं? दूध नाही, म्हणून वासरं हंबरू लागली, मुलं रडू लागली. त्या गोंगाटाने मोठी माणसं इतकी त्रासली, की काय करावं ते त्यांना सुचेना. या सगळ्यामुळे शंकर नाराज झाले. म्हणून त्यांनी गाभारा भरू दिला नाही. “तेव्हा आपण असं करा. मुलांना आणि वासरांना त्यांचं दूध पिऊ द्या. मग उरलेलं दूध देवळात आणा. गाभारा लगेच छतापर्यंत भरेल.”
श्रावणी सोमवारची कहाणी
गाभारा भरला
राजाने म्हातारीला सोडून दिलं. त्याने नगरात दवंडी पिटवली. पुढच्या सोमवारी लोकांनी फक्त उरलेलं दूध आणायचं. आधी मुलांना आणि वासरांना पाजायचं. नगरातले लोक खूश झाले. मुलांचं रडणं थांबलं, वासरांचं हंबरणं थांबलं. उरलेलं सगळं दूध शंकराच्या देवळात आलं. राजाने बराच वेळ मनापासून प्रार्थना केली. त्याने वर पाहिलं, तो गाभारा अगदी छतापर्यंत भरला होता. राजाने म्हातारीला मोठं बक्षीस दिलं. आणि ती घरी गेली, घरातलं काम केलं, आणि आपल्या सगळ्या लहान लेकींना आणि सुनांना न्हाऊ घातलं. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या दुसऱ्या कहाणीवरून, सोमवारच्या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.