आटपाट नगरच्या कहाण्या
शुक्रवारची कहाणी
शेजारणीचा सल्ला
आटपाट नगर होतं. तिथं एक अतिशय दरिद्री ब्राह्मण राहायचा. त्याची बायकोही तशीच गरीब होती. एके दिवशी गरिबीने गांजून ती एका शेजारणीकडे गेली. तिने आपली सगळी दुःखं शेजारणीला सांगितली. शेजारणीला एकच उपाय सुचला. शुक्रदेवीची पूजा कर, असं ती म्हणाली. शुक्रदेवी म्हणजे शुक्र ग्रहाची देवी. व्रत असं होतं. पावसाळ्याच्या श्रावण महिन्यात दर शुक्रवारी उपवास करायचा. दर शुक्रवारी संध्याकाळी एका सवाष्ण मैत्रिणीला घरी बोलवायचं. तिचे पाय धुवायचे, तिला साखरेचं दूध द्यायचं. मग गव्हाच्या पोळ्या आणि खोबऱ्याचे तुकडे घालून तिची ओटी भरायची. असं वर्षभर दर शुक्रवारी करायचं. मग शेवटी देवी तिच्यासाठी काही ना काही नक्की करतील.
शुक्रवारची कहाणी
हजार ब्राह्मणांचं जेवण
ब्राह्मणाच्या बायकोला हा सल्ला पटला. शेजारणीने सांगितलं होतं, तशी ती दर शुक्रवारी शुक्रदेवीची पूजा करू लागली. एका सवाष्ण मैत्रिणीला जेवायला बोलावू लागली. तिचा एक श्रीमंत भाऊ होता. तो त्याच नगरात राहायचा. एके दिवशी त्याने हजार ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. नगरातल्या सगळ्या लोकांनाही बोलावलं, फक्त बहिणीला बोलावलं नाही. तिला वाटलं, चुकून आपलं बोलावणं राहिलं असेल. बोलावणं नसलं, तरी गेलं तर काही बिघडणार नाही. म्हणून ती मुलांना घेऊन जेवायला गेली.
शुक्रवारची कहाणी
“उद्या येऊ नकोस”
ती मुलांजवळ बसली, आणि जेवू लागली. तेवढ्यात भाऊ तूप वाढत आला. बहिणीला पाहताच तो तिच्यावर ओरडला. “तुझ्या अंगावर ना चांगले कपडे, ना चांगले दागिने,” तो म्हणाला. “अशी येऊन तू माझं हसं केलंस. मी तुला हाकलून देत नाही, पण उद्या येऊ नकोस.” दुसऱ्या दिवशी तिला जायचं नव्हतं. पण मुलांना जेवण आवडलं होतं. त्यांनी गळ घालून तिला पुन्हा न्यायला लावलं. पुन्हा ती पंगतीत मुलांबरोबर बसली. आणि पुन्हा भाऊ तूप वाढत आला, तेव्हा त्याने तिला पाहिलं. तो ओरडला, “भिकारणीने गावच्या डुकरिणीसारखंच वागायचं, असं दिसतं. सांगितलं तरी जात नाही. पण उद्या येऊ नकोस. आलीस, तर तुला बाहेर काढायला लावीन.”
शुक्रवारची कहाणी
दारातून हाकललं
तरीही तिसऱ्या दिवशी ती मुलांना घेऊन पुन्हा गेली. या वेळी त्याच्या चाकरांनी तिला दाराजवळच पकडलं. काही खायच्या आधीच तिला बाहेर काढलं. ती दुःखी होऊन, उपाशीपोटी घरी आली. तिने शुक्रदेवीची प्रार्थना केली. तिच्या पूजेने देवी प्रसन्न झाल्या होत्या. आता त्यांना तिची दया आली. त्यांनी त्या गरीब बाईच्या नवऱ्याला मदत केली, आणि तो लवकरच खूप श्रीमंत झाला. नवरा श्रीमंत झाल्यावर तिने भावाला जेवायला बोलावलं. पण आपण तिच्याशी कसे वागलो, हे भावाला आठवलं. बोलावणं स्वीकारायची त्याला लाज वाटली. उलट आधी माझ्याकडे जेवायला ये, असा त्याने तिला आग्रह केला. त्याने इतकी विनवणी केली, की शेवटी ती तयार झाली.
शुक्रवारची कहाणी
जेवणाची निराळी रीत
दुसऱ्या दिवशी तिने आपले सगळे दागिने घातले, सगळ्यात चांगले कपडे नेसले. भावाने तिला बसायला पाट दिला, आणि जेवायला पत्रावळी मांडल्या. बसण्यापूर्वी तिने अंगावरची जरीची शाल काढली, आणि पत्रावळीशेजारी ठेवली. भावाने पाहिलं, पण त्याला वाटलं, तिला उकडत असेल. मग तिने आपले दागिने पाटावर ठेवले. त्याला वाटलं, ते तिला जड होत असतील. मग तिने आपल्या हारावर भात वाढला. पदकावर भाजी वाढली, आणि रत्नजडित चांदणीवर एक लाडू ठेवला.
शुक्रवारची कहाणी
खरे पाहुणे
शेवटी भावाने विचारलं, “हे काय करते आहेस?” “तू खरं ज्यांना बोलावलंस, त्या पाहुण्यांना वाढते आहे,” ती म्हणाली. त्याला काही कळेना. “तू जेवायला सुरुवात का करत नाहीस?” त्याने विचारलं. “या जेवणाचं बोलावणं मला नव्हतंच,” ती म्हणाली. “हे जेवण माझ्या दागिन्यांसाठी, कपड्यांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझं जेवण तर तू हजार ब्राह्मणांना जेवू घातलंस, त्याच दिवशी झालं.” भावाला फार लाज वाटली. तो बहिणीच्या पाया पडला, आणि क्षमा कर म्हणून विनवू लागला. मग तिने त्याला क्षमा केली, आणि ती जेवायला बसली. मग तोही तिच्या घरी गेला, आणि तिच्याकडे जेवला. शुक्रदेवी बहीण-भाऊ दोघांवर प्रसन्न झाल्या. ते सगळे सुखाने नांदले. तसे आपणही सगळे सुखाने नांदू. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या पाचव्या कहाणीवरून, शुक्रवारच्या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.