आटपाट नगरच्या कहाण्या
सोळा सोमवारची कहाणी
देवळातला सारीपाट
आटपाट नगर होतं. तिथं शंकराचं एक देऊळ होतं. एके दिवशी शंकर आणि त्यांच्या पत्नी पार्वती फिरत फिरत त्या देवळात आले. तिथं बसून ते सारीपाट खेळू लागले. थोड्या वेळाने पार्वतींना जवळच एक पुजारी दिसला. त्यांनी त्याला विचारलं, “कोण जिंकलं? मी की शंकर?” “शंकर,” पुजारी म्हणाला. हे उत्तर ऐकून पार्वतींना फार राग आला. त्यांनी पुजाऱ्याला शाप दिला. त्याला महारोग झाला. त्याच्या वेदना सहन होईनात. एके दिवशी स्वर्गातून काही अप्सरा त्या देवळात उतरल्या. पुजाऱ्याला महारोग झालेला पाहून त्यांनी कारण विचारलं. पार्वतींनी कसा शाप दिला, ते त्याने सांगितलं.
सोळा सोमवारची कहाणी
सोमवारचं व्रत
“घाबरू नकोस,” अप्सरा म्हणाल्या. “आम्ही सांगतो तसं कर, म्हणजे तुझा महारोग जाईल. येत्या सोमवारी दिवसभर उपास कर. संध्याकाळी आंघोळ कर, शंकराची पूजा कर. मग अर्धा पौंड पीठ घे, त्यात गूळ आणि तूप घाल, आणि ते रात्री जेव. पण काहीही झालं तरी दिवसभर मीठ खाऊ नकोस. “असं लागोपाठ सोळा सोमवार कर. सतराव्या सोमवारी पाच पौंड पीठ घे, त्यात तूप आणि गूळ घाल, आणि या देवळात ते शंकराला अर्पण कर. मग त्याचे तीन भाग कर. एक भाग देवासाठी ठेव. दुसरा ब्राह्मणांना दे, नाहीतर तुझ्या गाईंना घाल. तिसरा घरी ने, आणि घरच्या मंडळींबरोबर तू खा.”
सोळा सोमवारची कहाणी
पार्वती आणि त्यांचा मुलगा
एवढं सांगून अप्सरा अदृश्य झाल्या. त्यांनी सांगितलं तसं सगळं पुजाऱ्याने केलं, आणि तो अगदी बरा झाला. काही दिवसांनी शंकर-पार्वती पुन्हा त्या देवळात आले. पुजारी बरा झालेला पार्वतींनी पाहिला. “तू बरा कसा झालास?” त्यांनी विचारलं. आपण काय काय केलं, ते त्याने जसंच्या तसं सांगितलं. पार्वतींना फार नवल वाटलं. त्यांचा मुलगा कार्तिकस्वामी त्यांच्याशी भांडून रागाने निघून गेला होता. आपणही असंच केलं, तर तो परत येईल, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी सोमवारचं व्रत केलं. सतराव्या सोमवारी कार्तिकस्वामी अचानक समोर आले. आई-मुलाचं भांडण मिटलं. पुढे कार्तिकस्वामींनी विचारलं, “आई, तू मला परत कसं आणलंस?” आणि पार्वतींनी त्यांना सांगितलं.
सोळा सोमवारची कहाणी
हत्तिणीची माळ
कार्तिकस्वामींचा एक ब्राह्मण मित्र होता. तो दूर देशी गेला होता. थोड्या दिवसांनी कार्तिकस्वामींची आणि त्याची योगायोगाने भेट झाली. पुजारी कसा बरा झाला, आणि आपलं आणि आईचं भांडण कसं मिटलं, ते त्यांनी त्याला सांगितलं. मग त्या ब्राह्मणानेही सतरा सोमवारांचं व्रत केलं. त्यानंतर तो प्रवासाला निघाला. तो एका नगरात आला. तिथं राजाच्या मुलीचं लग्न ठरायचं होतं. तिच्याशी लग्न करायला दूरदूरच्या देशांतून राजपुत्र आले होते. पण राजा स्वतः तिचा नवरा निवडणार नव्हता. एका हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली होती. ती ज्या राजपुत्राच्या गळ्यात माळ घालेल, त्याच्याशी राजकन्येचं लग्न होणार होतं. हत्तीण एकेका राजपुत्राला ओलांडून पुढे गेली. लोकांच्या गर्दीबरोबर तो ब्राह्मणही बघायला आला होता. हत्तीण त्याच्यापाशी थांबली, आणि तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. मग राजाने आपल्या मुलीचं लग्न त्या ब्राह्मणाशी लावून दिलं.
