आटपाट नगरच्या कहाण्या
सोमा परटिणीची कहाणी
साधूचा आशीर्वाद
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहायचा. त्याच्या बायकोचं नाव धनवंती. त्यांना सात मुलगे होते, सगळ्यांची लग्नं झाली होती. आणि एक मुलगी होती, तिचं नाव गुणवंती. कोणी ब्राह्मण भिक्षा मागायला दारी आला, की घरच्या बायका त्याला भिक्षा घालायच्या. मग त्याला जमिनीवर डोकं टेकून नमस्कार करायच्या. एके दिवशी एक साधू भिक्षा मागायला आला. तो ब्राह्मण होता, झाडासारखा उंच, आणि सूर्यासारखा तेजस्वी. सातही सुना धावत बाहेर आल्या. त्यांनी त्याला भिक्षा घातली, आणि त्याच्या पायांशी साष्टांग नमस्कार घातला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला. “तुम्हाला पुष्कळ मुलं होवोत, धनदौलत मिळो,” तो म्हणाला, “आणि तुमचे नवरे जन्मभर तुमच्यावर प्रेम करोत.”
सोमा परटिणीची कहाणी
वेगळाच आशीर्वाद
पण गुणवंती आळशी होती. ती अजून अंथरुणातच होती. तिची आई धावत तिच्या खोलीत गेली. “ऊठ गं, ब्राह्मणाला भिक्षा घाल!” गुणवंती घाबरून ताडकन उठली. धावत बाहेर गेली, साधूपुढे भिक्षा ठेवली, आणि त्याच्या पाया पडली. साधूने तिला आशीर्वाद दिला, “धर्माने वाग.” ती धावत आईकडे परत आली. “वहिन्यांना दिला, तसा आशीर्वाद त्याने मला दिला नाही,” ती म्हणाली. “पुन्हा जा, आणखी भिक्षा घाल, आणि काय म्हणतो ते बघ,” धनवंती म्हणाली. गुणवंतीने तसं केलं, आणि पुन्हा आशीर्वाद मागितला. पुन्हा साधू म्हणाला, “धर्माने वाग.”
सोमा परटिणीची कहाणी
सात समुद्रांपलीकडची परटीण
मग धनवंतीने साधूला विचारलं, “माझ्या मुलीला आपण असा वेगळाच आशीर्वाद का दिलात?” “कारण लग्न होताच ती विधवा होणार आहे,” साधू म्हणाला. धनवंतीने त्याच्या पायांवर लोटांगण घातलं. पाय धरून ती रडू लागली. “माझी ही एकुलती एक लहानगी पोर. ती विधवा होऊ नये, म्हणून मी काय करू?” साधूला तिची दया आली. “बाई, रडू नका,” तो म्हणाला. “यावर उपाय आहे. सात समुद्रांपलीकडे एक बेट आहे. तिथं सोमा नावाची एक परटीण राहते. तिला तुम्ही मुलीच्या लग्नाला आणलंत, तर हे संकट तुमच्या मुलीवरून टळेल.” मग त्याने आपली झोळी उचलली, आणि तो दुसरीकडे भिक्षा मागायला गेला.
सोमा परटिणीची कहाणी
मुलगे नाही म्हणाले
नवरा घरी आला, तेव्हा धनवंतीने त्याला सगळं सांगितलं. आईबापांनी मुलग्यांना बोलावलं. “तुमच्यापैकी ज्यांना आईबापांविषयी आदर आहे,” ते म्हणाले, “ते बहिणीला घेऊन सात समुद्रांपलीकडे जातील, आणि सोमाला इथं घेऊन येतील.” पण मुलगे आईकडे वळले. “तुला फक्त तुझ्या मुलीची काळजी,” ते म्हणाले. “आमच्यावर तुझं मुळीच प्रेम नाही. तिच्यासाठी आम्ही जाणार नाही.” आई रडू लागली. बापाला राग आला. “आजपासून तुला मुलगे नाहीत, असं समज,” तो बायकोला म्हणाला. “माझ्यासाठी तर ते जन्मालाच आले नाहीत. पण आपल्या पोरीची काळजी करू नकोस. मी स्वतः सात समुद्र पार करीन, आणि सोमाला घेऊन येईन.”