सोळा सोमवारची कहाणी
मुलगा झाला
काही वर्षांनी राजकन्या मोठी झाली, आणि ती ब्राह्मणाबरोबर संसार करू लागली. “कोणत्या पुण्याने तुम्हाला मी मिळाले?” तिने नवऱ्याला विचारलं. त्याने तिला सांगितलं. मग तिनेही सतरा सोमवारांचं व्रत केलं. नऊ महिन्यांनी तिला एक सुंदर मुलगा झाला. मुलगा मोठा झाला, तेव्हा ज्या व्रताने तो झाला, ते तिने त्याला सांगितलं. तोही ते व्रत करू लागला. व्रताच्या सोळाव्या सोमवारी तो प्रवासाला निघाला.
सोळा सोमवारची कहाणी
नवा राजा
दूर देशी तो एका नगरात आला. तिथल्या राजाला मुलगा नव्हता, एकच मुलगी होती. आपल्या मुलीशी लग्न करायला आणि आपलं राज्य घ्यायला राजा बऱ्याच दिवसांपासून एक देखणा, गुणी तरुण शोधत होता. हा तरुण नगरात शिरला, तेव्हा राजाला त्याच्या अंगावर सगळी राजलक्षणं दिसली. राजाने त्याला राजवाड्यात आणलं, आपल्या मुलीशी त्याचं लग्न लावलं, आणि त्याला आपल्या गादीवर बसवलं. पुढचा सोमवार सतरावा होता, पिठाचा नैवेद्य दाखवायचा दिवस. त्या दिवशी सकाळी तो देवळात गेला. तिथून त्या तरुण राजाने आपल्या बायकोला, राणीला, निरोप पाठवला, “तूप आणि गूळ घातलेलं पीठ पाठवून दे.”
सोळा सोमवारची कहाणी
गर्विष्ठ राणी
पण राणीला फार गर्व होता. नवऱ्याला पीठ-गूळ पाठवलं, तर रस्त्यातले लोक आपल्याला हसतील, अशी तिला भीती वाटली. म्हणून तिने पिठाऐवजी ताटात पाचशे रुपये घालून पाठवले. पीठ आलं नाही, म्हणून नवऱ्याला पूजा पुरी करता आली नाही. सगळी पूजा फुकट गेली. शंकर प्रसन्न होण्याऐवजी फार रागावले. ते राजाला म्हणाले, “ही राणी तू बायको म्हणून ठेवलीस, तर तुझं राज्य जाईल, आणि तू भिकारी होऊन मरशील.” दुसऱ्या दिवशी राजाने मुख्य प्रधानाला बोलावलं, आणि जे झालं ते त्याला सांगितलं. “हे राज्य राणीच्या वडिलांचं आहे,” प्रधान म्हणाला. “आपण राणीला हाकलून दिलं, तर प्रजा आपला द्वेष करील.” “खरं आहे,” राजा म्हणाला. “पण देवाचं न ऐकणं त्याहूनही वाईट.”
सोळा सोमवारची कहाणी
राणीला हाकलून दिलं
शेवटी प्रधानाने होकार दिला. राणीला नगरातून हाकलून द्यावं, असा हुकूम सुटला. राणीला हाकलून दिलं. ती अगदी गरीब झाली, आणि वाटेने भटकू लागली. शेवटी ती एका दूरच्या नगरात पोचली. तिथं एका म्हातारीने तिला घरात ठेवून घेतलं, खायला-प्यायला दिलं. एके दिवशी म्हातारीने तिला बाजारात फळांची पक्वान्नं विकायला पाठवलं. तेवढ्यात मोठा वारा आला, आणि सगळी पक्वान्नं उडवून घेऊन गेला. राणीने म्हातारीला हे सांगितलं, तेव्हा म्हातारीने तिला घरातून हाकलून दिलं. मग ती एका तेल्याकडे राहिली. त्याच्याकडे तेलाने भरलेले मोठमोठे रांजण होते. एके दिवशी तिने रांजणांत डोकावून पाहिलं, आणि सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानेही तिला हाकलून दिलं.