सोमा परटिणीची कहाणी
धाकटा मुलगा
तेव्हा सातांपैकी सगळ्यात धाकटा मुलगा पुढे झाला. “बाबा, आम्ही सातही जण इथं उभे असताना, मुलगे नाहीत असं म्हणू नका. मी माझ्या बहिणीला, गुणवंतीला, बरोबर घेऊन जातो. आम्ही सोमाला घेऊन येऊ.” काही दिवसांनी बहीण-भावाने आईबापांना नमस्कार केला, आणि ते निघाले. चालता चालता ते समुद्रकिनारी पोचले. वारा घोंघावत होता. लाटा उसळत येत होत्या, आणि फेस खडकांवर उडत होता. पुढे कसं जायचं, ते त्यांना कळेना. खायला-प्यायला द्यायला तिथं कोणी नव्हतं. आता इथंच पडून मरावं, याहून चांगलं काही त्यांना सुचेना.
सोमा परटिणीची कहाणी
गरुड
पण आधी त्यांनी मदतीसाठी शंकराची प्रार्थना केली. मग ते एका वडाच्या झाडाखाली बसले. दिवसभर त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता. त्या झाडाच्या शेंड्यावर गरुडाचं घरटं होतं. संध्याकाळी गरुड आणि गरुडीण पिल्लांना भरवायला घरी आले. पण पिल्लं काहीच खाईनात. “आपल्या झाडाखाली दोन परकी माणसं बसली आहेत,” पिल्लं ओरडली. “दिवसभर त्यांनी काहीच खाल्लं नाही!” गरुड खाली उडत आले, आणि त्यांनी मुलाला त्याचं दुःख विचारलं. “घाबरू नकोस,” गरुड म्हणाला. “तुझं काहीही काम असू दे, मी तुला मदत करीन. मी तुमच्यासाठी फळं आणतो. थोडी तू खा, आणि बाकीची तुझ्या धाकट्या बहिणीला दे.”
सोमा परटिणीची कहाणी
समुद्रांवरून उडत
आम्हाला सात समुद्र का पार करायचे आहेत, ते मुलाने गरुडाला सांगितलं. “उद्या सकाळी तुम्ही उठलात, की मी तुम्हा दोघांना पलीकडे नेईन,” गरुड म्हणाला, “आणि सोमाच्या दारात सोडीन.” मुलांनी शंकराचे आभार मानले. फळं खाल्ली, आणि झाडाखाली गाढ झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गरुडाने मुलाला पाठीवर घेतलं, आणि गरुडिणीने मुलीला. वारा सुटला होता. लाटा डोंगराएवढ्या उसळत होत्या. पण गरुड सरळ सात समुद्र ओलांडून सोमाच्या दारात आले. तिथं मुलांना सोडून ते आपल्या पिल्लांकडे परत गेले.
सोमा परटिणीची कहाणी
गुपचूप सेवा
सोमाच्या घरात जायची बहीण-भावाला भीती वाटली. म्हणून ते दिवसभर लपून राहिले. दुसऱ्या दिवशी ते पहाटे उठले. त्यांनी अंगण झाडलं, आणि जमीन शेणाने सारवली. मग कोणी पाहायच्या आत ते पळून जाऊन लपले. असं त्यांनी वर्षभर रोज केलं. शेवटी सोमाने आपल्या मुलांना आणि सुनांना विचारलं, “एवढ्या पहाटे उठून माझं अंगण कोण झाडतं? जमीन कोण सारवतं?” “मी नाही,” प्रत्येकाने सांगितलं. म्हणून एका रात्री सोमा झोपलीच नाही. पहाट झाल्यावर लगेच तिने पाहिलं, ती ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे, आणि तिचा भाऊ जमीन सारवतो आहे.
सोमा परटिणीची कहाणी
सोमा तयार झाली
“मुलांनो, तुम्ही कोण?” तिने विचारलं. “आम्ही ब्राह्मण आहोत,” ते म्हणाले. “पण मी तर साधी परटीण,” सोमा म्हणाली, “खालच्या जातीची बाई. ब्राह्मणांकडून सेवा करून घेतली, तर मला पाप लागेल.” “ही माझी बहीण,” मुलगा म्हणाला. “एका ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं, तुम्ही हिच्या लग्नाला आला नाहीत, तर लग्नानंतर लवकरच ही विधवा होईल. तुम्हाला घेऊन यायला आईबापांनी आम्हाला पाठवलं. तुम्ही प्रसन्न व्हावं, म्हणून आम्ही तुमच्याकडे सेवा केली.” “आता माझं काम करू नका,” सोमा म्हणाली. “मी आनंदाने येईन.”
सोमा परटिणीची कहाणी
समुद्रांवरून उडी
मग सोमाने सुनांना हुकूम दिला. “मी या मुलीच्या लग्नाला जाते आहे. मी नसताना घरातलं कोणी मेलं, तर त्याला जाळू नका. मी परत येईपर्यंत तसंच ठेवा.” ती मुलांबरोबर समुद्रकिनारी गेली. तिथं मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. तिने एका काखेत मुलाला घेतलं, दुसऱ्या काखेत मुलीला. मग आकाशात उंच उडी मारली, अगदी सात समुद्रांवरून, आणि पलीकडच्या किनाऱ्यावर मुलांना उतरवलं. मुलं तिला आपल्या वडिलांच्या घरी घेऊन गेली. धनवंतीने तिचं स्वागत केलं. सोमा आली, म्हणून आभार मानायला धनवंती तिच्या पाया पडली.
सोमा परटिणीची कहाणी
नवरदेव पडला
मग धाकटा भाऊ बहिणीसाठी नवरा शोधायला उज्जैनला गेला. तिथं चौकशी करून त्याने योग्य जातीचा, योग्य वयाचा मुलगा आणला. शुभ दिवशी लग्न लागलं. नवरा-नवरी एकमेकांवर अक्षता टाकत होते. तेवढ्यात नवरदेवाला भोवळ आली. तो जमिनीवर पडला, आणि निपचित पडून राहिला. लहानगी नवरी इतकी घाबरली, की काय करावं ते तिला कळेना. मोठी माणसंही जवळजवळ तितकीच घाबरली. पण सोमा पुढे झाली. “काही झालं नाही,” ती म्हणाली. “घाबरू नका.”
सोमा परटिणीची कहाणी
सोमाचं पुण्य
सोमाकडे एक गुप्त शक्ती होती. दर सोमवारी ती पहाटे उठायची. मौन पाळून आंघोळ करायची, कपडे घालायची, आणि ब्राह्मणांना दान द्यायची. मग पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची. अशा रीतीने तिने खूप पुण्य जोडलं होतं. आता तिने हातात थोडं पाणी घेतलं, आणि स्वतःवर शिंपडलं. असं करून तिने आपलं सगळं पुण्य गुणवंतीला दिलं. त्या पुण्याच्या बळावर लहानग्या नवरीने नवऱ्याला पुन्हा जिवंत केलं. आणि सगळ्यांच्या आनंदात लग्न पार पडलं.
सोमा परटिणीची कहाणी
सोमाचा परतीचा प्रवास
लग्न झाल्यावर सोमाने सगळ्यांचा निरोप घेतला, आणि ती घरी निघाली. समुद्रकिनारी लाटा उसळत होत्या. पण तिने आपलं सगळं पुण्य गुणवंतीला दिलं होतं. सात समुद्रांवरून न्यायला तिच्याजवळ काहीच पुण्य उरलं नव्हतं. ती उदास होऊन एका नदीच्या काठावर बसली. मग उठली, नदीत आंघोळ केली, आणि विष्णूची प्रार्थना केली. तिने हातात वाळूचे एकशे आठ कण घेतले. मग नदीकाठच्या एका पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या. लगेच तिची शक्ती परत आली. ती पुन्हा किनाऱ्यावर गेली. आकाशात झेप घेऊन तिने सात समुद्र ओलांडले, आणि आपल्या दाराजवळ येऊन उतरली.
सोमा परटिणीची कहाणी
पुन्हा जिवंत
तिच्या सुना धावत तिला भेटायला आल्या. “तुम्ही नसताना तुमचे मुलगे, मामंजी आणि तुमचे सगळे जावई मरण पावले. तुम्ही सांगितलं होतं, म्हणून आम्ही त्यांना जाळलं नाही. घरातच ठेवलं. आणि आता ते सगळे एकाएकी जिवंत झाले!” सोमाने त्यांना विचारून पाहिलं. तिने गुणवंतीला पुण्य दिलं, नेमक्या त्याच क्षणी ते सगळे मेले होते. आणि तिची एकशे आठवी प्रदक्षिणा पुरी झाली, त्याच क्षणी ते जिवंत झाले होते. सोमा घरी परत आली, म्हणून सगळ्यांना आनंद झाला. ते पुढे खूप खूप दिवस सुखाने राहिले. इकडे आटपाट नगरात, जावई बरा झाला म्हणून गुणवंतीच्या बापाला इतका आनंद झाला, की त्याने न ऐकणाऱ्या मुलग्यांना क्षमा केली. मग तेही सगळे एकत्र सुखाने नांदले. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. सी. ए. किनकेड यांनी १९१४ मध्ये महाराष्ट्रातल्या कहाण्यांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातल्या बाराव्या कहाणीवरून, ‘सोमा परटीण’ या कहाणीवरून, ही कहाणी पुन्हा सांगितली आहे.