सोळा सोमवारची कहाणी
नजर पडेल तिथं
राणी ते नगर सोडून चालत राहिली. ती पाण्याने भरलेल्या एका नदीपाशी आली. तिची नजर पाण्यावर पडताच सगळं पाणी वाहून गेलं, आणि नदीचं पात्र कोरडं ठणठणीत झालं. पुढे ती एका सुंदर तळ्यापाशी आली. तिची नजर तळ्यावर पडली, आणि तळं किड्यांनी भरलं. पाण्याला घाण वास येऊ लागला. गुराखी नेहमीसारखे गुरांना पाणी पाजायला आले. पण त्या घाण पाण्याला गुरांनी तोंड लावलं नाही. गुराख्यांना तहानलेली गुरं घेऊन घरी परत जावं लागलं. तेवढ्यात तिथून एक गोसावी आला. त्याने राणीला पाहिलं. राणीने त्याला आपली सगळी हकीकत सांगितली. गोसावी तिला आपल्या घरी घेऊन गेला. त्याने तिला पोटच्या मुलीसारखं वागवलं. तीही जमेल तितकी मनापासून त्याची सेवा करू लागली.
सोळा सोमवारची कहाणी
गोसाव्याची प्रार्थना
पण ती ज्या वस्तूकडे पाहायची, ती एक तर नाहीशी व्हायची, नाहीतर तिच्यात किडे-अळ्या पडायच्या. शेवटी गोसाव्याने आपल्या अंतर्ज्ञानाने याचं कारण शोधलं. तेव्हा त्याला कळलं, हिच्या हातून शंकराची पूजा मोडली आहे. ही तीच पूजा, जी अप्सरांनी पहिल्यांदा पुजाऱ्याला शिकवली होती. त्या पापाचं प्रायश्चित्त होईपर्यंत हिची वाईट नजर कधीच शुद्ध होणार नाही. म्हणून गोसाव्याने शंकराची प्रार्थना केली. शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीसाठी त्यांची विनवणी केली. “मोडलेलं व्रत तिने पुन्हा सुरू केलं, आणि नीट शेवटपर्यंत केलं, तर मी तिला क्षमा करीन,” असं शंकर म्हणाले. राणीने तसं केलं, आणि शंकरांचा राग गेला.
सोळा सोमवारची कहाणी
पुन्हा लग्न
मग अचानक राजाला राणीला भेटावंसं वाटलं. त्याने चारी दिशांना माणसं पाठवली. शेवटी त्यांच्यापैकी एकाला राणी गोसाव्याच्या आश्रमात सापडली. राजाला खूप आनंद झाला. मुख्य प्रधानाला घेऊन तो आश्रमात आला. त्याने गोसाव्याच्या पायांवर लोटांगण घातलं, आणि त्याला भेटवस्तूंनी भरून टाकलं. गोसावी खूश झाला. “राजा,” तो म्हणाला, “तुझ्या बायकोला मी पोटच्या मुलीसारखं वागवलं. ती इथं माहेरी असल्यासारखी राहिली. आता तिला परत घेऊन जा, आणि तिच्याशी पुन्हा लग्न लाव.” राजाने होकार दिला. राजा-राणीने गोसाव्याला साष्टांग नमस्कार घातला, आणि दोघं मिळून आटपाटला घरी परत आली. मोठ्या थाटामाटात त्यांनी घरी परत आल्याचा सोहळा केला. पुढे राजाचं सगळं राज्य अगदी सुखाचं गेलं. आटपाटच्या राजाने शंकराची भक्ती केली, तशी आपणही केली, तर आपणही असेच सुखी होऊ. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या पंधराव्या कहाणीवरून, ‘पार्वती आणि पुजारी’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.